फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजबाळासाहेब ठाकरेंनी गडकरींना दिली होती मुख्यमंत्री पदाची ऑफर:पत्रकार आनंद निर्माण यांचा पत्र...

बाळासाहेब ठाकरेंनी गडकरींना दिली होती मुख्यमंत्री पदाची ऑफर:पत्रकार आनंद निर्माण यांचा पत्र परिषदेत दावा

Advertisements

गडकरी यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर आधारित पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन
नागपूर,ता.५ मे २०२२: केंद्रिय मंत्री नितीन गडकरींना हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी रात्रभर कन्विंस केलं की मी तुला राज्याचा मुख्यमंत्री बनवतो मात्र गडरकी यांनी त्यांची ऑफर मान्य केली नाही,असे विधान आज प्रेस क्लब येथे ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्माण यांनी केले.

डॉ. विजय शर्मा यांच्‍या गडकरींवरील ‘आउट ऑफ द बॉक्‍स प्रबंधन मंत्र : नितीन गडकरी’ अथाह…असीम’ या पुस्‍तकाचे शनिवार ७ मे रोजी प्रकाशन होणार आहे.या संदर्भात आज प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्र परिषदेत ते बोलत होते.निर्माण यांनी सांगितले की त्या वेळी मुंढे-महाजन यांची महाराष्ट्रात मक्तेदारी होती.गडकरींना हेतुपुरस्सर डावलल्या जात होते,हे एकदा गडरकी यांनीच निर्माण यांना खासगीत सांगितले असल्याचा दावा त्यांनी केला.त्यावेळी मी पत्रकार सहनिवासाचा सचिव देखील होतो.अशाच एका उपक्रमात गडरकी तिथे आले असता मला त्यांची विनम्रता खूप भावली.

याप्रसंगी पुस्तकाचे लेखक व अनुवादक शिवायु आयुर्वेद लिमिटेडचे मार्केटिंग डायरेक्टर डॉ.विजय कुमार यांनी पुस्तक लिहण्यामागील प्रेरणा विशद केली.हे पुस्तक गडकरी यांच्या जीवन, धेय्य आणि दूरदृष्‍टीवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.हे नागपूरकरांचे भाग्य आहे की जिवंतपणी ते या किवंदतीचे साक्षीदार बनले असे लेखक महोदय म्हणाले. या मूळ हिंदी तसेच, मराठी व इंग्रजी अनुवादाचा प्रकाशन सोहळा शनिवार, ७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोज‍ित करण्‍यात आला आहे.

याप्रसंगी गडकरी यांच्याशिवाय  इतर कुण्या राजकारणी विभूतीवर वर पुस्तक का लिहले नाही?या प्रश्‍नावर बोलताना शर्मा यांनी, मला ज्या विभूतीकडून प्रेरणा मिळाली त्यांच्यावरच पुस्तक लिहले असल्याचे त्यांनी सांगितले.पुस्तकात सारांश रुपात गडकरी यांचे आत्मचरित्र आले असल्याचे ते म्हणाले.यावर आत्मचरित्रात्मक पुस्तकात माणसाच्या जीवनातील काळे-पांढरे आयुष्य हे उघडपणे नमूद असतं,तुमच्या पुस्तकात यावर भाष्य केले आहे का?या प्रश्‍नावर बोलताना माझ्या पुस्तकात गडकरींचे आत्मचरित्र हे अगदी अल्प स्वरुपात आले असून माझ्या पुस्तकात संपूर्ण भर गडकरी यांच्या व्यवस्थापन कौशल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरी यांनी नागपूर शहरात महामेट्रो आणली,२०१४ मध्ये हा प्रकल्प साढे सात हजार कोटींचा होता, आता २०२२ मध्ये हा प्रकल्प अद्याप ही अपूर्ण असून १२ हजार कोटींपर्यंत गेला. याचा भुर्दंड नागपूरकर जनतेवर पडला असून नागपूर महानगरपालिकेने महामेट्रोची देणी फेडण्यासाठी २०४२ पर्यंत बांधकाम विकास शुल्कात १०० टक्क्यांची वाढ केली आहे,गडकरींच्या या व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?या प्रश्‍नावर लेखकांनी काहीच उत्तर दिले नाही मात्र निर्माण यांनी ’तुम्हाला मेट्रोमधलं काय कळतं?असा उपप्रश्‍न विचारला!मेट्रोचा पोझिटिव्ह अँगल आम्ही घेतोय निगेटीव्ह अँगल  घेत नसल्याचे निर्माण हे उत्तरले.राम झुलासारखा महत्वाचा प्रकल्प दहा वर्षे अडकवून ठेवण्यात आला होता मात्र गडकरी यांच्या पुढाकाराने तो नागपूरकरांसाठी अखेर साकारल्या गेला,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

विदर्भ सेवा समिती, नागपूरच्‍यावतीने कवी कालिदास सभागृह, पर्सिस्‍टंट कंपनी, आयटी पार्क येथे होणा-या या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्‍त न्‍यायमूर्ती विकास सिरपूरकर राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून नवी दिल्‍लीच्‍या ‘द प्रिंट’ चे संस्‍थापक, मुख्‍य संपादक व लेखक शेखर गुप्‍ता यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून माजी महापौर दयाशंकर तिवारी, मॅनकाइंड फार्माचे सीईओ राजीव जुनेजा व नॅशनल इनोव्‍हेशन फाउंडेशन अमरपूर, गांधीनगरचे संचालक डॉ. विपिन कुमार यांची विशेष उपस्थिती राहील,अशी माहिती लेखकांनी दिली.

पुस्‍तकाविषयी –
डॉ. विजय कुमार शर्मा यांनी नितीन गडकरी यांच्‍यातील सकारात्‍मक उर्जा, दूरदृष्‍टी, व्यवस्थापन कौशल्‍य, संशोधन वृत्ती अशा अनेक स्‍व-व्‍यवस्‍थापनाच्‍या आधुनिक सूत्रांना भावी पिढीपर्यंत पोहोचवण्‍याच्‍या उद्देशाने हे पुस्‍तक लिहिले आहे. यात प्राचीन भारतीय ऋषी-मुनींद्वारे लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमध्‍ये वर्णन केलेल्‍या श्‍लोकांचा आधार घेत आधुनिक काळातील व्‍यवस्‍थापन ग्रंथ आणि प्रसिद्ध मानसशास्‍त्रज्ञांच्‍या शोध सिद्धांतांची सांगड घालण्‍यात आली आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञानामधील स्व-व्यवस्‍थापन आणि व्यक्तिमत्व विकासाच्या सूत्रांचा संबंध नितीनजींची कार्यशैली आणि त्यांच्‍या व्यवस्थापन कौशल्याशी जोडण्‍याचा प्रयत्‍न यात करण्‍यात आला आहे. डॉ. शर्मा यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्‍या ‘आउट ऑफ द बॉक्‍स : प्रबन्‍धन मंन्‍त्र – नितीन गडकरी, अथाह… असीम’ या पुस्‍तकाचे प्रकाशक दिल्‍लीचे वाणी प्रकाशन आहे. या पुस्‍तकाचा ‘चौकटी मोडणारा धुरंधर नेता : नितीन गडकरी’ हा मराठी अनुवाद ज्‍येष्‍ठ पत्रकार व स्‍क्‍वेअर मिडिया सोल्‍यूशन्‍सच्‍या मॅनेजिंग डायरेक्‍टर मंजुषा जोशी नागपुर आणि डॉ. सदानंद बोरसे पुणे यांनी केला असून या पुस्‍तकाचे राजहंस प्रकाशन प्रकाशक आहेत. ‘आउट ऑफ द बॉक्‍स थिंकर : नितीन गडकरी, अनफोल्‍डींग द अनलिमिटेड’ हा इंग्रजी अनुवाद ज्‍येष्‍ठ पत्रकार बरखा माथुर यांनी केला असून हे पुस्‍तक क्रॉसवर्डने प्रकाशित केले आहे.

लेखकाविषयी –
डॉ. विजय कुमार शर्मा यांनी राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठातून बीकॉम, एमए व एमफिल (हिन्दी साहित्‍य), एमए (मराठी साहित्य) तसेच, मार्केटिंग, मॅनेजमेंट व फार्मसीचा डिप्लोमा केलेला आहे. नुकतीच त्‍यांना नागपूर विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली आहे. शिवायू आयुर्वेद लिमिटेड, नागपूरचे मार्केटिंग डायरेक्टर असलेले डॉ. शर्मा हे मनुष्‍यबळ व व्‍यवस्‍थापन अभ्‍यासक्रमाचे प्रशिक्षक आहेत. ज्ञानवर्धिनी व दिव्य दिशा फाउंडेशन तसेच, इतर व्यापारिक व औद्योगिक संस्थांशी ते संलग्न आहेत. ‘सृष्टिकोण’ हा काव्यसंग्रह, ‘योगस्वरूप’ ग्रंथाचा हिंदी अनुवाद, ‘भारतीय प्रबंधन शास्त्र’ चा हिंदी अनुवाद त्‍यांनी केलेला असून पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह स्मृती हिंदी गौरव पुरस्कार प्राप्‍त झाला आहे.
………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या