
सोनेगाव तलाव हनुमान मंदिरात मनसेचे भोंगा आंदोलन
‘नमनालाच’ मनसेच्या अांदोलनाला मंदिर ट्रस्टींचा ’नाट’:फक्त आरतीची घेतली होती परवानगी!
नागपूर,ता. ४ मे २०२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्सास ४ मे पासून भोंग्यांवरुन मशिदीसमोरच दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेत केले होते,त्या पार्श्वभूमीवर आज नागपूरात मनसेकडून सोनेगाव तलावाजवळील हनुमान मंदिरात मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात भोंगे आंदोलन करण्यात आले.राज ठाकरे यांच्या आदेशाचे नागपूरात शंभर टक्के पालन करण्यात आले असल्याचा दावा हेमंत गडकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला.
आम्ही शहरातील सर्व ३२ ही पोलिस ठाण्यात आंदोलनाच्या परवानगीसाठी प्रयत्नरत होतो मात्र आज सकाळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आम्हाला त्यांच्या कार्यालयात बोलावून आमच्या समोर दाेन पर्याय ठेवले त्यातील आम्ही सोनेगाव हनुमान मंदिरात भोंगे आंदोलन करण्याचे मान्य केल्याचे हेमंत गडकरी म्हणाले. यावेळी मंदिर परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त होता.यावेळी गडकरी यांनी अमितेशकुमार यांचे विशेष आभार मानले.मनसेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित होते.यावेळी मनसे सैनिकांनी‘जय श्री राम’चे नारे लवले.यावेळी हनुमान चालीसाचे पठण करुन आरती करण्यात आली.आज दुपारी २ वाजता मनसेचे हे आंदोलन पार पडले.
यावेळी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दुपारी १ वाजता मुंबईत त्यांच्या निवासस्थानी तातडीची पत्र परिषद घेऊन मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात हे आंदोलन फक्त आज ४ मे रोजी पुरतं नसून पुढे ही महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे खाली उतरल्याशिवाय सुरुच राहणार असल्याचे सांगितले,यावर प्रश्न विचारला असता राज ठाकरेंचा जो काही आदेश आहे त्या आदेशाचे पुढे ही पालन करणार असल्याचे हेमंत गडकरी यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील अजान विरोधात हनुमान चालीसा पठणाचे आदेश दिले होते मात्र तुम्ही तर पोलिसांच्या परवानगीने हनुमान मंदिरात आरती केली हे कसे काय?यावर बोलताना तलावाच्या पलीकडे मशिद असल्याचे हेमंत गडकरी यांनी सांगितले. मंदिर परिसरात भोंगे ही लावले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी हनुमान मंदिराचे विश्वस्त देशमुख व शंकर बळवंत सणस यांनी मंदिरात फक्त आरतीची परवानगी घेऊन मनसेतर्फे राजकीय आंदोलन करण्याबाबत तीव्र नाराजी माध्यमांकडे व्यक्त केली.मंदिरात हे असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा दम देत मनसे पदाधिका-यांच्या विरोधात लवकरच पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली,यावर हेमंत गडकरी यांना प्रश्न विचारला असता,मी याच परिसरात रहातो,हे मंदिर सार्वजनिक मंदिर आहे,या ठिकाणी कोणताही हिंदू पूजा उपासना करु शकतोअसे सांगत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ज्यावेळी शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळे तोडण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेला दिले त्यावेळी हे मंदिर वाचवण्यासाठी मनसेने देखील आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.मी या परिसरातील नागरिक मंडळाचा देखील सभासद आहे,त्यामुळे या मंदिरात आरती करण्याचा,हनुमान पठण करण्याचा मला अधिकार असल्याचे हेमंत गडकरी यांनी सांगितले.
यावेळी भोंग्यांचे डेसिबल मोजण्यात येणार असल्याचे उपस्थित पोलिस अधिका-यांनी सांगितले.नियमाचे उल्लंघन झाल्यास हेमंत गडकरींवर गुन्हा देखील दाखल करु असे ते म्हणाले.मंदिर ट्रस्टींनी तक्रार नोंदवल्यास त्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
थोडक्यात महाराष्ट्राच्या उपराजधानीत राज ठाकरे यांच्या आवाहनाचे पालन करण्यात मनसे पदाधिका-यांना बरेच कष्ट पडलेत त्यात ही ‘नमनालाच ट्रस्टींचा नाट लागल्याची चर्चा चांगलीच रंगली’.नकटीच्या लग्नाचा सतराशे विघ्न अशी मराठीत एक म्हण आहे,नागपूरात मनसेचे आंदोलन हे ‘आंदोलन‘ न वाटता हनुमान मंदिरात सामुहिक हनुमान चालीसा पठण व आरतीचा उपक्रम असल्याचे आता बोलले जात आहे.
कालच पोलिसांकडून मनसेच्या सर्व पदाधिका-यांना व कार्यकर्त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या होता,कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन करण्यास मनसे सैनिकांचे देखील हात बांधले असल्याने राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूरात हनुमान मंदिरात भोंगे लाऊन आंदोलन ’उरकण्यात’आल्याचे बोलले जात आहे.
ट्रस्टी हे कट्टर काँग्रेसी:साेनेगाव परिसरातील नागरिकांची प्रतिक्रिया
मंदिरात आरती असो किवा आंदोलन ही चांगलीच गोष्ट आहे मात्र सणस यांनी मनसेच्या आंदोलनाला जो आक्षेप नोंदवला तो योग्य नसल्याची प्रतिक्रिया खास ’सत्ताधीश’कडे नाव न छापण्याच्या अटीवर सोनेगाव परिसरातील नागरिकांनी दिली.हा संपूर्ण पट्टा हा भाजपला मानणारा आहे.सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी नुकतीच या भागात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची सभा देखील झाली होती.यात सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी २०० कोटी खर्च करणार असल्याचे ते बोलले होते.यात तलावाचे सौंदर्यीकरण,भिंती बांधणे,गाळ काढणे ही कामे होणार आहेत.सणप यांचे सुपुत्र हे फेसबुकवर सातत्याने ब्राम्हण वर्गासाठी अवमानकारक पोस्ट टाकत असतो,सणस हे जातीयवाद पाळणारे गृहस्थ असून आज झालेले मनसेचे आंदोलन म्हणजे पर्यायाने पुन्हा भाजपलाच फायदा होणार,यासाठीच त्यांचा थयथयाट होता,असा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला.
सोनेगाव तलावाच्या त्या भागात अगदी सोनेगाव गावात मशिद असल्याचे नागरिक सांगतात.हनुमान मंदिरापासून १ किलोमीटर अंतरावर असणा-या या गावात मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात राहातो मात्र सोनेगाव बाजारात जी काही मटण-मासोळींची दूकाने लागतात त्याला भाजपचाच पाठींबा अाहे,या भागातील हा समुदाय भाजपचाच मतदार समजला जातो असे येथील काही रहीवाशी सांगतात.सणस हे फूलबाग राखणदार होते मात्र त्यांनी त्या जागेवर अनाधिकृत कब्जा केल्याचे प्रकरण देखील या भागातील नागरिक सांगतात.एक कट्टर काँग्रेसी विचारधारेचा विश्वस्त मनसे अर्थात पर्यायाने भाजपला फायदा होताना कसा बघू शकेल?असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करतात.

आमचे चॅनल subscribe करा