फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मांडला २६८४ कोटीचा अर्थसंकल्प

मनपा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी मांडला २६८४ कोटीचा अर्थसंकल्प

Advertisements

नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह मनपाच्या उत्पन्नवाढीवर भर

नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेचे प्रशासक आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी २०२२-२३ या वर्षाचा प्रस्तावित अंदाजपत्रक बुधवारी (ता.१३) सादर केला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपा प्रशासक आणि आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी मनपाचे उत्पन्नवाढ आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर भर देणारा रु. २६८४ कोटीचा उत्पन्न व रू. २६६९ कोटीच्या खर्चेचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त  दीपककुमार मीना,  राम जोशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  विलीन खडसे उपस्थित होते.

मनपा प्रशासक व आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, पथदिवे यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. २०२२-२३ या वर्षातील हाती घ्यावयाच्या विकास कामाचे नियोजन करताना त्या कामाची तात्काळ उपयोगीता व गरज आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले असून विशेष महत्वाचे व तात्काळ हाती घ्यावयाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. मनपा प्रशासक व आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात एकूण महसुली खर्च रु. १५१८ कोटी व भांडवली खर्च रु. १००० कोटी एवढा आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, माहिती व तंत्रज्ञान या महत्वाच्या विभागांकरिता सर्व विभाग मिळून एकूण महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाची तरतूद जास्त ठेवण्यात आली आहे. याशिवाय नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात ५ कोटी, बीओटी तत्वावर बाजार विकसीत करण्यासंदर्भात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जलप्रदाय विभाग : २०२१-२२च्या सुधारित वार्षिक अथसंकल्पीय अंदाजानुसार जलप्रदाय विभागापासून रु. १९५ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत रु. १७० कोटी उत्पन्न प्राप्त झाले असून २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता पाणी दरापासून रु. २०० कोटी उत्पन्न प्रस्तावित करण्यात आले आहे.

नगर रचना विभाग : विकास कामांना मंजुरी देताना अकारावयाच्या विकास शुल्कात १० टक्के वाढ करण्यास शासनाची मंजुरी प्राप्त झाल्याने विकास शुल्कापासून मिळणा-या रक्कमेतून मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ११९.७५ कोटी उत्पन्नो उद्दिष्ट नगर रचना विभागाकडून ठरविण्यात आले आहे.

बाजार विभाग : सद्यस्थितीत मनपाचे एकूण ६८ बाजार असून त्यामध्ये २६९२ दुकाने, ९५६ ओटे व ११७७ जागा अस्थायी स्वरूपात वापरात देण्यात आलेले आहेत. मनपाच्या बाजार क्षेत्रातील सायकल/स्कुटर पार्कींग स्टँडपासून मनपाला जवळपास ५० लक्ष रुपये उत्पन्न प्राप्त होईल. बाजार विभागाकडून २०२२-२३ या वर्षात १३.७१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

स्थावर विभाग : मनपाच्या स्थावर विभागाच्या जागेबाबतच्या सर्व अभिलेखांचे जतन करण्याचे काम २०२२-२३ या आर्थिक वर्षात करण्यात येणार असून या सर्व अभिलेखांचे डिजिटलायजेशन करणे प्रस्तावित आहे. स्थावर विभागाकडून या आर्थिक वर्षात ६.३० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.

सिमेंट काँक्रीट रस्ते : सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा २ व ३ अंतर्गत टप्पा २ मधील एकूण ५९ रस्त्यांपैकी ५४ रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पासठी रु. ३२४ कोटी राशी आहे. टप्पा ३ ची प्रकल्प राशी रु. ३०१.६७ कोटी एवढी आहे. ३९ रस्ते बांधकाम करणे प्रस्तावित असून १६ रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असून १२ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. टप्पा १ मध्ये सुटलेल्या १० चौक व फुटपाथच्या सुधारणेसाठी रु. ३२ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पावर अद्ययावत रु. १६२ कोटी खर्च झालेला असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचा मानस मनपा प्रशासक व आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

‘वॉकेबल कॉरीडोअर’ची निर्मिती : रस्त्यावरील वाहतूक कमी होणे, फुटपाथवरून चालण्यायोग्य मार्गीका उपलब्ध करून देणे व पायी चालण्याच्या प्रवृत्तीत वाढ होण्याच्या हेतूने मनपाद्वारे मुख्य रस्त्यालगत आधुनिक पादचारी मार्ग निर्माण करणे प्रस्तावित आहे. या कामासाठी रु. १० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. ‘वॉकेबल कॉरीडोअर’साठी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
महाल बुधवार बाजार शॉपींग सेंटर : जयप्रकाश नगर यकळील मेट्रो मॉल येथे करण्यात येणा-या व्यापारी संकुलाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे त्याच धर्तीवर महाल बुधवार बाजार व्यावसायीक शॉपींग सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम खासगी उद्योजकामार्फत ‘डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड सेल’ या तत्ववार पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.

ऑरेंज सिटी स्ट्रीट : वर्धा मार्गावरील जयप्रकाश नगर मेट्रो स्टेशन लगत साकारत असलेल्या प्रकल्पाच्या प्लींथ लेव्हल पर्यंतच्या कामाकरिता १३ कोटी एवढा खर्च झाले असून या प्रकल्पाच्या मनपाला दोन वर्षात रु. ५५.५५ कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. सदर प्रकल्पांतर्गत भूखंड २ वर हॉटेल उद्योजकाकरिता, भूखंड ४ वर वाणीज्यिक उपयोगाकरिता भूखंड ११ मेडिकल हब स्वरूपात विकसीत करण्याचे प्रस्तावित असून त्यातून रु. ३२५ कोटी मनपास उत्पन्न् अपेक्षित आहे.

रस्त्यांकडे विशेष लक्ष-खड्डे विरहीत रस्ते : शहरातील रस्ते खड्डे विरहीत ठेवण्याकडे मनपा प्रशासक आणि आयुक्तांनी विशेष लक्ष दिले आहे. यासाठी अर्थसंकल्पात रु. १६ कोटीची तरतूद केली आहे.

‘व्हॉईट टॉपींग रस्ते’- : मनपा प्रशासक आणि आयुक्तांच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पांमध्ये या प्रकल्पाचा समावेश होतो. १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या ज्या अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ जास्त असल्याने रस्ते खराब होतात त्यावर वारंवार डांबरीकरण केले जाते. यासाठी येणारा खर्च टाळण्यासाठी डांबरी रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा थर देउन दीर्घकाळ सुस्थितीत राहण्यासाठी ‘व्हॉईट टॉपींग रस्ते’ तयार करण्यात येणार आहेत. यासाठी रु. २० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी विशेष तरतूद : -डांबरी रस्ता जास्त काळ सुस्थितीत राहत नसल्यामुळे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी रु. ४७ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.रस्त्याचे पृष्ठभाग सुस्थितीत रहावे यासाठी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्यासाठी रु. ५० कोटीची तरतूद आहे.मुख्य रस्यां वरील पादचारी मार्ग, मेनहोल व नाली दुरूस्ती करणे, मेनहोल कव्हर्स, पावसाळी/ मलवाहिनी नाली सुस्थितीसाठी झोन स्तरावर एकत्रित कार्यक्रमांची अंमलबजावणीसाठी रू. १२ कोटी प्रस्तावित आहे.

दोन रस्त्यांच्या विकासासाठी २४ कोटी -: व्हेटरनरी कॉलेज ते हनुमान मंदिर रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, फुटपाथ व ड्रेन आणि चिंचभवन घाट ते मौजा चिंचभवन सिमेपर्यंत रस्त्याच्या सिमेंटरीकरणासाठी रु. २४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

बायोमायनिंग प्रकल्प -: शहरातील कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प उभारणारे नागपूर महाराष्ट्रातील पहिले शहर आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी झिग्मा ग्लोबल एन्व्हायरो सोल्यूशनची निवड करण्यात आली असून प्रकल्पासाठी ४० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

उद्यान विभाग :- शहरात उद्यान विभागांतर्गत १३७ व नासुप्रकडून प्राप्त ४४ उद्याने आहेत. यात फुलपाखरू उद्यान, सुगंधी उद्यान, रोझ उद्यान साकारण्यात येणार आहेत. जयताळा येथे ३.२५ एकर परिसरात ‘हर्बल उद्यान’ विकसित करण्याचे नियोजन आहे.

दिव्यांगांसाठी संवेदना उद्यान -: अंध, कर्णबधिर, बहुविकलांग, ऑटिजम, मेंदू पक्षपात, मानसिक मतिमंद अशा मुलांसाठी मनपातर्फे विशेष ‘संवेदना उद्यान’ साकारण्यात येत आहे.
मियावाकी उद्यान : २०२२-२३ या आर्थिक वर्षात भांडेवाडीच्या धर्तीवर मनपाच्या उद्यानाकरिता राखीव जागा, नदीपात्र, नदी काठावर मियावायी पद्धतीने ६० हजार वृक्षांची लागवड करून व त्यांचे पालकत्व सामाजिक संस्थांना देउन खर्चात बचत करण्याचा मानस आहे. पोलिस जिमखाना ते मा. मुख्यमंत्री निवासस्थान रामगिरी रोडपर्यंत असलेल्या वॉकर्स रोड प्रमाणे इतर रोडवरही ‘वॉकर्स स्ट्रीट’ निर्माण करण्याचे प्रयोजन आहे.

अमृत योजना :- अमृत योजनेंतर्गत मनपाद्वारे कंत्राटदाराची नेमणूक करून १६ जलकुंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यापैकी ११ जलकंभांचे कार्यादेश निर्गमित करण्यात आले असून या सर्व कामांसाठी ८० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण विभाग : शिक्षण विभागांतर्गत महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे.
– सुपर-७५ साठी रु. १३ कोटी
– इंग्रजी माध्यम शाळांच्या विकासासाठी रु. २ कोटी
– दिव्यांग विद्यार्थ्यांना टॅबसाठी रु. ४ कोटी
– विद्यार्थ्यांच्या वाहन सेवेसाठी रु. १० लक्ष
– डिजिटल वर्गखोल्यांसाठी रु. ३ कोटी
– ॲडव्हॉन्स स्टुडिओ निर्मितीसाठी रु. १० लक्ष
– इंग्रजी माध्यम शाळा इमारत विस्ताराकरिता रु. ६.१० कोटी

विशेष ग्रंथालय : मनपाद्वारे वेगवेगळ्या संकल्पनेवर चार ग्रंथालये साकारण्याचे प्रस्तावित आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रमाता कस्तुरबा ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. राममनोहर लोहिया ग्रंथालय, ऐतिहासिक साहित्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश ग्रंथालय, अभ्यासिका म्हणून बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाचा विकास करण्याची तरतूद आहे.

अग्निशमन विभाग :
 अग्निशमन विभागांतर्गत मनपाद्वारे मध्य भारतात पहिल्यांदाच ७० मीटर उंच हॅड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी करण्यात येणार आहे.
 गंजीपेठ, लकडगंज, पाचपावलीख कॉटन मार्केट केंद्रांची इमारत व निवासी गाळ्यांच्या इमारतींच्या पुनर्बांधकामासाठी रु. १५ कोटी तरतूद
 ३ फायर टेंडर व इतर बचाव कार्य यंत्र सामुग्रीसाठी रु. ६ कोटी तरतूद
 ३२९ पद भरतीकरिता शासनास प्रस्ताव सादर, मान्यतेनंतर पदभरती प्रक्रिया

दिव्यांगांसाठी :
– दिव्यांगांसाठी ई-रिक्षा वाटप योजना
– दिव्यांग व मदतनिसांना शहर बस वाहतुकीत १०० टक्के सवलत
– अंधांसाठी विशेष संगणक वाटप योजना
– मतिमंदांना निर्वाह भत्ता वाटप योजना
– दिव्यांग बचत गटांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य
– स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
– मोटोराईज्ड ट्रायसिकल वाटप

शहर परिवहन : मनपा प्रशासक आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी ई-बस वाहतुकीवर पूर्ण भर दिलेला आहे. त्याअंतर्गत मनपाच्या आपली बस सेवेमध्ये ११५ ईलेक्ट्रीक बसचा समावेश करण्यात येणार आहे.

इतर महत्वपूर्ण बाबी-
 विद्युत विभागासाठी रु. ११२.८२ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
 पर्यावरणपूरक दहन घाटासाठी रू. ७.५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
 नाग नदीवरील नागपूर विद्यापीठ वाचनालयाजवळील २४ मीटर रुंद पुलाच्या बांधकामासाठी रु. २१ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
 जिजाउ स्मृती शोध संस्थान प्रकल्पाचे काम प्रलंबित असून हे काम पूर्णत्वास नेण्याबाबत मनपा प्रशासक व आयुक्तांनी संकल्प केला आहे.
 नाग नदी प्रकल्पांतर्गत ४५ द.ल.लि. क्षमतेचे मलशुद्धिकर बांधण्याकरिता नारा, नारी येथे पिवळी नदी काठावर २.५ हेक्टर जमीनीच्या अधिग्रहणासाठी प्रयत्न सुरू असून यासाठी रु. ३० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
 नागपूर शहरातील सिवरेज नेटवर्कसाठी रु. २५ कोटी राशीची कामे प्रस्तावित असून पोहरा नदीवर ३५ एलएलडीचा नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित आहे.
 नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी ५ कोटी रूपये प्रास्तावित आहे.
 प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत EWS सदनिकासाठी रू. ३७.२० कोटी प्रस्तावित आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या