

प्रकरण सीबीआय किवा सीआयडीला का देण्यात येऊ नये?हायकोर्टाची विचारणा
पोलिसांच्या तपासावर ताशेरे:पुढील सुनावणी उन्हाळी सुट्यांनंतर
नागपूर,ता.८ एप्रिल २०२२: शहरातील निकीता चौधरी जळीत काडांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिस विभागाच्या कार्यतत्परतेवर कठोर ताशेरे ओढत हा तपास सीबीआय किवा सीआयडीला का देण्यात येऊ नये?अशी विचारणा करीत नोटीस जारी केली.निकीता लखन चौधरी या अवघ्या २३ वर्षीय तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह १६ मार्च २०२२ रोजी शहरापासून २२ किलोमीटर दूर सुराबर्डी परिसरात सापडला होता व उपराजधानी हादरली होती.वाडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक तपशीलाच्या अाधारावर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवघ्या काही वेळेतच लगेच ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे सांगितले होते.निकीता चौधरीची आई,वडील व भाऊ यांनी ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचे पोलिसांना सांगितले मात्र त्यांच्या फिर्यादीकडे पोलिसांनी डोळेझाक केली.पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे बघून अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी पुढाकार घेतला.२९ मार्च रोजी त्यांनी मृत निकीता हिच्या कुटुंबियांना घेऊन प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेतली तसेच ॲड.राजेश नायक यांच्या करवी उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केली,यावर आज कोर्टाने पोलिस विभागाला नोटीस जारी केली.

(छायाचित्र-मृत निकीता चौधरी)
आपल्या अर्जात ॲड.नायक यांनी निकीता चौधरी घटनेतील पोलिसांच्या चौकशी तपासातील अनेक कच्चे दूवे न्यायालयासमोर ठेवले.एवढ्या संवेदनशील घटनेचा तपास पोलिसांनी योग्यरित्या न करता आम्हत्येचे कलम ३०६ दाखल करुन पोलिसांनी जबाबदारी झटकली असे ॲड.नायक यांनी अर्जात नमूद केले.निकीताचा मृतदेह नागपूर शहरापासून १६ किलोमीटर दूर सापडला तो ही अर्धा जळालेला.आत्महत्या करणारा व्यक्ती शहरापासून एवढ्या लांब जाऊन आत्महत्या कशाला करेल?त्यातही निकीताचा मृतदेह हा कमरेखालून जळालेला आढळला.जळण्याच्या केसमध्ये पोलिसांना त्या ठिकाणी मातीचे तेल किवा डिजेलचा गंध आला नाही,तो त्यांनी पंचनाम्यात नमूद ही केला नाही.ज्वलनशील पदार्थांमध्ये एक विशिष्ट स्वरुपाचा गंध असतोच मग पोलिसांना तो गंध निकीताच्या मृतदेहाजवळ का गवसला नाही?असा प्रश्न ॲड.नायक यांनी उपस्थित केला.

(छायाचित्र-घटनास्थळी निकीताच्या कुटुंबियांना सापडेला पेट्रोल काढण्याचा पाईप)
निकीताचा मृतदेह हा चित्त अवस्थेत पडला होता.वरचा भाग जळालेला नव्हता.जर कोणी आत्महत्या करेल तर ज्वलनशील पदार्थ स्वत:च्या डोक्यावर,केसांवर किवा खांद्यावर ओतेल मात्र निकीताच्या शरीराचा फक्त कमरेखालचा भाग पूर्णत: जळालेला आढळला.पोलिसांनी या दृष्टिकोणातूनही तपास केला नसल्याचा आरोप ॲड.नायक यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात केला.
निकीताने कॉटन जीन्स घातली होती,पोलिसांना जळालेल्या जीन्स चा एक तुकडा देखील घटनास्थळी इतरत्र विखुरलेला सापडला नाही.निकीताची ‘ब्रा’जळालेली नव्हती.तिचं शरीर कमरेच्या वरच्या भागात अर्धनग्न होतं.त्यामुळे देखील पोलिसांची आत्महत्येची ‘थ्योरी’ही असत्य ठरत असल्याचा दावा ॲड.नायक यांनी केला.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही घटना प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे सांगून हात झटकले. शवविच्छेदन अहवाल देखील येण्याची त्यांनी वाट बघितली नाही.शवविच्छेदन अहवालात निकीताच्या मृत्यूचे कारण ९९ टक्के जळणे (शॉक ड्यू टू बर्न)असे नमूद आहे.वास्तवतेत असा शॉक खूप जीवघेणा असतो.माणसाला साधा उदबत्तीचा एक चटका देखील सहन करने कठीण असतं तिथं निकीता तर कमरेखाली पूर्णत:जळालेल्या अवस्थेत सापडली,मग तिने एवढा मोठा शॉक कसा सहन केला असावा? मासांचं जळणं असहनीय होऊन तिने इकडे-तिकडे धाव घेतली असती,तिच्या सोबत आजूबाजूची रोपे देखील जळाली असती मात्र पोलिसांना निकीताच्या मृतदेहाजवळ फक्त आजूबाजूचं थोडंसं गवत जळालेले आढळले.
शवविच्छेदन अहवालात निकीताच्या शरीरावर चार घाव असल्याचे नमूद आहेत,पोलिस आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे त्या भागातील श्वानांनी निकीताचे मांस नोचले असावे मात्र तिची आतडी बाहेर निघाली होती,श्वान हे जवळ जवळचे मांस घेऊन पळत असतात,निकीताचे मांस आजूबाजूच्या परिसरात पोलिसांना कुठेही गवसले नाहीत.मृतदेह सापडला त्या ठिकाणाहून मानवी वस्ती खूप लांब होती,‘यूओडीसी’ नावाचे कार्यालय त्या ठिकाणी असून या कार्यालयाचे सुरक्षा रक्षक हे कर्तव्यावर सतत हजर असतात.ते सतत बाहेर उभे असतात,निकीताने अंगावर डिझेल टाकून आत्महत्या केली असती तर या सुरक्षा रक्षकांना ते का दिसले नाही?
याशिवाय याच ठिकाणी जवळच ‘डबलिंक ८८’नावाचे रिसॉर्ट आहे.या ठिकाणचे कर्मचारी स्टाफबसने बाहेर पडले असता रात्री ११.३० वाजता या ठिकाणी कर्मचा-यांना एक पांढ-या रंगाची कार फिरताना आढळली होती.आरोपीकडे देखील पांढरीच कार आहे मात्र पोलिसांनी या एंगलने तपास केलाच नाही.
निकीताच्या मृतदेहाजवळ ३० फूटांचा निकीताच्या कुटुंबियांना गाडीतून पेट्रोल काढण्याचा पाईप सापडला,पोलिसांना पंचनामा करताना तो कसा सापडला नाही?
एवढ्या गंभीर घटनेत निकीताचे शवविच्छेन देखील खूप केज्यूअली करण्यात आल्याचा आरोप ॲड.नायक यांनी केला.९९ टक्के जळाल्यामुळे मृत्यू झाला असता तर निकीताचा चेहरा व कमरेच्या वरचा भाग हा न जळालेल्या अवस्थेत कसा होता?फक्त कमरेखालचा भाग जळणे म्हणजे ९९ टक्के जळणे होतं का?
पोलिसांचा पंचनामा,आत्महत्येची थ्योरी व शवविच्छेदनचा अहवाला सगळंच काही संशयास्पद असल्याकडे ॲड.नायक यांनी आज न्यायालयाचे लक्ष वेधले.
न्यायमूर्तीद्वय वी.एम.देशपांडे व अमित बोरकर यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणावर नोटीस जारी केली तसेच हे प्रकरण सीबीआय किवा सीआयडीकडे का वर्ग करण्यात येऊ नये?असा प्रश्न विचारला आहे.
जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुटीनंतर आता या प्रकरणाची सुनवाई होईल.




आमचे चॅनल subscribe करा
