फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजचोरट्या मनपा अधिका-याची कमाल!गहाळ झालेली फाईल पुन्हा विभागात

चोरट्या मनपा अधिका-याची कमाल!गहाळ झालेली फाईल पुन्हा विभागात

Advertisements

स्लम विभाग अधिका-यांचा असा ही करिष्मा

बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी केली होती फाईलच गहाळ:ॲड.नितेश बारापात्रे यांचा आरोप

न्यायालयात दाद मागणार: आयुक्तांनाही करणार प्रतिवादी

नागपूर,ता. ७ एप्रिल २०२२: नागपूर महानगरपालिका,पालिकेतील भ्रष्ट कारभार, भ्रष्ट अधिकारी,पदाधिकारी,टक्केवारी इत्यादीबाबत वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून नागपूरकर जनता एखाद्या मराठी मालिकाप्रमाणे पुढे-पुढे जाणारे कथानक बघतच असते त्यात १२ मार्च रोजी आणखी एक भर पडली होती ती म्हणजे नागपूरचे एक युवा वकील ॲड.नितेश बारापात्रे यांनी पत्र परिषद घेऊन त्यांच्या विषयाशी संबंधित फाईल, एका बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी गांधीबाग झोनमधून कश्‍याप्रकारे गहाळ करण्यात आली याची व्यथाच मांडली होती,आता पुन्हा त्यांनी पत्र परिषद घेऊन त्या गहाळ झालेल्या फाईलला अचानक पाय फूटले व कुठे तरी फिरायला गेलेली ती फाईल अचानक आपोआप मनपाच्या गांधी बाग झोनमध्ये परत आल्याचा गोप्यस्फोट करण्यासाठी पत्र परिषद घेतली! चोरट्या अधिका-यांनी १२ तारखेच्या पत्र परिषदेनंतर, नोकरीवर गदा येण्याच्या भितीने आतापर्यंत दडवून ठेवलेली फाईल विभागात आणून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

ॲड.नितेश यांचे वडील निलकंठ बारापात्रे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनला, नगर रचना विभागाला तसेच मनपा आयुक्तांकडे रितसर एक तक्रार नोंदवली होती.वार्ड क्र.४७,घर क्रमांक ८३ व ८४ यावर बिल्डर सुनील अनिलचंद्र लद्दड हे ’एव्हरेस्ट प्लाझा’नावाची अनाधिकृत इमारत बांधत आहे.या तक्रारीवर मनपाने महाराष्ट्र झोपडपट्टी(सुधारणा,निमुर्लन व पुर्नविकास) अधिनियम १९७१ च्या कलम ३ झेड-१(१)अन्वये बिल्डरच्या अनाधिकृत बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली मात्र झोनच्या काही भ्रष्ट अधिका-यांनी बिल्डरला नोटीसीसोबतच अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिलमध्ये जाण्याचा सल्ला ही दिला!त्याप्रमाणे बिल्डरने अति.जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केली.अति.जिल्हाधिकारी यांनी १६ डिसेंबर २०१९ रोजी नागपूर मनपाच्या स्लम विभागाला तसेच झोन कार्यालयाला रेकॉर्ड मागितला असता तो त्यांना पाठवण्यातच आला नाही.

या संबधीचे एकूण ५ स्मरण पत्रे अति.जिल्हाधिकारी यांनी मनपाचा स्लम विभाग तसेच गांधीबाग झोनला पाठवले मात्र ते रेकॉर्ड बिल्डरच्या फायद्यासाठी अति.जिल्हाधिकारी यांना उपलब्धच करुन द्यायचे नाही अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’मनपाच्या भ्रष्ट अधिका-यांनी केली असल्याने अद्याप तरी तो रेकॉर्ड अति.जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचला नाही.ॲड.बारापात्रे हे त्यांचे प्रकरण लवकरात लवकर समोर जावे यासाठी वारंवार मनपाच्या स्लम विभाग व गांधीबाग झोनचे उंबरठे झिजवत राहीले मात्र भ्रष्टाचारी अधिका-यांना पाझर फूटला नाही.अखेर हताश होऊन १२ मार्च २०२२ रोजी ॲड.बारापात्रे यांनी पत्र परिषद घेऊन आपली व्यथा मांडली.गेल्या किती तरी वर्षांपासून मनपाचे काही भ्रष्ट अधिकारी सर्वसामान्यांना वेठीस धरुन,त्यांच्या न्याय हक्कांची गळचेपी करुन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप ॲड.बारापात्रे यांनी केला.माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच चोरट्या अधिका-याने बारापात्रे यांच्याशी संबंधित ती गहाळ झालेली फाईल झोन कार्यालयात आणून ठेवली व तुमची फाईल सापडली आहे,असा निरोप ही बारापात्रे यांना गांधी बाग झोनकडून मिळाला!

सलग दोन वर्षे पाठपुरावा करुन देखील फाईल सापडत नव्हती मग अचानक एका महिन्यात कशी काय ती कपाटात ’सुखरुप’पोहोचली?या प्रश्‍नावर लिपिकाने उत्तर देण्याचे टाळले,फाईल आता पर्यंत कुठे गेली होती,काय करीत होती,आता परत कशी आली,कधी आली या सर्व प्रश्‍नांची उत्तरे माझ्याकडे नसल्याचे उत्तर गांधी बाग झोनमधील लिपिकाने दिले.

मात्र बिल्डरकडून पैसे घेऊन सर्वसामान्यांना वेठीस धरण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेसाठी महत्वाच्या असणा-या फाईल्सच गायब करणा-या मनपाच्या स्लम विभाग व गांधी बाग झोनच्या चोरट्या व भ्रष्ट अधिका-यांवर आता कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ॲड.बारापात्रे यांनी पत्र परिषदेत सांगितले.

मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी. यांना देखील प्रतिवादी बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.तुकाराम मुंढे हे जेव्हा मनपा आयुक्त पदी होते ते दररोज ४ वाजता ‘जनता दरबार’घ्यायचे,यामुळे नागरिकांच्या अनेक समस्यांची माहिती त्यांना होत होती.राधाकृष्णन बी.हे एक तर त्यांच्या कक्षातूनच बाहेर पडत नाही त्यात ते नागरिकांना तर भेटत देखील नाही.मी स्वत: पाच वेळा निवेदन घेऊन गेलो मात्र एकदा ही त्यांच्या स्वीय सहायकाने त्यांना भेटू दिले नाही,स्वीय सहायकानेच सगळे निवेदन ठेऊन घेतले,त्यावर काहीच कारवाई झालीच नाही.मग नागपूरकर जनतेसाठी कार्यभार करण्यासाठी नागपूरात आलेले असे मनपा आयुक्त नागपूरकरांसाठी कोणत्या उपयोगाचे?असा संताप त्यांनी व्यक्त केला.

आता किमान गहाळ झालेली फाईल ‘ईश्‍वरकृपेने’सापडली आहे तर आता तरी लवकरात लवकर ती जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात पाठविण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली तसेच चाेरट्या अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,सर्वसामान्य जनतेला आपल्या भ्रष्ट कारभारासाठी वेठीस धरणा-या मनपा अधिका-यांवर पोलिसी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मनपाच्या स्लम विभागातून फक्त माझी एकमेव फाईलच गायब झाली नाही तर अश्‍या एकूण ३७ फाईल्स गहाळ झाल्या असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.न्यायिक प्रक्रियांसाठी विलंब व्हावा,बिल्डर्सकडून आर्थिक लाभ करुन घ्यावा यासाठी महत्वाच्या फाईल्सच मनपाचा स्लम विभाग व झोन कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी गहाळ करुन टाकतात.सरकारी नोकरशाहीच्या या अश्‍या मानसिकतेवर प्रभावी आळा बसवण्याचे काम मनपा आयुक्तांचे होते मात्र आयुक्तांनी नागपूरकर जनतेप्रतिची आपली जबाबदारी संपूर्णत:झटकली असून त्यांना फक्त आपल्या लाखोच्या घरात असणा-या मासिक पगार व भत्त्यांशी घेणेदेणे असल्याचा संताप आता व्यक्त केला जात आहे.

नुकतेच मनपा प्रशासन व कंत्राटदार यांच्या अभद्र युतीतून ६७ लाखांचा स्टेशनरी घोटाळा उघडकीस आला होता.आता मनपाच्या स्लम विभागातील अश्‍या कारभारामुळे मनपाचे किती भ्रष्ट अधिका-यांनी किती ‘माया‘जमवली याचा शोध आता सध्या राज्यभर गाजत असलेल्या ’इडी’नेच घ्यावा असा सूर आता नागपूरकर जनतेमध्ये उमटला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या