
उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे नागपूर सुधार प्रन्यासला प्रस्ताव समंत करण्यासाठी पत्र!
भाजप पदाधिका-यांनी केली या प्रस्तावाची पत्र परिषदेत भर्त्सना:राऊतांची संविधानाप्रति निष्ठेला तिलांजली
नागपूर,ता.३० मार्च २०२२ : नागपूर सुधार प्रन्यासची मौजा नारी येथे खसरा क्रमांक ९७/२ क्रमांकाचे एकूण ५ हजार ७९.५९६ चौ.फूट जागा आहे.ही जागा नासुप्रने २०१४ मध्ये अंकित कंस्ट्रक्शनच्या किशोर कन्हेरे यांच्याकडून त्यावेळच्या रेडिरेकनरच्या दरानुसार भुगतान देऊन अधिग्रहीत केली होती,आता नासुप्रची हीच जमीन उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना त्यांच्या पत्नी सुमेधा राऊत यांच्या शाळेसाठी आवंटित करण्यासाठी नासुप्रचे सभापती मनोज सुर्यवंशी यांना पत्र लिहले आहे.या विरोधात भारतीय जनता पक्षाचे नासुप्रचे माजी विशवस्त संजय बंगाले व प्रकाश भोयर यांनी पत्र परिषद घेऊन निषेध नोंदवला.याप्रसंगी भाजपचे प्रदेश मंत्री ॲड.धर्मपाल मेश्राम व प्रदेश व विदर्भ मिडीया प्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संजय बंगाले यांनी सांगितले की मी व प्रकाश भोयर यांचा विशवस्त म्हणून कार्यकाळ ५ मार्च रोजी संपुष्टात आला,आमची नागपूर महानगरपालिकेतून विश्वस्त पदी नियुक्ती झाली होती,४ मार्च रोजी मनपाचा कार्यकाळ संपुष्टात आला.नासुप्रची आज बैठक पार पडली,कोणत्याही बैठकीसाठीची नोटीस ही सात दिवसांपूर्वी निघत असते. यामुळे विशवस्तांना बैठकीतील विषयांची माहिती होते.प्रशासनाशी चर्चा होते.विशवस्त,सदस्य व प्रशासन मिळून भूमिका ठरवत असतात.
मात्र यावेळी नासुप्रने पालकमंत्र्यांच्या दबावाखाली सात ऐवजी तीन दिवसांपूर्वी नोटीस जारी केली.त्या नोटीसवर आज बैठक पार पडली.या बैठकीत काँग्रेसचे संदीप इटकेलवार व आमदार विकास ठाकरे हे देखील विशवस्त म्हणून उपस्थित होते.पालकमंत्र्यांच्या पत्नी सुमेधा राऊत यांना शाळेसाठी नासुप्रची पाच हजार चौ.फूट जागा देण्याचा विषय चर्चेला येताच आ.विकास ठाकरे यांनी हा विषय अति तातडीने घेण्याचे कारण प्रशासनाला विचारले.यावर प्रशासनाने गोलमोल उत्तर दिले.
सुमेधा नितीन राऊत यांच्या ‘पीपल प्रोगेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीला ‘शैक्षणिक उपक्रमासाठी हा भुखंड देण्याचा हा प्रस्ताव होता.मात्र या सोसायटीची नागपूरात तरी नेमकी कुठे शाळा आहे?ती खासगी आहे की अनुदानित आहे?याची काेणतीही माहीती प्रस्तावात नाही.फक्त सुमेधा राऊत यांच्या सोसायटीला प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु करण्यासाठी नासुप्रचा हा भूखंड देण्यात यावा असे पत्र राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले.मूळात पद व गोपनीयतेची शपथ घेताना राऊत यांनी संविधानाप्रति निष्ठा व्यक्त करताना मी स्वत:ला व कुटुंबियांना वैयक्तिक लाभ पोहोचेल असा कुठलाही निर्णय घेणार नसल्याची शपथ घेतली होती मात्र असे पत्र देऊन आपल्या पत्नीला पदाच्या जोरावर भूखंडाचा लाभ मिळवून देण्यासाठी उर्जामंत्री सरसावले असल्याची खरमरीत टिका बंगाले यांनी केली.

१८ ऑक्टोबर २०२१ रोजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने हे पत्र नासुप्र सभापतींना लिहले.यात अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी हा भूखंड मागण्यात आला आहे.या सोसायटीकडे स्वत:ची जागा उपलब्ध नसल्याने नासुप्रने त्यांच्या अखत्यारितीत असणारा २३ हजार चौ.फूटांचा हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावे करावा असा प्रस्तावच नितीन राऊत यांनी नासुप्र सभापतींना दिला असून ते मंजूर करण्यासाठी पत्र लिहले आहे.विभागीय अधिकारी-उत्तर यांच्या १२ नोव्हेंबर २०२१ च्या अहवालाप्रमाणे मे.अंकित कन्स्ट्रक्शन यांनी खसरा क्र.९७/२(पार्ट)येथील ८६००,०० चौ.मी.जागेचा ताबा प्रन्यासला ५ जुलै २०१४ ला दिलेला असून यातील प्राथमिक शाळेकरिता १८४१.९४९ चौ.मी व माध्यमिक शाळेकरीता ३५६.३८१ चौ.मी.जागा आरक्षीत आहे.उर्वरित जागा बगिचा व १२.०० डी.पी रोड करिता आहे.ही जागा ग्रीन बेल्ट कंट्रोल अंतर्गत प्रन्यासला मिळाली आहे.हा संपूर्ण भूखंड आता पालकमंत्र्यांच्या पत्नीच्या सोसायटीला देण्याचा घाट घातला जात असल्याचे बंगाले यांनी सांगितले.
एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन कुटूंबाला वैयक्तिक लाभ देण्यासाठी कुठलाही शासन निर्णय घेणार नाही अशी शपथ घेतात,दूसरीकडे स्वत:च्या पत्नीला शहरातील अतिशय मोक्याच्या जागेवरील व गरीबांच्या योजनांसाठी राखीव असणारा पाच हजार चौ.फूट पेक्षा जास्त भूखंड पत्नीच्या शैक्षणिक सोसायटीला देण्यासाठी नासुप्र सभापतींना पत्र लिहतात.त्यावर बैठकीत चर्चा पार पडते.आम्ही दोघेही जोपर्यंत विशवस्त म्हूणन कार्यरत होतो तोपर्यंत नासुप्र प्रशासनाने हा प्रस्ताव चर्चेसाठी आणला नाही,४ मार्च रोजी आमचा कार्यकाळ संपताच या प्रस्तावावर चर्चा झडते?असा सवाल बंगाले यांनी केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासुप्रचा हा कारभार बघूनच एकाच शहरात दोन विकास प्राधिकरण नको म्हणन नासुप्रच्या विलीगीकरणाचा अध्यादेश काढला होता.नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी सत्तारुढ होताच नितीन राऊत यांनी सर्वात पहीला प्रस्ताव मंत्री मंडळाच्या बैठकीत कोणता मांडला तर नासुप्रला पुर्नजिवित करण्याचा,त्यांचा तो अतिरेकी अट्टहास कशासाठी होता?हे आता नागपूरकर जनतेसमोर सत्य उजागर झाले असल्याचा टोला संजय बंगाले यांनी हाणला.
याप्रसंगी बोलताना ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेसच्या नेत्यांनी नासुप्रच्या भुखंडांचे श्रीखंड अश्याच पद्धतीने खालले असल्याची घणाघाती टिका केली.यात सतीश चतुर्वेदी असो,राजेंद्र मुळक असो या सर्वांनी नासुप्रच्या मोक्याच्या जागा एक रुपया लिजवर घेऊन त्यावर आपले अभिषिक्त शैक्ष् णिक साम्राज्य उभारलेले नागपूरकर बघतच आहेत,अशी टिका केली.अगदी अंगणवाडीपासून तर अभियांत्रिकी,वैद्यकीय महाविद्यालये उभारली.काँग्रेसची सत्ता राज्यात येताच यांना आपाल्या कुटूंबियांसाठी शासानाच्या जागा लाटायची घाई झाली.१५०० चौ.फूटांच्या आत असणा-या जागांसाठी फडणवीस यांच्या कार्यकाळात ११२ रुपये प्रति चौ.फूटांचा प्रस्ताव आला होता मात्र तो त्यांनी फेटाळला.गरीबांच्या हक्काच्या घरांसाठी त्यांनी ५६ रुपयेच रेडीरेकनरचा दर कायम ठेवला.फडणवीस यांनी राज्याच्या तिजोरीतून विकास साधला,गरीबांवर भुर्दंड नाही बसवला.मात्र नासुप्र सभापतींनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दबावाखाली येऊन सात ऐवजी तीन दिवस आधी नोटीस काढली व आज बैठकीत प्रस्ताव मंजूर करुन घेतला.एखाद्या मंत्री पदावर असणा-या राजकीय नेत्याला शासनाची जमीन आवंटित होऊ शकते का?कारण २०११ साली जेव्हा ही सोसायटी निर्माण झाली तेव्हा ही सोसायटी पत्नी सुमेधा व नितीन राऊत मिळून ही सोसायटी स्थापन झाली असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे,आता त्याच सोसायटीसाठी ते पाच हजार चौ.फूटांचा भूखंड आवंटित करुन मागतात आहेत?
त्यांच्या या कृत्याविरोधात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांचा राजीनामा घ्या,अशी देखील मागणी करणार नाही कारण ते त्या पात्रतेचे देखील नाहीत.फक्त नासुप्र सभापतींनी हा प्रस्ताव मंजूर केला तो निरस्त करण्यात यावा अशी मागणी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा