

जवळपास पाचशे युवकांना मिळाले ऑफर लेटर
उद्या रविवारी समिटचा समारोप
नागपूर,२६ मार्च २०२२: कौशल्यपूर्ण युवकांच्या शोधात असलेल्या कंपन्या आणि रोजगाराच्या शोधात असलेले युवक यांना एका व्यासपीठावर आणून, संधीची नवी दालने खुली करणा-या युथ एम्पावरमेंट समिटला संपूर्ण विदर्भातील युवक-युवतींचा उत्साही प्रतिसाद लाभत आहे.. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी समिटचे उद् घाटन झाले आणि उत्साही युवावर्गाने नोंदणी करण्यास सुरुवात केली.
आज युवावर्गाच्या हाती सहज उपलब्ध असलेल्या, डिजीटल माध्यमातून या समिटसाठी नोंदणी करायची होती. अवघ्या दोन दिवसात तब्बल १६,५४० युवक-युवतींनी नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी, ४५८ उमेदवारांना संबंधित कंपनीकडून ऑफर लेटरदेखील प्राप्त झाले असून, आणखी ३१२ जणांना ते मिळणार आहे, हे उल्लेखनीय! यूथ एम्पॉवरमेंट समिट म्हणजे युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार अशा दोन्ही क्षेत्रात सशक्त करण्यासाठी केलेले आयोजन आहे. आज शनिवार, दि.२६ मार्च रोजी समिटच्या दुस-या दिवशी, युवकांसाठी मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले.

पहिल्या सत्रात, इंडोरामा कंपनीचे कार्मिक अधिकारी सुरेश पडगिलवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यशाची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी उद्योजिका किर्तीदा अजमेरा होत्या. यावेळी, पडगिलवार यांनी मुलाखतीची तयारी, ड्रेसकोड, वेळेचे नियोजन आणि संवादशैली या विषयांवर मार्गदर्शन केले.
दुस-या सत्रात, टाटा एअरोस्पेस लिमिटेड अर्थात टालचे कार्मिक अधिकारी वैभव झारकर यांनी ‘विद्यार्थी ते प्रोफेशनल हा प्रवास संवादातून मांडला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या. नवीन नोकरीत जे काम आपल्याला मिळाले आहे ते कमी दर्जाचे न समजता इतर सहका-यांसोबत काम करण्याचे कौशल्य विकसित करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी विशाल भोसले होते.
यूथ एम्पॉवरमेंट समिट २०२२चा रविवारी समारोप-
फॉरच्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या यूथ एम्पॉवरमेंट समिटचे यंदाचे आठवे वर्ष होते. रविवार २७ मार्च रोजी या समिटचा समारोप होणार असून, रविवारी सकाळी १० वाजता यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर, समिटचा समारोप होईल.

आमचे चॅनल subscribe करा