
आमदार विकास ठाकरे यांचा लक्षवेधीला घेऊन विधान सभेत संताप
मुख्यमंत्र्यांच्याच विरोधात पत्र परिषद घ्यावी का?ठाकरेंचा ठाकरेंसाठी मार्मिक प्रश्न
नाशिकच्या लक्षवेध्यांना प्राधान्य, उपराजधानी उपेक्षीतच
नागपूर,ता.२५ मार्च २०२२: राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागात खोट्या जाहीरातीतून अंदाजे शंभर कोटींचा घोटाळा झाला असल्याची लक्षवेधी पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विधान सभेत लावली.गेल्या पंधरा दिवसांपासून ते या लक्षवेधीसाठी पाठपुरावा करीत होते,आज देखील विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कक्षात जाऊन भेटले मात्र एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लक्षवेधींनाच कामकाजात वारंवार स्थान मिळात असल्याने आज आ.विकास ठाकरे यांचा विधान सभेत चांगलाच भडका उडाला.एवढ्या गंभीर विषयावर लक्षवेधी लागणार नसेल तर आता हे खाते ज्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहेत त्यांच्याच विरोधात आता पत्र परिषद घ्यावी का?असा दमच त्यांनी आज विधान सभेत दिला.
माहिती व जनसंपर्क विभागातील हा संपूर्ण घोटाळा आ.विकास ठाकरे यांनीच गेल्या विधी मंडळ अधिवेशनात बाहेर काढला होता. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजय आंबेकर यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले होते.अजय आंबेकर हे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक होते.ठाकरे यांनी हा घोटाळा बाहेर काढताच दोन वर्षांपूर्वीच आंबेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन अमेरिकेत पलायन केले.मात्र अधिवेशनात याचा चांगलाच बोभाटा झाल्याने आंबेकर हे भारतात आले व पत्र परिषद घेऊन ते भारतातच असल्याचे सांगितले.
या विभागातील अधिका-याने बोगस जाहीरातीतून कोट्यावधीची माया जमवली.कोणतीही,कुठेही जाहीरात प्रसिद्ध न करताच बिलांचे भुगतान उचलले.नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्यासारखाच हा प्रकार आहे. एस.टी.महामंडळाच्या बसेसच्या मागे असणा-या जाहीरातीत देखील गौडबंगाल केला.आ.ठाकरे यांच्या पत्रानंतर एस.टी.महामंडळाने चौकशी केली.या चौकशीत आंबेकर हे दोषी सिद्ध झाले.इजराईल देशाचा दौरा,महात्मा फूले चित्रपटाच्या जाहीराती यामध्ये अनियमितता आढळण्यासोबतच अनेक महत्वाच्या फाईल्सच या विभागातून गायब झाल्या!
besil नावाची कपंनी तर या विभागाने ६ कोटी देऊन फक्त यासाठी नेमली की इतर राज्यात प्रसिद्ध होणा-या जाहीरातीं लावण्यात आल्या की नाही हे बघण्यासाठी या विभागाने ६ कोटींचा कंत्राट या खासगी एजंसीला दिला.
हे खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारित आहे.आ.विकास ठाकरे यांनी पत्र देऊन या अतिशय गंभीर गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.विधान सभेत त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे व राज्यातील जनतेचे लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न केला मात्र विधान सभा उपाध्यक्षांनी आ.विकास ठाकरे यांची लक्षवेधी पटलावर न घेतल्याने आ.विकास ठाकरे यांचा आज चांगलाच भडका उडाला.विधान सभेच्या उपाध्यक्षांना किमान लक्षवेधींच्या विषयांचे गांर्भीय तरी लक्षात घ्यायला हवे,असा संताप त्यांनी उघडपणे व्यक्त केला.फक्त नाशिक जिल्ह्याच्याच अनेक लक्षवेधींना पटलावर स्थान मिळतं,उपराजधानीतील शंभर कोटींचा घोटाळा हा गंभीर नाही का?असा संताप व्यक्त करताच,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या विषयावर त्यांच्या कक्षात बैठक घेण्याचे आश्वासन विधान सभेत आ.विकास ठाकरे यांना दिले.
पूर्वी राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागांद्वारे जाहीराती प्रसिद्ध होत होत्या.फडणवीस सरकारने सर्व विभागाच्या जाहीराती या माहिती व जनसंपर्क विभागाद्वारेच प्रसिद्ध होतील असा अध्यादेश काढला यानंतर हा विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला असा आरोप विकास ठाकरेंचा आहे.वेगवेगळ्या विभागातील बोगस जाहीरातीच्या प्रसिद्धीतून कोट्यावधींची माया जमविणा-या अजय आंबेकर यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आमचे चॅनल subscribe करा