Homeनागपूर न्यूजनगरसेवकांनो ’माजी’उपाधी वापरा अन्यथा होणार प्रशासकीय कारवाई

नगरसेवकांनो ’माजी’उपाधी वापरा अन्यथा होणार प्रशासकीय कारवाई

 नावासमोर मनपा पदाचा उल्लेख तसेच मनपा बोधचिन्हाचा वापर केल्यास होऊ शकते कारवाई

नागपूर, ता. २१ : सन २०१७ चे मनपा सार्वत्रिक निवडणूकीनंतर अस्तीत्वात आलेल्या मनपाचे नगरसेवक,पदाधिकारी यांच्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नागपूर महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी व सभागृह सदस्य अर्थात नगरसेवकांनी कार्यकाळ संपल्यानंतर आता त्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख करतांना ‘माजी’ असे नमूद करणे अपेक्षीत आहे. सोशल मीडियासह अन्य बॅनर, कार्यक्रम पत्रिकांवर माजी सदस्यांच्या नावांपुढे ‘माजी’ असे नमूद न केल्यास व मनपा पदाचा व बोधचिन्हाचा वापर केल्यास संबंधित आयोजक, संस्थांचे पदाधिकारी किंवा पोस्ट करणा-या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाउ शकते. मनपाचे सर्व माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी अनावधानाने किंवा हेतूपुरस्पररित्या अशी चूक होणार नाही याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नगरसेवकांचा कार्यकाळ ४ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला. यानंतर महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र यानंतरही विविध कार्यक्रमाच्या पत्रिकांमध्ये नगरसेवकांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या नावासमोर ‘माजी’ शब्दाचा वापर केला जात नाही. तसेच सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या नावाच्या समोर ‘माजी’ लिहिले जात नाही. याशिवाय माजी नगरसेवक मनपाचे बोधचिन्ह, लेटरहेडचा वापर करीत असल्याबाबत मनपा प्रशासनास तक्रारी प्राप्त होत आहेत. मनपा पदांच्या अशा नामोल्लेखामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.

माजी नगरसेवकांना तसेच मनपा पदाधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीनंतर आपल्या नावासमोर ‘माजी’ शब्दाचा वापर करणे अपेक्षीत आहे. तसेच विविध संस्थांकडून कार्यक्रमाची पत्रिका छापतांना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांचा नावासमोर ‘माजी’ शब्दाचा वापर करणे अपेक्षीत आहे. संस्थांनी/व्यक्तींनी त्यांच्या नावासमोर ‘माजी’ शब्दाचा वापर न केल्यास व कार्यरत पदाचा उल्लेख केल्यास संबंधित संस्थांचे पदाधिकारी किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तसेच स्वत: पदाधिका-यांनी,नगरसेवकांनी गैरवापर केल्यास संबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, याची नोंद घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Latest बातम्या