Homeनागपूर न्यूजराज्यातील महिलांना दिलासा:अन्याय अत्याचार रोखण्यासाठी हेल्पलाइन

राज्यातील महिलांना दिलासा:अन्याय अत्याचार रोखण्यासाठी हेल्पलाइन

Advertisements

आभा पांडे यांचे तक्रारी नोंदवण्याचे आवाहन
नागपूर,ता. १५ : राज्यातील महिलांना त्यांच्यावरील अन्याय,अत्याचाराच्या घटनांबाबत आता तक्रार नोंदवता येणार आहे,कायदेशीर सल्ला देखील घेता येणार असून यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य महिला आयोगासाठी टोल फ्री हेल्पलाईन सुरु केली आहे.महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी राज्यातील महिलांना १५५२०९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

महिलांवर होणारे कौटूंबिक अत्याचार,कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक,मानसिक छळ,यामुळे येणारे भावनिक नैराश्‍य,यासाठी महिलांच्या मदतीकरिता व मार्गदर्शनाकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ‘सुहिता’ नावाची समुपदेशन हेल्पलाईन यापूर्वी देखील अस्तित्वात होती मात्र हा हेल्पलाईन क्रमांक जास्त डिजिटमध्ये असल्याकारणाने तो सहज लक्षात ठेवणे महिलांना अवघड जात होते.आयोगाचा टोल फ्री कमांक असणे ही महिलांसाठी दिलासादायक बाब होती.टोल फ्री क्रमांक महिलांच्या सहज लक्षात राहू शकतो व महिलांना आयोगाकडे तक्रारी नोंदवण्यात अडचण निर्माण होणार नाही,असे आभा पांडे यांनी सांगितले.

महिलांच्या छेडछाडीशी संबंधित समस्या सोडवणे,बालविवाह विरोधी मोहीम राबवणे,कामाच्या ठिकाणी महिलांच्या शोषणाच्या तक्रारींची दखल घेणे,बलात्कार पीडित महिलांच्या संदर्भात तात्काळ प्रभावी कारवाई करणे याबाबत राज्य महिला आयोगाने कठाेर पावले उचलली आहेत.त्यामुळे महिलांवर कौटूंबिक हिंसाचार,लैंगिक अत्याचार,कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी,विनयभंग यासारख्या तक्रारी १५५२०९ या हेल्पलाईनवर करता येणार असल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.

महिला आयोगाची संपर्क क्रमांकाची डेटाबँक-
एखादी महिला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेल्यावर तक्रारदार महिलेला पोलिस सहकार्य करीत नाही,हे अनेक घटनांवरुन सिद्ध झाले आहे.न्यायाची पहीलीच पायरी ही एफआयरआरची प्रत असते.त्यामुळे तक्रारदार महिलांनी आता हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास संबंधित पोलिस ठाण्यात थेट संपर्क साधून तक्रार नोंदवून घेण्यास का टाळाटाळ होत आहे,याची शहनिशा केली जाईल.याशिवाय या हेल्पलाईनवर समुपदेशकांची नियुक्ती केली जाणार असून,तक्रारदार महिलेला समुपदेशकाची गरज भासल्यास फोनवरच समुपदेशन देखील केले जाईल.एवढंच नव्हे तर गरज पडल्यास महिला आयोगाच्या कार्यालयातही पीडीत महिलांचे समुपदेशन केले जाईल.राज्यातील सर्व पोलिस ठाणे,रुग्णालये व जिल्हाधिका-यांच्या संपर्क क्रमांकांची डेटाबँक तयार करण्याचे काम देखील आयोगातर्फे सुरु असल्याची माहिती आभा पांडे यांनी दिली.

Latest बातम्या