
कुकरेजा यांचा तोडफोडीचा आरोप खोटा: दोषींवर कारवाई करा:काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
कुकरेजा यांना जामिन:सिंधी समाज संस्थांच्या पाठींबेचा दावा
नागपूर,ता.४ मार्च: नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र.१ चे नगरसेवक विरेंद्र उपाख्य विकी कुकरेजा यांच्या कार्यालयातील कथित तोडफोडीचे कवित्व नागपूरात गाजले.युवा काँग्रेसचा कार्यकर्ता बाबू खान याने काही महिलांसह जरीपटका येथील कुकरेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयात घूसून तोडफोड केली,कुकरेजा यांना मारहाण केल्याचा आरोप केला तर बाबू खान व त्याच्यासोबत असणा-या महिलांनी कार्यालयात कुकरेजा व त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करुन विनयभंग केला,जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत कुकरेजा यांच्यावर अट्रासिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फे-या झडल्या व दोन्ही पक्षाने प्रेस क्लब गाठून पत्र परिषदा घेतल्या.त्यात आज शुक्रवार दि.४ मार्च रोजी आणखी एका पत्र परिषदेची भर पडली यात काँग्रेसचे अनिल नगरारे,नगरसेविका नेहा निकोसे व सुरेश जग्यासी यांनी पत्र परिषद घेऊन कुकरेजा यांच्या कार्यालयाच्या आत बाबू खान व महिलांना कुकरेजा व त्याच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीचा व्हिडीयो दाखवला.या व्हिडीयोत कुकरेजाचे कार्यकर्ते बाबू खान याला बेदम मारहाण करताना स्पष्ट दिसत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तर दुसरीकडे कुकरेजा यांनी त्यांना विविध सिंधी समाज संस्थांचा पाठींबा असल्याचे पत्रक जारी केले असून सत्र न्यायालयाने कालच गुरुवार दि.३ मार्च रोजी कुकरेजा यांना अट्रासिटी व विनयभंग प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे,हे विशेष!
हूडको कॉलनी प्रभाग.क्र १ मध्ये बापूना वाईन शॉपच्या पहील्या व दुस-या गल्लीतील गडर लाईनवर अतिक्रमणामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचा त्रास भयंकर वाढला आहे,या प्रभागाचे नगरसेवक विकी कुकरेजा यांना वारंवार निवेदन देऊन देखील समस्या सुटली नाही,घरातील लहान मुले वारंवार आजारी पडत असल्यामुळे आपल्या मुलांबाळांसह या भागातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कुकरेजा यांना जाब विचारायला त्यांच्या कार्यालयात पोहोचला.तेथील कार्यकर्त्यांनी कुकरेजा कार्यालयात नसल्याचे सांगितले मात्र आमच्या समस्यांचं निराकरण करा असा वाद महिलांनी घातला,या गोंधळाचे चित्रण मोबाईलमध्ये त्यांच्यासोबत आलेला मुलगा करीत होता.या महिलांसोबत बाबू खान देखील होता.कुकरेजा यांच्या कार्यालयातील जगदीश नावाच्या कार्यकर्त्याने मोबाईल चित्रण बंद कर तुला काय पूर्ण इंडियामध्ये व्हिडीयो पाठवायचा आहे का?अशी दमदाटी करुन मोबाईल हिसकला यामुळे चिडून बाबू खान याने मोबाईलमध्ये चित्रण करणा-या मुलाच्या हातातील मोबाईल घेऊन पून्हा कॅमरा ऑन केला.
यावर वाद वाढत गेला व कुकरेजा याने ‘तुम्ही मला वोट दिले नाही,हमारे ही पैसो से हम जितके आये है,आपके पैसो ने मुझे नही जिताया’अशी अरेरावी केली.भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या या वेळी कुकरेजा यांच्या कार्यालयात उपस्थित होती,त्यांनी सर्व महिलांचे मोबाईल हिसकावले,महिलांनाही कार्यालया बाहेर धक्काबुक्की करुन पिटाळून लावले यात एका महिलेचा ब्लाउजचा मागील बंद ही तुटला,जो तिने आज रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.१५ वा.तातडीने प्रेस क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्र परिषदेतही दाखवला,ती तोच ब्लाऊत घालून पत्र परिषदेत आली होती.उपरोक्त संपूर्ण घटनाक्रम बाबू खान,गंगा बंडू वाघमारे,सोनिया रॉय,चंदा मुरलीधर वाघमारे,शोभा पाटील,मीना बैस आदींनी पत्र परिषदेत कथन केला होता..
कुकरेजा यांच्या कार्यालयात संजय चौधरी,खेमराज धमाल,जगदीश वंभानी,मुन्ना पाटील आदी कार्यकर्त्यांनी मला मारझोड करुन माझ्या मागे दगड घेऊन धावले,असा आरोप बाबू खान याने केला होता..आम्ही फक्त पंधरा ते वीस महिलांच कुकरेजा याच्या कार्यालयात गेलो होतो,आमच्यासोबत फक्त आमची पोरंसोरं होती,बाबू खान आणि एक दोन मुले होती होता,आम्ही फक्त दोन पुरुष घेऊन कुकरेजा याच्या कार्यालयाची तोडफोड करायला जाणार होतो का?असा प्रश्न गंगा वाघमारे यांनी उपस्थित केला.
आम्हालाच मारहाण झाली,शिवीगाळ झाली,कुकरेजा याने ‘मांग,चांभार कही के जुते मारके इनको बाहर भगाओ’ अश्या शब्दात अपमान केला जो आम्हाला कसा सहन होणार असल्याचे त्या म्हणाल्या,आम्ही फक्त तोंडी वाद घालत होतो,आम्ही कोणतीही तोडफोड केली नाही,कुकरेजाचे इतके सारे कार्यकर्ते कार्यालयात असताना आम्ही तोडफोड करु शकतो का?असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला होता.
कुकरेजा यांनी देखील शहराध्यक्ष प्रवीण दटके व उत्तर नागपूरचे माजी आ.डॉ.मिलिंद माने यांच्या सहभागाने पत्र परिषद घेऊन बाबू खान याने महिलांसोबत त्यांच्या कार्यालयात येऊन तोडफोड केल्याचा आरोप केला होता.त्यांचा शर्ट फाडला,त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
मात्र आज काँग्रेसतर्फे व्हायरल केलेल्या व्हिडीयोमध्ये कुकरेजा व त्याचे समर्थक बाबू खानला घेरुन बेदम मारहाण करताना दिसून पडत आहे.विशेष म्हणजे दटके यांनी पत्र परिषदेत ज्या सोमकुवर यांचा बाबू खानने पदर ओढल्याचा आरोप केला होता,या व्हिडीयोमध्ये त्या सर्वात मागे उभ्या असलेल्या दिसून पडत आहे.कुकरेजा,त्यांचे कार्यकर्ते,बाबू खान व महिलांमध्ये ही संपूर्ण झटापट होत असताना सोमकुंवर या मागेच उभ्या होत्या त्यामुळे त्यांचा पदर बाबू खानेने खाली खेचला हा कुकरेजा याचा आरोप खोटा असून बाबू खानवरील खोटे गुन्हे पोलिसांनी मागे घेण्याची मागणी निकोसे यांनी केली.
याशिवाय कुकरेजा याच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा बनाव देखील पोलिसांनी उघडकीस आणावा. बाबू खानला घेरुन मारहाण केली जात असताना स्पष्ट दिसून पडत असताना त्याने व महिलांनी कार्यालयाची तोडफोड कधी केली?असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्र परिषदेत उपस्थित केला.
खोटे आरोप करणा-यांना त्वरित अटक करावी,सीसीटीव्ही कॅमरे जे कुकरेजाने घटनेनंतर त्वरित हालचाल करुन काढून टाकले ते जप्त करावा व ख-या आरोपींना अटक करण्याची मागणी आज काँग्रेसतर्फे पत्र परिषदेत करण्यात आली.
नुकतेच काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी देखील पत्र परिषद घेऊन जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती.
मला सिंधी समाज संस्थांचा पाठींबा-कुकरेजा यांचा दावा
आज सिंधी समाजातील बहूतांश संस्थांनी मुक्तिधाम मंदिरात बैठक घेऊन नगरसेवक विकी कुकरेजा यांच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीचा निषेध व्यक्त केला असे कुकरेजा यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुस-या पक्षाच्या कार्यालयात जाऊन चुकीच्या पद्धतीने आपली समस्या मांडणे व ती साेशल मिडीयावर व्हायरल करण्याच्या हेतूने कार्यालयात येणे चुकीचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेनंतर ज्या प्रकारे जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला व कुकरेजा व त्यांच्या सहका-याविरुद्ध अट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला त्यांची देखील निंदा बैठकीत करण्यात आली.सामाजिकरित्या सिंधी समाजाचे नगरसेवक कुकरेजासोबत उभे असल्याचे अभिवचन या संस्थांनी दिले.सिंधी समाज हा हिंदू,बौद्ध तसेच इतर सर्व समजाचा सन्मान करतो मात्र एका व्यक्ति विषेशला टारगेट करुन अश्या प्रकारची घटना घडवून आणने योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.पोलिस प्रशासनाने याची सखोल तपासणी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. बैठकीत सिंधु युवा फोर्सचे पदाधिकारी,सिंधी सोशल फोरम,पूज्य घोटकी पंचायत,भारतीय सिंधु सभा,अखिल भारतीय सिंधी समाज,आहूजा नगर पंचायत तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा