
गेल्या दोन वर्षांपासून नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अभिषेक सिंग फरारी
उर्जामंत्री नितिन राऊत यांनी राजीनामा द्यावा:धोटे यांची मागणी
सदर पोलिस ठाण्यात नोंदवली तक्रार
नागपूर,ता.२१ फेब्रुवारी २०२२: एकीकडे महाराष्ट्रासारख्या ‘पुरोगामी’ व ‘सुसंस्कृत राज्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची दररोज धुळवड उडत आहे,कोण किती खंडणीखोर,भ्रष्ट व मारेकरी आहे याचा पाढाच महाराष्ट्राच्या जनतेसमोर दररोज वाचला जात आहे हे सर्व बघून व ऐकून सत्ता चालवणारे हे ‘सत्ताधारी आहेत की हत्येकरी?’असा प्रश्न महाराष्ट्राच्या सुजाण जनतेच्या मनात निर्माण झाला आहे,नुकतेच शिवसेना नेते संजय राऊत व खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेतून ‘भाजपवासी खासदार’ झालेल्या नारायण राणेंच्या कार्यकाळात सिंधूदूर्ग जिल्ह्यात दरोड्यापासून तर खंडणीपर्यंत व या ही पुढे जाऊन रमेश गोवेकर,अंकूश राणे,सत्यविजय भिसे,मंचेकर यांची हत्या कोणी केली?श्रीधर नाईक यांच्या हत्येतील आरोपी कोण आहे?सांगायला भाग पाडू नका,असा इशारा देताच राणे यांनी पलटवार करीत, ८ जून २००२० रोजी दिशा सालियानवर बलात्कार कोणी केला?बलात्कार होत असताना बाहेर कोणाचे संरक्षण होते?रमेश मोरेची हत्या कोणी केली?जयंत जाधवची हत्या कोणी केली?सुशांतसिंह राजपूतची हत्या आहे की आत्महत्या?प्रश्नांची अशी सरबत्ती केली. सामान्य लोकांच्या मनाचा थरकाप उडवणा-या आरोप-प्रत्यारोपची धुळवड महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याच्या राजधानीत सुरु असतानाच, आता उपराजधानीत देखील असाच न्याय व नीतीमत्तेचे अक्षर:शहा धिंधवडे उडवणारा प्रकार राज्याचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्याच कृतीतून उघडकीस आला.नागपूर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये मकोकाचा अारोपी अभिषेक सिंग हा चक्क अद्यापही ‘फरार’आहे मात्र स्वत:राज्याच्या उर्जामंत्र्यांनीच त्याला मुंबईच्या आपल्या बंगल्यावर गेल्या दोन वर्षापासून आश्रय दिला असल्याची धक्कादायक बाब आज राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी पत्र परिषदेत उजागर केली.

नागपूरचे पालकमंत्री हे चक्क गंभीर गुन्हे दाखल असणा-या एका मकोका व आर्म्स एक्ट अंतर्गत पोलिस विभागाला वॉन्टेड असणा-या अारोपीलाच चक्क ’राजाश्रय’देतात,हेच का पालकमंत्र्यांचे पालकत्व?गुंड,फरारी,समाजविघातक आरोपींना शासकीय बंगल्यांवर आश्रय देणे हीच का डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने लोकप्रतिनिधींना दिलेली शिकवण?असा घणाघाती प्रश्न याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला.
अभिषेक सिंग हा आशुतोष सिंग यांचा मुलगा आहे.त्याच्यावर नागपूरचे तत्कालीन पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी ५ नोव्हेंबर २०२० मध्ये मकोका लावला.संघठीत गुन्हेगारीसोबतच हत्यार बाळगण्याचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल झाला मात्र आज फेब्रुवरी २०२२ साल उजाडलं तरी नागपूर पोलिस विभागाच्या लेखी तो अद्याप फरारच आहे.वास्तवतेत तो उर्जामंत्री नितीन राऊत यांचे कतृत्ववान पूत्र कुणाल राऊत,स्नुषा आकांक्षा राऊतयांच्यासोबत सध्या देशांतर्गत पर्यटनाचा आनंद लृटत आहे.याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी पत्र परिषदेत एलइडी स्क्रीनवर कुणाल राऊत,आकांक्षा राऊत,उर्जामंत्र्यांचे पुतणे अक्षय राऊत,करिश्मा बानू इम्तियाज शेख,पॅक सिंग आदींसोबत मंगरुळू,बंगरुळू,कुर्ग हिल स्टेशन,गोवा,अंदमान निकोबार इ.ठिकाणांवर हा मकोका फरारी आरोपी पर्यटन वारी करीत असल्याचे पुरावे सादर केले.
कुणाल राऊत यांच्या नावे असलेल्या ९९२०९२५००० या मोबाईलवरुन इंडिगो विमानाची ९९ हजार ३२८ रुपयांची तिकीटे बूक झाल्याचा पुरावा त्यांनी स्क्रिनवर दाखवला. ९ जानेवरी रोजी मंगलूरु ते बंगरुलूसाठी इंडिगोचे vmnv 9, ३ जानेवारी २०२२ रोजी बंगलूरु ते पोर्ट ब्लेअर pnr-fkajfm क्रमांकांचे विमान तिकीट कुणाल राऊत यांच्यासह सात जणांच्या नावे बूक असून यात मकोकाचा आरोपी अभिषेक सिंग, पालकमंत्र्यांच्या मुलगा,सून,पुतण्या व इतर मित्रांसोबत सर्रास देश-पर्यटन करताना आढळतोय मात्र नागपूर पोलिसांना तो सापडत नाही?त्यांच्या लेखी तो फरारी आहे?या आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १६ डिसेंबर २०२१ रोजी त्याच्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती मात्र तत्कालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी आरोपीवर लावण्यात आलेल्या गंभीर कलमा बघता याचिका खारिज केली.या आरोपीवर अतिशय गंभीर अश्या मकोकाच्या ३६३,३६४-अ,३८६,३८७,३९७,५०४ व ५०६-ब तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम ३(१),(२) आणि (४) कलम लावण्यात आल्या आहेत,हे विशेष.असे असतानाही ८ सप्टेंबर २०२१ रोजी पॅक सिंग व राऊत कुटुंबियांसोबत हा आरोपी गाेव्यात आंनद लृटताना दिसून पडतो!

(छायाचित्र-फरार मकोका आरोपी अभिषेक सिंग)
एवढ्यावरच राऊत यांच्या सुपुत्राची ‘उर्जा गाथा’संपत नाही तर दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय युवा मोर्च्याच्या बैठकीत ११ सप्टेंबर २०२१ साली हा मकोका फरारी आरोपी, कुणाल राऊत याच्यासोबत सहभागी होतो.युवा मोर्च्याचे राष्ट्रीय समन्वयक अक्षय दळवी,महाराष्ट्राचे युवा मोर्च्याचे अध्यक्ष आमिर शेख यांच्यासोबत, गळ्यात युवा मोर्च्याचा सभासदाचे ओळखपत्र घालून चक्क राहूल गांधींसोबत संवाद साधताे!२०२० पासूनचा हा फरारी आरोपी कुणाल राऊत याच्यासोबत मुंबईत चक्क २२ सप्टेंबर २०२१ सोली महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतो!युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कुणाल राऊत हे फरार मकोका अपराध्याला कवेत घेऊन हीच का ‘बळकटी’ युवा काँग्रेसला प्रदान करीत आहेत?आकांक्षा भवसागर उर्फ आंकाक्षा राऊत उर्फ उर्जामंत्र्यांच्या स्नुषा यांनी कॅम्पेगोडा या आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा एक व्हिडीयो टिकटॉकवर शेअर केला आहे ,त्यात देखील फरार आरोपी अभिषेक सिंग याच्यासोबत इतर सात जण ‘मस्ती के मिजाज में’दिसून पडत आहेत.
काँग्रेस पक्षातील अश्या उर्जावान मंत्र्यांमुळेच एकीकडे उर्जाखाते तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस रसातळाला जात असल्याचा घणाघात धोटे यांनी केला.संपूर्ण देशातूनच काँग्रेससारख्या ऐतिहासिक पक्षाला नामशेष करण्याची शपथ्थ जणू नितीन राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी व युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतली असल्याची टिका याप्रसंगी धोटे यांनी केली.आयपीसी धारा २१२ अन्वये फरार अारोपीला आश्रय देणे अजामीनपात्र गुन्हा आहे,राज्याच्या उर्जामंत्र्यांनीच हा जर गुन्हा केला असेल तर अश्या मंत्र्यांना आता काँग्रेस पक्ष कोणती शिक्षा देणार?असा सवाल ज्वाला धोटे यांनी केला.
नागपूरच्या पोलिस आयुक्तांना आमची विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आरोपीला अटक करावी,आरोपीला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाविरोधात राजाश्रय देणारे उर्जामंत्री,त्यांचा भावी आमदार पूत्र कुणाल राऊत,स्नुषा आकांक्षा राऊत व इतर सर्व ५-६ मित्र मैत्रीणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा,त्यांचे मोबाईल तसेच आरोपीविषयी सोशल मिडीयावरील संपूर्ण तपशील तपासावा व त्वरित कारवाई करावी कारण आम्हाला उत्तरप्रदेशसारखे ’लखीमपूर’नागपूरात एका ‘भावी’ आमदाराकडून घडवून आणायचे नाही,अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली.
आयुक्तांनी इतरांना वेगळा न्याय व आमदार कुटुंबियांना वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न करु नये.ॲड.सतीश उके यांच्या भावाच्या विरोधात १५ दिवसात ३ गुन्हे तत्परतेने नोंदविणा-या पोलिस आयुक्तांनी मकोकाच्या फरार आरोपीला कारागृहात डांबण्यासाठी देखील तेवढीच तत्परात दाखवावी,असा टोमणा याप्रसंगी धोटे यांनी मारला.
आयुक्तांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात दाखल अल्पवयीन मुलीच्या बलात्कार घेटनेत, एमडी या अम्ली पदार्थाच्या नशेत असणा-या सर्व ९ ते १० आरोपींना एमडी नेमका कुठून मिळत होता?नागपूरात पोलिस आयुक्तांचा अम्ली पदार्थ प्रतिबंधक विभाग नेमका करतोय काय आहे?याचा देखील पाठपुरावा घ्यावा.नागपूरातील क्रीकेट बुकी मदन अग्रवालने कुटुंबियांची हत्या करुन आत्महत्या केली,अद्याप त्यांना आत्महत्येसाठी व हत्येसाठी प्रेरित करणारे आरोपी पोलिसांना गवसले नाहीत,मात्र उर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे सीसीटीव्ही फूटेज त्यांनी त्वरित जप्त करावे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील त्यांच्या पक्षाचा उर्जामंत्री हे गुन्हेगारांच्या राजाश्रयाबाबत उर्जावान कसे? याचे उत्तर दोन दिवसात नागपूरकरांना द्यावे,अन्यथा आमच्या पक्षाचा जरी संबंध नसला तरी लवकरच आम्ही दिल्ली गाठून काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी राहूल गांधी व प्रियंका गांधी यांना भेटून सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत काय घडतंय?याची पुराव्यासहित माहिती देऊ,असा इशारा धोटे यांनी दिला.
पत्र परिषद आटोपताच ज्वाला धोटे यांनी सदर पोलिस ठाण्यात पालकमंत्री नितीन राऊत,कुणाल राऊत,स्नुषा आकांक्षा राऊत जसेच इतर यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.
या संपूर्ण घटनाक्रमाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही तर प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ,पक्ष या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करेल व योग्य ती कारवाई केली जाईल,असे सांगितले.
मला या आरोपीविषयीची विस्तृत माहिती आताच सांगता येणार नाही,परंतू एमसीओसीमध्ये बरेच वेळा अनेक आरोपींवर मागे भरपूर गुन्हे असतील असं होणं अनिवार्य नसतं.गँगचे इतर सदस्य किवा गँग लीडरकडून भरपूर गुन्हे किवा तीनपेक्षा जास्त चार्टशीट असल्यास आणि ज्या गुन्ह्यांमध्ये एमसीओसी लावण्यात आले आहेत यामध्ये जे आरोपी असतात त्यांच्यावर आपोआपच मकोका लागत असताक,आता या गुन्ह्याच्या संदर्भात विस्तृती माहिती मला माहिती नाही,अधिक तपशील घेतल्यावर सांगतो.
अमितेश कुमार(पोलिस आयुक्त,नागपूर)

आमचे चॅनल subscribe करा