

आचार्य जितेंद्रनाथ महाराज व देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
नागपूर, ता. ११ : श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने रविवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता झिल्पी तलाव मोहगांव , ता. हिंगणा येथे श्री सिद्धिविनायक गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अंजनगाव सुर्जीच्या देवनाथ मठाचे पिठाधीष आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या शुभहस्ते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत करण्यात येईल.
याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने , खासदार डॉ. विकास महात्मे , माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परीणय फुके, आमदार समीर मेघे , आमदार नागोजी गाणार , आमदार प्रविण दटके यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहतील .
उद्या शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मूर्तींची ग्रामप्रदक्षिणा तसेच पाच सहस्त्र अथर्वशिर्ष आवर्तन होणार आहे.
श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टद्वारे अनेक सामाजिक प्रकल्प कार्यान्वित आहेत . गरजू रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दीनदयाल थाली , कोरोनाबळींच्या गरजू परीवारजनांसाठी ‘सोबत’ म्हणून स्विकारलेले पालकत्व, आर्थिक दुर्बल रूग्णांसाठी आरोग्य शिबिरे व गरज भासल्यास शस्त्रक्रिया , औषधोपचार इत्यादी सेवाकार्य सुरू आहेत. ‘ कर्ता करविता तो ईश्वरच , आम्ही केवळ माध्यम ’ ही भावना ट्रस्ट आणि ट्रस्टच्या विश्वस्त व कार्यकर्त्यांनी सदैव जोपासली आहे .या कार्यास श्री सिद्धीविनायकाचा कायम वरदहस्त लाभतो याची वारंवार प्रचिती आली आहे .
श्रींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे , श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष , ज्येष्ठ समाजसेवक आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा