फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअंकिता जळीतकांड:आरोपीला जन्मठेप

अंकिता जळीतकांड:आरोपीला जन्मठेप

Advertisements

 

मृत्यूदिनी निकाल:हिंगणघाटचे क्रोर्य

हिंगणघाट(जि.वर्धा) ता.१० फेब्रुवारी २०२२: प्रा.अंकिता पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल ओतून जाळल्याच्या प्रकरणात आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली.आरोपीने पेट्रोल ओतून पेटवून दिल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे १० फेब्रुवारी २०२० रोजी अंकिताचा नागपूरात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.तब्बल दोन वर्षांनंतर अंकिताच्या मृत्यूदिनीच आरोपी विक्की नगराळेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काल बुधवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल भागवत यांच्यासमोर सुनावणीला सुरवात झाली.सुनावणीनंतर न्यायालयाने अारोपी विक्की नगराळे याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले.

विशेष सरकारी वकील ॲड.उज्जवल निकम यांनी आरोपीला कोणती शिक्षा द्यावी याबाबत युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात यावी,अशी विनंती केली होती.त्यानुसार न्यायालयाने शिक्षेबाबत आरोपी आणि सरकारी पक्षाला युक्तिवाद करण्याकरिता गुरुवारची तारीख दिली होती.या बहूचर्चित प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.आज निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती.यावेळी पोलिसांचा मोठा ताफा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता.अंकिताचे आई-वडील संगीता व अरुण पिसुड्डे हे ही आज न्यायालयात उपस्थित होते.आरोपीतर्फे ॲड.भूपेंद्र सोने यांनी कामकाज पाहिले.

अंकिता पिसुड्डे ही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणा-या दारोडा गावात राहत होती.तिच्या घश्री आई-वडील,भाऊ असे छोटेच कुटुंबिय होते.वडील शेतकरी तर आई गृहीणी.वेळप्रसंगी शेतात जाऊन आई ही वडीलांना मदत करते.भाऊ शिक्षण घेत आहे.घरची परिस्थिती बेताची असतानाही वडिलांनी दोघा बहीण-भावाला चांगले शिक्षण दिले.अंकिताने वनस्पतीशास्त्रामध्ये पदव्यूत्तरची पदवी प्राप्त केली होती.कुटुंबियांना हातभार लागावा यासाठी जिने नोकरी धरली.जवळपास दोन वर्षांपूर्वी ब-याच प्रयत्नानंतर तिला मातोश्री कुणावार महिला महाविद्यालयात तासिका प्राध्यापिकेची नोकरी मिळाली होती.घरची परिस्थिती बेताची असल्याने महाविद्यालयात जाण्यासाठी तिच्याकडे दूचाकी देखील नव्हती.त्यामुळे ती दररोज बसने जाणे-येणे करीत होती.

सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी अंकिता नंदाेरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना  विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून तिला जाळले व घटनास्थळावरुन पसार झाला.ती मदतीसाठी आेरडत होती मात्र कोणीही तिच्या मदतीसाठी धाऊन आले नाही.काही वेळांनी सहकारी प्राध्यापिका व इतर युवकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले होते.गंभीर भाजल्याने अंकिताला नागपूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र ७ दिवस उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.

नागरिकांनी केली होती विकेशला ताब्यात देण्याची मागणी-
हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना समजताच अनेकांचा रोष अनावर झाला.संतप्त नागरिकांनी आरोपी विकेश नगराळेला त्याच घटनास्थळी पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची मागणी केली.आरोपीला आमच्या ताब्यात द्या,अशी मागणी करण्यात आली यावरुन आरोपीविरुद्ध समाजमनात पेटलला संताप दिसून पडतो.

४० सेकंदांचे संभाषण ठरले महत्वाचे-
अंकिताला पेटवण्या पूर्वी दोन दिवसांअगोदर १ फेब्रुवरीला आरोपी विकेश नगराळे याने ८ वाजून ८ मिनिटांनी अंकिताला फोन करुन तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही,अशी धमकी दिली होती.जिओ कंपनीच्या अधिका-यांच्या साक्षीदरम्यान ही बाब पुढे आली.

एक ही साक्षीदार उलटला नाही-
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण ७७ साक्षीदार होते मात्र केवळ २९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली.यात प्राचार्य उमेश तुळसकर,उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव,पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार,पंच नागपूरच्या श्रीमती देशमुख,अंकिताचे आई-वडील,कार्यकारी दंडाधिकारी,नायब तहसीलदार विजय पवार,नागपूर मेडीकल कॉलेजचे तीन डॉक्टर,जिओ कंपनीचे नोडल अधिकारी फ्रान्सिस परेरा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा यात समावेश आहे.यातील एकही साक्षीदार उलटला नसल्याची माहिती सरकारी वकीलांनी दिली.साक्ष नोंदवितांना आरोपीचे वकी भूपेंद्र सोने यांनी साक्षीचे कामकाज लिहून डिजिटल स्क्रीनवर दाखविण्याची विनंती न्यायालयाला केली,न्यायालयाने ती विनंती मान्य करीत लिखाणाच्या संपूर्ण नोंदी स्क्रीनवर दाखवल्या.

व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष-
करोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे जिओ कंपनीचे पुण्याचे नोडल अधिकारी फ्रान्सिस परेरा प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर न राहता त्यांची साक्ष व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे नाेंदविण्यात आली.जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्यात प्रथमच व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात आली.

कामकाज झाले होते तहकूब-
अंकिताच्या आई संगीता यांची न्यायालयात साक्ष नोंदवली जात असताना भावना अनावर होऊन त्यांना रडू कोसळले.त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे न्यायालयाने पंधरा मिनिटे कामकाज तहकूब केले होते.सुमारे दीड तास त्यांची साक्ष चालली होती.

विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती-
या प्रकरणाची प्रारंभीची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश माजगावकर यांच्यासमोर झाली.त्यानंतर न्यायाधीश राहूल भागवत यांच्यासमोर हे प्रकरण चालले.प्रकरणाचे गांर्भीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने उज्जव निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.सुरवातीच्या काळात सरकारी वकील प्रसाद सोइतकर यांनी व त्यानंतर ॲड.दीपक वैद्य यांनी त्यांना सहकार्य केले.आरोपीच्या वतीने न्यायालयात ॲड.भूपेंद्र सोने,ॲड.ढेकले व नागपूरातील एक वकील असे तिघांचे वकीलपत्र सादर होते.त्यामुळे न्यायालयाने नेमका वकील कोण?याची विचारणा आरोपीला केली व त्याने सांगितल्यानंतर ॲड.सोने यांनी आरोपीतर्फे कामकाज पाहिले.न्याय मिळण्यास उशिर होऊ नये म्हणून न्यायालयाने कोरोना काळतही सुनावणी सुरु ठेवली होती.

सत्र न्यायालयात जाऊ:ॲड.भूपेंद्र सोने(आरोपीचे वकील)
माझा अशील निर्दोष असल्याचे माझे मत आहे.त्याच्यावर या निकालात अन्याय झाला आहे.त्यामुळे मी कोणाताही युक्तीवाद आज केला नाही.न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

शक्ती कायदा संमत-
याच जळीतकांडानंतर राज्यातील महिलांवरील अत्याचाराला चाप बसविण्यासाठी शक्ती कायद्याचे विधेयक लागू करण्यासाठी शासनावर सर्व स्तरातून दबाव आला.२३ डिसेंबर २०२१ रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात शक्ती कायदा एकमताने संमत झाले.महिलांचे सबलीकरण व महिलांविरोधात अत्याचाराला पायंबद बसावा यासाठी या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या.बलात्कार,विनयभंग,ॲसिड हल्ला तसेच समाज माध्यमांमधून महिला व बालकांबद्दल आक्षेपार्ह्य मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करुन बदनामी करणे यावर पायबंद बसवण्याच्या दृष्टिने हा कायदा राज्यात अमलात आला.

असा आहे घटनाक्रम-
३ फेब्रुवारी २०२०:प्रा.अंकिता कॉलेजमध्ये जात असताना आरोपी विकेशने मागून येत अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले.
४ फेब्रुवारी २०२०: आरोपीला बुटीबोरी(जि.नागपूर) येथून अटक.
१० फेब्रुवारी २०२०: अंकिताचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू.
२ मार्च २०२०: ४२६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर.
४ मार्च २०२०: आरोपी विकेशवर आरोप निश्‍चित
९ फेब्रुवारी २०२२ :आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध
१० फेब्रुवारी २०२०: जन्मठेपेची शिक्षा

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या