

मनसर येथे ‘हायटेक सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग पॉलिहाऊस’चे उद् घाटन
नागपूर, २६ डिसेंबर: कृषी तंत्रज्ञानात वेळेनुसार बदल करणे आवश्यक असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांना उपलब्ध झाले आहे. कृषी विज्ञानात ‘व्हर्टिकल फार्मिंग’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतो व त्यापासून कोट्यवधीचे उत्पन्न होऊ शकते, हे आता सिध्द झाले आहे, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री तसेच अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
मनसर येथे आज गडकरी यांच्या हस्ते ‘हायटेक सॉईल बेस्ड व्हर्टिकल फार्मिंग पॉलिहाऊस’चे उद् घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, आ. परिणय फुके, आ. आशिष जयस्वाल, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले,की परिवर्तन हे जीवनाचे सत्य आहे. व्हर्टिकल फार्मिंग सॉईल तंत्रज्ञानाचा वापर करून हळदीचे उत्पादन वाढले हे अनुभवावरून सिध्द झाले आहे. ही हळद निर्यात करण्याच्या क्षमतेची आहे. शेतक-यांची उत्पादने निर्यात करण्याची क्षमता वाढली तर शेतक-यांना डॉलरमध्ये उत्पन्न मिळेल. मी नेहमीच म्हणतो की, ज्ञानाचे संपत्तीत आणि कच-याचे संपत्तीत रुपांतर करणे शक्य आहे. भविष्यात देशाची गरजही तीच आहे. कृषी तंत्रज्ञानातही आता मोठे बदल होत आहेत. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने शेतक-यांचे उत्पादन आणि उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते, असेही ते म्हणाले.
शेतक-याच्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करून किती फायदा होऊ शकतो व ती एक यशस्वी गाथा होऊ शकते, याबाबत आपण प्रयत्न करीत आहोत, असे सांगताना गडकरी म्हणाले,की उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढावे आणि त्याचा दर्जाही उत्तम असावा असे आपले प्रयत्न आहेत. याबाबत विदर्भात काम करण्याची गरज आहे. आपल्याकडे नैसर्गिक संपत्ती खूप आहे. पण आपण त्याचा ५ टक्केही वापर करीत नाही.
आगामी काळात शेतक-यांच्या उत्पादनांची केवळ निर्यात करून चालणार नाही, तर शेतक-यांच्या उत्पादनांचा दर्जा हा उत्तम असावा. त्यामुळे निर्यात वाढणार आहे. शेतक-यांना याचे प्रशिक्षण देऊन हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘अॅग्रो व्हिजन’ च्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.
यावेळी गडकरी यांनी तेलंखेडीजवळ पंकृविचे ‘अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरचीही’ माहिती दिली. या ठिकाणी विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण शेतक-यांना मिळणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतक-यांनी युरिया फवारणी करावी असे सांगताना ते म्हणाले,की आगामी काळात आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतीला नवीन दिशा देणार आहे. तंत्रज्ञानाच्या परिवर्तनाचा फायदा होईल. त्यासाठी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ‘अॅगो व्हिजन’ कृषी प्रदर्शनी ही चांगली संधी आहे.

आमचे चॅनल subscribe करा