फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा अतिक्रमण विभाग अधिका-यांची हॉकर्सच्या पोटावर लाथ

मनपा अतिक्रमण विभाग अधिका-यांची हॉकर्सच्या पोटावर लाथ

Advertisements


भाज्या व फळांची केली नासधूस

रस्त्यांवर भाजी, फळांचा सडा:फूटपा विक्रेत्यांच्या डोळ्यात अगतिकतेच्या ओल्या कडा

ज्वाला धोटे यांची गरिबांना नुकसान भरपाई करुन देण्याचे आव्हान

नागपूर,ता.२७ डिसेंबर २०२१: गेल्या दोन वर्षांपासून एकीकडे करोनाचा कहर सुरु असताना, मायबाप केंद्र व राज्य सरकारने माणसाचे जिनेच लॉकडाऊनच्या सबबीखाली‘लाचार’ केले आहे.हाती असलेला पै नी पै रुग्णालयात खर्च झाला,सलग दोन वर्षे हाताला काम नाही,काम धंदे बंद,नोक-या ही गेल्या तरीही या शहरातील प्रामाणिक माणूस, स्वत:चे आणि आपल्या कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी, मिळेल तो व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालवत आहे.लहानशी पुंजी गुंतवून भाजीपाला,फळ विक्री यासारखा व्यवसाय करीत आहेत.मिळेल त्या जागेवर रस्त्यावरच दूकान थाटून दोन वेळेच्या पोटाची सोय करीत असताना ,मनपाच्या अतिक्रमण विभागाला या गरीब,गरजू फळ व भाजी विक्रेत्यांच्या,नर्सरीवाल्यांच्या पोटाची धग कळत नसल्यामुळेच किवा कायद्याने दिलेल्या अधिकारांची गुर्मी असल्यामुळेच, आज या विभागाने धरमपेठ,लक्षमीनगर,गांधीबाग इ.झोनमध्ये कारवाई करुन रस्ते व फूटपाथ मोकळे करुन देण्याच्या या नेहमीच्या सबबीखाली या गरीब भाजीवाल्यांचे,फळवाल्यांची दूकाने अक्षरश: ‘उधळून’लावली!

रस्त्यांवर आपल्या स्वकष्टाच्या कमाईची नासधूस बघताच अनेकांचे अश्रू अनावर झाले.उदास,भकास चेह-यांनी आता रात्री बायको,पोरांना काय खाऊ घालायचे?उद्याचा दिवस कसा ढकलायचा किंबहूना पोटाची धग जी दररोज आतड्यांना जाळते, ती कशी विझवायची? या विवंचनेत हे हॉकर्स,भाजी,फळ विक्रेते,नर्सरीवाले यांच्या हतबलतेचा हूंदका आजही मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या जुल्मी करवाईमुळे आतल्या आत मूकपणे मृत पावला!

मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे आज सोमवार दि.२७ डिसेंबर रोजी गांधीबाग,झोन क्र.६ अंतर्गत कोतवाली ते बडकस चौक ते गांधी पुतळा ते आझमशाह चौक ते टेलीफोन एक्सचेंज चौक ते परत गांधी पुतळा येथे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली.रस्त्याच्या दोन्ही बाजूचे ४८ अतिक्रमण हटवून १ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

याशिवाय लक्ष्मीनगर झोन क्र.१ अंतर्गत सोनेगाव रोड येथील ठेले व दूकाने हटविण्यात आले.यानंतर लक्षमी नगर चौक ते बजाज नगर येथे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली.

यानंतर धरमपेठ झोन.क्र २ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे कारवाई करण्यात आली.या ही ठिकाणी ठेले व दूकाने हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.याच वेळी अलंकार टॉकिज जे महाराज बाग रोड येथे नर्सरीवाल्यांचे सामान ही जप्त करण्यात आले.

एवढेच नव्हे तर अतिक्रमण पथकाने सकाळी व सायंकाळी अश्‍या दोन्ही वेळा साधून, जिल्हा कार्यालय येथील फूटपाथवरचे समोसे व पातोडीवाल्यांना हूसकाऊन लावले व त्यांचे ठेले,साहित्य जप्त केले.

ही कारवाई अशोक पाटील उपायुक्त व संजय कांबळे प्रवर्तन निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पार पडली..

करोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात बेरोजगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असताना, इमानेइतबारे उदरनिर्वाह करणा-यांना काही काळ देखील पोट भरण्यासाठीची सूट मिळू नये?बेरोजगारीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले असल्याची नोंद स्वत:पोलिस विभागच करीत असताना,फूटपाथ विक्रेत्यांना देखील मनपाचा अतिक्रमण विभाग तोच मार्ग दाखवत आहे का?असा संताप फूटपाथ विक्रेते आता करीत आहे.

मनपात कोणत्याही पक्षाची सत्ता असो,फूटपाथ विक्रेत्यांसाठी सुस्पष्ट धोरण,योजना कोणत्याही पक्षाच्या सत्ताधा-यांना राबवता आली नाही.‘स्मार्ट सिटी’ची टिमकी मिरवणा-या नेत्यांना देखील या शहरातील लाखोच्या संख्येने फूटपाथवर व्यवसाय करुन गुजराण करणा-यांच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढताच आला नाही.

नियम आणि कायद्यांचा बडगा सर्वांसाठी सारखा असताना मनपाचा अतिक्रमण विभाग फक्त गरीब,गरजू फूटपाथ विक्रेत्यांवरच वारंवार हा बडगा उगारताना दिसतो.कोट्यावधींच्या मनपाच्या जमिनी लाटून त्यावर ‘सप्त तारांकित’रुग्णालय उभारणा-यांवर,बंगले,महाल आणि मॉल्स उभारणा-यांवर मात्र मनपाचा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यास मात्र धजत नाही.

मनपाच्या बाजार विभागाकडून शहरातील या लहान व्यवसायिकांसाठी विविध बाजारपेठांमध्ये जे ओटे व दूकाने बनवण्यात आली त्यातही घूसखोरी करुन अनेक सत्ताधा-यांच्या नातेवाईकांनाच नव्हे तर वाहनचालकांना देखील दूकाने अलॉट झालीत मात्र भ्रष्टाचाराच्या या प्रकारांवर नियम व कायद्यांतर्गत, कायदेशीर कारवाई करण्यास मनपाचे विभाग ‘धृतराष्ट्र’होऊन जातात.

राजकारण्यांना सत्तेसाठी मते सामान्य नागरिकांची,फूटपाथ विक्रेत्यांची हवी असतात,सत्ता मात्र धनदांडग्यांच्या लाभासाठीच राबवताना दिसून पडतात.एकाही सत्ताधारी नेत्याने अतिक्रमण विभागाला निदान करोनाच्या काळात गरीबांचे उदरनिर्वाहाचे साधन हिसकावू नये अशी मागणी केली नाही.

वारंवार फूटपाथ विक्रेत्यांचे सामान जप्त करने,फळे,भाजीपाला रस्त्यांवर उधळून लावण्याचा उन्माद करने, यातच कायद्याचे पालन समजणा-या मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांना, आज    राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी ही खडे बोल सुनावले.

गरिबांचे केलेले नुकसान अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांच्या पगारातून भरुन देण्याची मागणी ज्वाला धोटे यांनी केली.एक तर त्यांच्या घरातली चूल पेटवण्याची सोय करुन द्या किवा त्यांना फूटपाथवर किमान कोरानाच्या संकटकाळात धंदा करु द्या,अशी मागणी त्यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या