

चित्रपट रसिकांना दर्जेदार चित्रपटांची पर्वणी
नागपूर, १५ डिसेंबर: ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा शनिवार दि. १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिका, सप्तक आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या सहकार्याने होत असलेल्या या महोत्सवाचे उद् घाटन १८ तारखेला सायंकाळी ५ वाजता राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, चित्रपट अभ्यासक समर नखाते यांची प्रमुख उपस्थिती राहील, अशी माहिती ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ओसीआयएफएफचे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजन करण्यात येते. परंतु, कोविड महामारीमुळे हा चित्रपट महोत्सव होऊ शकला नाही . त्यामुळे १८ व १९ डिसेंबर रोजी पर्सिस्टंट सिस्टीम, आयटी पार्क येथे कालिदास सभागृहात हा चित्रपट महोत्सव घेण्यात येणार आहे.
महोत्सवाची सुरुवात १८ तारखेला सकाळी १० वाजता ‘कर्फ्यू’ या इप्जिप्तच्या चित्रपटाने होणार आहे. महोत्सवात एकुण ८ चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून त्यातील चार चित्रपट भारतातील तर चार चित्रपट परदेशातील राहतील.
‘गोत’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते शैलेंद्र बागडे आणि ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक विठ्ठल भोसले हे चित्रपटानंतर आपले मनोगत व्यक्ती करतील.
पत्रकार परिषदेला ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे सचिव विलास मानेकर, सदस्य रवींद्र डोंगरे, डॉ. उदय गुप्ते व रश्मी सोवनी यांची उपस्थिती होती.


नागपूरच्या ‘गोत’चे प्रदर्शन –
चित्रपट महोत्सवात नागपूरचे दिग्दर्शक व निर्माते शैलेंद्र बागडे यांचा ‘गोत’ हा आदिवासी प्रथेवर आधारित चित्रपट १९ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. वैदर्भीय कलावंतांचा सहभाग असलेल्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण छत्तीसगढच्या सीमेवर करण्यात आले आहे. याशिवाय, सध्या नागपुरात कार्यरत असलेले आयकर सहआयुक्त विठ्ठल भोसले यांचा ‘फिरस्त्या‘ हा चित्रपटदेखील प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच भारतातील ‘पीग’ व ‘कॉट’ हे दोन चित्रपट, जपानचा ‘टू मदर्स’, नॉर्वेचा ‘सिस्टर्स’, फ्रांसचा ‘टुवर्डस द बॅटल’, इजिप्तचा ‘कर्फ्यू’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.
कोविड लसीचे दोन डोज घेतलेल्यांना प्रवेश –
चित्रपट महोत्सवात कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. ५० टक्के उपस्थितीत होणा-या या महोत्सवात मास्क अनिवार्य करण्यात आले असून कोविड लसीचे दोन डोज घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. दर्शकांनी त्यासंदर्भात प्रमाणपत्र सोबत ठेवायचे आहे, असे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.
……….




आमचे चॅनल subscribe करा
