फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवैदर्भीय प्रतिभांसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव प्रेरणास्थान:गडकरी

वैदर्भीय प्रतिभांसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव प्रेरणास्थान:गडकरी

Advertisements

खासदार सांस्‍कृति‍क महोत्‍सवात देशभक्‍तीचा जागर १७ ते २६ डिसेंबर दरम्‍यान

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव’ मध्‍यवर्ती संकल्‍पना

प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते उद् घाटन.

स्‍थानिक, राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील कलाकाराचा सहभाग.

नागपूर,ता.१२ डिसेंबर: सलग तीन वर्षांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले मात्र गेल्या दोन वर्षात करोना या जागतिक महामारीमुळे या महोत्साचे आयोजन करता आले नाही,करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नुकतेच खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेत ४५० वैदर्भिय व स्थानिक कलावंतांनी सहभाग नोंदवला होता,एकूण २३ नाट्य या स्पर्धेत सादर झाले,मी स्वत: काही नाटकांना उपस्थित होतो,स्पर्धेतील सर्व कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले होते,आपल्या विदर्भात प्रतिभेची उणीव नाही फक्त त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे.नवीन कलावंतांना संधी मिळत नाही,अश्‍या वेळी खासदार सांस्कृतिक महोत्सव नव्या,प्रतिभावान कलावंतांसाठी प्रेरणास्थान ठरते,असे विधान केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ते चिंचभवन जवळील साऊथ मेट्रो स्टेशन येथील सभागृहात आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत वैदर्भिय स्थानिक एक हजार कलावंतांनी एक साथ एकाच मंचावर खासदार सांस्कृतिक महोत्सवात आपापली कला सादर केली होती.याच महोत्सवात स्थानिक कलावंतांचा सत्कार देखील करण्यात आला.

नागपूरात ज्येष्ठ महिलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात हजारो ज्येष्ठ महिलांनी हिरिरीने सहभाग नोंदवला होता.त्यामुळे लोकांना फक्त संधी हवी आहे हे माझ्या लक्षात आले. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांची सूचना आहे हा महोत्सव जिल्हा पातळीवरही झाला पाहिजे.आमची देखील हीच ईच्छा आहे.यासाठी निश्‍चितच प्रयत्न करणार असल्याचे गडकरी म्हणाले.

सांस्कृतिक महोत्सवात देशातील अनेक सुप्रसिद्ध कलावंतांनी सहभाग नोंदवून हा महोत्सव अजरामर केला आहे.मोहन जोशी,दिव्यांगाचे कार्यक्रम सादर करणारे डॉ.पाशा सय्यद यांच्या महोत्सवामधील कार्यक्रमांनी प्रेक्षकांना कायमची भूरळ घातली.यावेळी देखील समितीने अतिशय चांगले कार्यक्रम नागपूरकरांसाठी आणले असल्याचे गडकरी म्हणाले.

याप्रसंगी मंचावर खासदार कृपाल तुमाने,ज्येष्ठ राजकीय नेते दत्ता मेघे,माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा.अनिल सोले,उपाध्यक्ष जयप्रकाश गुप्ता,आमदार मोहन मते,राजेश बागडी आदी उपस्थित होते.

मंच संचालन बाळ कुलकर्णी यांनी केले.आभार खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी मानले.

सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे आयोजन १७ ते २६ डिसेंबर दरम्‍यान-

विदर्भाचे सांस्‍कृतिक वैभव ठरलेल्‍या खासदार आयोजन १७ ते २६ डिसेंबर दरम्यान करण्‍यात आले आहे. महोत्‍सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर होणा-या या महोत्‍सवाची मध्‍यवर्ती संकल्‍पना ‘स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव’ ही आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी झालेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून २०१७ साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. दरवर्षी महोत्‍सवाचे स्‍वरूप विस्‍तारत गेले. जागतिक कीर्तीचे आध्‍यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्‍हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, प्रसिद्ध अभिनेते सलमान खान, अनिल कपूर, जॅकी श्राफ, अभिनेत्री व नृत्‍यांगना हेमामालिनी, कवी कुमार विश्‍वास, आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे वादक राकेश चौरसिया, शिवमणी, संगीतकार जोडी जतिन-ललित, गायक सुरेश वाडकर, नंदेश उमप, प्रसेनजीत कोसंबी यांच्‍यासारख्‍या यांच्‍यासह हजारो कलावंतांनी महोत्‍सवात आपली कला सादर केली आहे.

२०२० मध्‍ये कोविड महामारीमुळे महोत्‍सवाच्‍या आयोजनात खंड पडला होता. याहीवर्षी महोत्‍सव होईल की नाही अशी शंका होती. निवडणुक आचारसंहितेचा अडथळा पार करत अखेर खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला येत्‍या, १७ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे.

अभिनेते संजय दत्‍त यांची उपस्थिती- –
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटन शुक्रवार, १७ डिसेंबर रोजी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते महोत्‍सवाचे उद घाटन होणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.

होणार देशभक्‍तीचा जागर –
यंदा देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करण्यात येणार असून त्‍याच संकल्‍पनेवर महोत्‍सवाची आखणी करण्‍यात आली आहे. उद्‌ घाटनाच्या दिवशी ‘चक दे इंडिया’ या ऑस्‍कर पुरस्‍कार विजेत्‍या गीताचे शीर्षक गायलेले,फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ होणार आहे. यात ते देशभक्‍तीपर गीते सादर करतील. ‘डान्‍स ऑन व्‍हील्‍स’ फेम डॉ. सय्यद पाशा यांनी खासदार महोत्‍सवासाठी खास ‘संस्‍कृतिका उत्‍सव’ या कार्यक्रमाची निर्मिती केली असून यात दिव्‍यांग कलाकार भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडवेल. ‘माय कंट्री – माय इंडिया’ या कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून गायक व संगीतकार शंकर महादेवन काश्‍मीर ते कन्‍याकुमारी आणि गुजरात ते उत्‍तर-पूर्व पर्यंतच्‍या संस्‍कृतीची सांगड घालणार आहेत. प्रसिद्ध कुमार विश्‍वास व त्‍यांचे सहकवी ‘काव्‍यमैफल’ मध्‍ये देशावर आधारित कविता सादर करणार आहेत

हास्‍य, काव्‍याची मेजवानी –
सुफीयाना गीताचे बादशहा कैलाश खेर यांची सुफ‍ी गाणी ‘कैलाश खेर – कैलासा’ सादर करणार असून काणेबुवा प्रतिष्‍ठानचा ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ कार्यक्रम तसेच, ‘नॉर्थ – साऊथ’ हा वाद्य जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. यात पं. राकेश चौरस‍िया, शशांक सुब्रमण‍ियम, ओजर आडिया, मंजुषा पाटील, रघुनंदन पणशीकर, सौरभ नाईक, नागेश आडगावकर व संजय उपाध्‍याय यांचा सहभाग राहील. नागपूरचे महानाट्य ‘आम्रपाली’ भगवान गौतम बुद्धांच्‍या विचारांनी प्रेरित असून नारीशक्‍तीचा संदेश देईल. विनोदाचा महासंग्राम ‘महाराष्‍ट्राची हास्‍यजत्रा’ नागपूरकरांना हसवणार आहे.
. महोत्‍सवाचा समारोप २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्‍यांगना हेमामालिनी यांच्‍या नृत्‍यनाटिका ‘राधारासबिहारी’ ने होणार आहे.
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात सादर होणा-या जागतिक दर्जाच्‍या कलेचा आस्‍वाद नागपूरकरांनी घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. अनिल सोले व इतर पदाधिका-यांनी केले आहे.

घरबसल्‍या मिळवा पासेस –
नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत. त्‍याकरीता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा असून एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्‍लीक केल्‍यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करता येईल.

कोविड नियमांचे होणार काटेकोर पालन –
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर सरकारने त्‍यासंदर्भात घालून दिलेल्‍या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची त्‍यासाठी मदत घेतली जात असून आयोजनस्‍थळी दररोज ८ ते १० हजार मास्‍क वितरीत केले जाणार आहे. दोन खुर्च्‍यांमध्‍ये ५ ते ६ फूटांचे अंतर राखले जाणार असून पटांगणाच्‍या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था राहणार आहे

खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे वेळापत्रक-
शुक्रवार, १७ डिसेंबर : उद् घाटन व सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट – चक दे इंडिया’

शन‍िवार, १८ डिसेंबर : ‘कैलाश खेर अँड कैलासा’ बँड लाईव्‍ह परफॉर्मन्‍स

रविवार, १९ डिसेंबर : ‘कविसंमेलन’ सहभाग – कुमार विश्‍वास, विमल त्‍यागी, शिखा पचौरी, विनीत कुमार आणि शंभू चौधरी

सोमवार, २० डिसेंबर : काणेबुवा प्रतिष्‍ठानचा ‘व्‍होकल क्‍लासिकल अँड लाईट क्‍लासिकल’ कार्यक्रम

मंगळवार, २१ डिसेंबर : ‘नॉर्थ – साऊथ’ जुगलबंदी

बुधवार, २२ डिसेंबर : निराली प्रॉडक्‍शनचे ‘आम्रपाली’ महानाट्य

गुरुवार, २३ डिसेंबर : ‘संस्‍कृतिका उत्‍सव’ डॉ. सय्यद पाशा आणि चमूचा ‘डान्‍स ऑन व्हिल्‍स’

शुक्रवार, २४ डिसेंबर : ‘महाराष्‍ट्राची हास्‍य जत्रा’

शन‍िवार, २५ डिसेंबर : शंकर महादेवन यांचा ‘माय इंडिया… माय म्‍युझिक’ कार्यक्रम

रविवार, २६ डिसेंबर : ‘राधारासबिहारी’ हेमामालिनी यांची नृत्‍यनाटिका

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या