
नागपूर, ता. ७ : देशात २ कोटी ६८ लाख व्यक्ती दिव्यांग आहेत. यातील सर्वाधिक ग्रामीण भागात आहेत. त्यातही १० ते १९ वयोगटातील सर्वाधिक मुले, मुली दिव्यांग आहेत, यात २१ प्रकारच्या दिव्यांगाचा समावेश आहे, अशी माहिती कोम्हाडचे कार्यकारी संचालक डॉ. उदय बोधनकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.
कॉमनहेल्थ एसोसिएशन फॉर हेल्थ एन्ड डिसेबिलिटी (कोम्हाड), ब्रिटिश एसोसिएशन ऑफ फिजिशीयंस ऑफ इंडियन ओरिजन (बापिओ) आणि यूनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या विद्यमाने १० ते १२ डिसेंबर दरम्यान बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बोधनकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कॉमहाड ही संस्था इंग्लंडमध्ये १९८३ साली स्थापन झाली.५४ काॅमनवेल्थ देशातील फाऊंडेशन्स यांच्या समन्वयाने स्थापन झालेली आहे.आरोग्य विषयाशी निगडीत व्यावसायिक,सामाजिक,सरकारी,बिन सरकारी असलेल्या कॉमनवेल्थ देशांमधील विविध संस्था यांच्या सहभागाने ‘रोग-प्रतिबंधन’ या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉमहेड ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी(डब्ल्यूएचओ)१९९० पासून विधिवत निगडीत आहे आणि इतकी वर्षे त्यांची यशस्वी भागीदारी सुरु आहे.या संस्थेच्या मुख्य समन्वयक म्हणून इंग्लंडच्या राणी एलिजाबेथ राहीलेल्या आहेत.
कॉमहेड या संस्थेने आरोग्य क्षेत्रामध्ये होणारी प्रगती व तांत्रिक सहकार्य हा उद्देश ठेऊन ५४ कॉमनवेल्थ देशांमध्ये परस्परांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व प्रशिक्षण या उद्देशाने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे.
सार्वजनिक अारोग्य व दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन आणि त्यांच्या समृद्ध आयुष्यासाठी रोग प्रतिबंधक उपाय तसेच अपंगत्वासाठी प्रतिबंधक उपाय करने,त्यासोबतच कमी उत्पन्न असणा-या व दारिद्रय रेषेखालील शहरी क्षेत्रातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध उपाय योजने, हेच या संस्थेचे उद्दिष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.
‘बापिओ’ही मूळ भारतीय असलेल्या परदेशातील डॉक्टरांची संस्था आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले पण मूळ नागपूरचे असलेले डॉ.रमेश मेहता यांनी १९९६ साली या संस्थेची स्थापना केली होती.विविध कॉमनवेल्थ देशामधील मूळ भारतीय वंशाची डॉक्टर मंडळी या संस्थेची सभासद आहेत.इंग्लंडमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये ही संस्था महत्वाची समजली जाते.
या परिषदेत कोविडमुळे मुलांमधील समस्यांवर मंथन होणार आहे. आभासी (ऑनलाईन) पद्धतीने होणाऱ्या परिषदेत देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेत १० डिसेंबरला सकाळी ९ ते दूपारी १ दरम्यान दिव्यांग बालकांमधील आहार विषयक व इतर समस्या व आव्हाने, आहारातील त्रुटी, कुपोषण, लठ्ठपणा, बालकांची सुरवातीच्या काळातील वाढ व विकास तसेच दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा होईल, असेही डॉ. बोधनकर म्हणाले.
सेरेब्रल पाल्सीच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण-
रविवारी (ता.१२) या परिषदेत सेरेब्रल पाल्सीग्रस्तांवरील शस्त्रक्रियांचे प्रात्याक्षिक डॉ. विराज शिंगाडे यांच्या वर्धा मार्गावरील रुग्णालयात होणार आहे. ११ व १२ डिसेंबरला कोविड व त्यानंतरच्या काळातील विविध आव्हानांवर चर्चा होईल. परिषदेचे उदघाटन शनिवारी (ता.११) डिसेंबरला सायंकाळी ६.१५ वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते होईल. राष्ट्रीय बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे सह अध्यक्ष डॉ. नवीन ठक्कर, प्रा. के. श्रीनाथ रेड्डी प्रमुख पाहूणे असतील.
मुख्य परिषद ११ व १२ डिसेंबरला दुपारी १ ते ७ दरम्यान झूमच्या माध्यमाततून घेतली जाणार आहे.कोविड-१९ व त्या नंतरच्या काळातील विविध आव्हानांवर व त्यातूनही दिव्यांगांना भेडसावणा-या समस्यांवर उहापोह केला जाणार आहे.यामध्ये आरोग्यसेवामध्ये कार्य करणारे बालरोगतज्ज्ञ,आरोग्य अधिकारी,शिक्षक,समुपदेशक,फिजियोथेरेपिस्ट,ऑक्यूपे नल थेरेपिस्ट,सर्व स्तरातील आरोग्यसेवे संबंधित विद्यार्थी,पालक आणि मार्गदर्शक यांच्यासाठी ही कार्यशाळा एक समृद्ध अनुभव राहणार आहे.
मुख्य परिषदेमध्ये कॉमहाडचे संस्थापक कै.व्ही.आर.पांडुरंगी स्मृति व्याख्यानमालेचे पुष्प डॉ.रमेश मेहता हे गूंफणार आहेत.
याशिवाय बापियो या संस्थेशी निगडीत असलेल्या व्यक्ती व उत्सुक मंडळीसाठी दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन,टिकाकरण आणि इतर समस्यांवर चर्चासत्र राहणार आहे.
‘
दिव्यांग व्यक्तिसंबंधात अद्यावत शास्त्रीय बदल व ज्ञान’तसेच ‘मोठ्या वयातील दिव्यांगांच्या समस्या’यावर दोन वेगवेगळी चर्चासत्र राहणार आहेत.
या उद् घाटन सोहळ्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात वरोडा येथील आनंदवन या संस्थेतील स्वरानंदन संगीत संस्था आपला कार्यक्रम सादर करेल.
या परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते हजर राहतील,अशी माहिती डाॅ. यशवंत पाटील यांनी याप्रसंगी दिली.
पत्रकार परिषदेला डॉ. यशवंत पाटील, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. प्राजक्ता कडुस्कर, डॉ. प्रकाश उके,डॉ.जया शिवलकर,डॉ.प्रदीप जयस्वाल आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
