
जनप्रतिनिधी म्हणून नागरिकांना करुन दिला रस्ता मोकळा
एका आमदाराच्या इशा-यावर गिट्टी खदान पोलिस करते काम :कमलेश चौधरी यांचा गंभीर आरोप
नागपूर,ता. ६ डिसेंबर २०२१: सुरक्षाभिंत व लोखंडी दरवाजा तोडून बळजबरीने हजारी पहाड येथील भूखंडावर ताबा घेण्याच्या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी काल काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांच्यासह ४० साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले.माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे म्हणने कमलेश चौधरी यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत मांडले.
पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्या प्राध्यापिका सारिका चव्हण,बंटी ठाकूर,दत्ता खोडे,राहूल कानफोडे इ.हे सर्व त्या कॉलनीतील सभ्य रहीवाशी आहेत,एवढंच नव्हे तर माध्यमांमध्ये त्यांच्या नावांसमाेर ‘गुंडं’अश्या अशलाघ्य शब्दांचा वापर करण्यात आला असल्याची नाराजी याप्रसंगी कमलेश चौधरी यांनी व्यक्त केली.
ही जागा म्हणजे एक सार्वजनिक रस्ता आहे. जैन बिल्डरच्या श्रृती कन्टंल्सीने या रस्त्याच्या चारही बाजूला भिंत उभारुन लोखंडी दार बसवले व त्या दारावर कूलूप लावले,परिणामी हजारी पहाड ते काटोल रोडपर्यंतच्या अनेक रहीवाशी भागातील हजारो नागरिकांना आवागमनमध्ये बाधा निर्माण झाली.
आतापर्यंत अनेक निवदेन पोलिस ठाण्यात दिली.नागपूर महानगरपालिकेने या जागे संदर्भात बिल्डरला नोटीस देखील पाठवली आहे.मनपाच्या पैश्याने या रस्त्यावर खडीकरण झाले,स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आले,याच जागेवरील नाल्यावर मनपानेच पूल देखील बांधला आहे.असे असताना जैन बिल्डरने संपूर्ण रस्ताच अतिक्रमणात घेऊन हा १७ एकरचा रस्ता हडपला,असा आरोप चौधरी यांनी केला.या बिल्डरची जागा फक्त अर्धा एकर असून त्याचा खसरा क्रमांक ७९/८०/३ असा आहे.
त्याने आपल्या अर्ध्या एकर जागेसोबतच सार्वजनिक उपयोगाचा १७ एकरचा रस्ता हडपला,रस्त्याचा चारही बाजूने भिंत बांधली,लोखंडी दार लावले,असा अारोप करीत ज्यांनी हा रस्ता मोकळा केला त्यांनाच ‘गुंड’ठरवून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ते गुंड नसून सभ्य समाजातील स्थानिक रहीवाशी असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच करोना काळात या भागातून ॲम्बूलेंस देखील जाऊ शकली नाही,कोणाच्या घरची वीज नादुरुस्त झाली तर वीज दुरुस्ती करणारी गाडी देखील जाऊ शकत नाही,शाळेच्या बसेस,पिण्याच्या पाण्याचे टँकर्स जाऊ शकत नाही,एवढा प्रचंड त्रास या भागातील नागरिकांना, बिल्डरच्या या अतिक्रमणामुळे सोसावा लागत आहे.करोनाबाधितांना रुग्णालयात पोहोचायला ही या अतिक्रमणामुळेच भंयकर त्रास सोसावा लागला,असे ते म्हणाले.
मनपाची सभा ही गेल्या दोन वर्षांपासून ऑन लाईन होत असल्याने माझ्या मागणीवर कोणतीही सुनवाई झाली नाही.भाजप सत्ताधारी हे ‘सत्ता का कारभार अपने ही अंदाज में’करीत असल्याची टिका त्यांनी केली.
आजवर अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या. प्रशासनाला निवदेन दिले मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याने येथील रहीवाश्यांसोबत आम्ही ते लोखंडी दार तोडले,भिंती पाडल्या व मनपाचा सार्वजनिक रस्ता मोकळा केला.
मात्र आमच्यावरच बिल्डरने मारहाणीचा गुन्हा नोंदवला.राहूल कानफोडे याची बोटे बिल्डरच्या माणसांनीच फ्रेक्चर केली मात्र पोलिसांनी गुन्हा कानफोडेवरच नोंदवला.सभ्य समाजातील प्राध्यापिका यांच्यावर देखील गुंड म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला.तक्रारकर्त्याच्याच मोबाईल तहसील पोलिसांनी जप्त केला कारण त्याने मेडकीलमधील डॉक्टरांचे संभाषण रेकॉर्ड केले होते.
बिल्डरचे गुंड हे स्वत: मेडीकलमध्ये गेल्यावर आमच्यावर जबर मारहाण झाल्याचा अहवाल द्या अशी मागणी डॉक्टरांना करीत होते.मात्र डॉक्टरांनी, तुम्हाला काहीच मारहाण झाली नसल्याने असा अहवाल कसा देणार?असे म्हटले,हे संभाषण तक्रारकर्त्यांनी रेकॉर्ड केल्यानेच त्याचा मोबाईल पोलिसांनीच जप्त केल्याचा अारोप चौधरी यांनी केला.
आम्ही १ जानेवरी २०२१ रोजीच बिल्डरने सार्वजनिक उपयोगाचा रस्ता हडपल्याचे निवेदन जिल्हाधिका-यांना देखील दिले होते.हा २००१ पासूनचा सार्वजनिक रस्ता असून अद्यापही या रस्त्याचा डीपी कागदोपत्री बदलण्यात आला नाही.मनपाकडे तक्रार केली तर मनपाने नागपूर सुधार प्रन्यासकडे हे प्रकरण टोलवले.
एका आमदाराच्या इशा-यावर पोलिसांची कारवाई-
एका आमदाराच्या इशा-यावर गिट्टी खदान पोलिसांनी सभ्य नागरिकांवर गुंडगिरीची कलमे नमूद करुन गुन्हे नोंदवले.वेळ प्रसंगी या आमदाराचे नाव त्यांच्या पक्षासहित उघड करील असा इशारा यावेळी चौधरी यांनी दिला.राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांची संपूर्ण फूस त्या बिल्डरला असल्याचा धक्कादायक आरोप कमलेश चौधरींनी केला.
वेळावेळी या ठिकाणी येऊन ज्वाला धोटे यांनी नागरिकांना शिवीगाळ केली.अर्वाच्य शिव्या दिल्या.धमक्या दिल्या.ज्वाला धोटे हे पोलिस आयुक्तांचेच ऐकत नाही तर आम्ही तर ’किस खेत की मूली है’असा टोमणा चौधरी यांनी मारला.
या जागेसंबधी सर्वोच्च न्यायालयाचा स्टे आहे मात्र तरीही न्यायालयाची अवमानना करीत बिल्डरने या जागेवर कब्जा करुन ठेवला आहे.या जागेसंबधी बिल्डरने प्रशासनालाही खोटी कागदपत्रे सादर केली.अनेक सोसायट्यांमधील नागरिकांचे आवागमन बिल्डरने अतिक्रमण करुन रोखले असल्याचा अाराेप चौधरी यांनी केला.
हा प्रभाग क्रं १२ असून या प्रभागाचे नगरसेवक दर्शनी धवड,हरीश ग्वालबंशी,विक्रम ग्वालबंशी व मायाताई इवनाते आहेत मात्र येथील रहीवाश्यांची व्यथा एकाही नगरसेवकांनी सोडवली नाही.माझ्यासारखा लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्येवर धावून गेल्यास माझ्यावरच खोटा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे कमलेश चौधरी यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
