फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजस्पर्धेत सहभागी प्रत्येक संस्थेला प्रोत्साहन राशी: गडकरी

स्पर्धेत सहभागी प्रत्येक संस्थेला प्रोत्साहन राशी: गडकरी

Advertisements

खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उद्या रविवारी

 

नागपूर,३० ऑक्टोबर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार करंडक एकांकिका स्पर्धेत नियमित पुरस्कारा व्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी प्रत्येक संस्थेला १०, ००० रुपयांची ‘प्रोत्साह’न राशी देण्याची गोड घोषणा केली आहे.

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील एकूण २३ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असून तीन दिवसांत अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथांचे दर्शन घडविण्यात आले.

काही वैशिष्ट्यपूर्ण कथानकांनी स्पर्धेत रंगत आणली. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. एकूण आठ एकांकिका शेवटच्या दिवशी सादर करण्यात आल्या. स्पर्धेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहाला भेट दिली. त्यानंतर खासदार सांस्कृतिक समितीशी चर्चा करून प्रत्येक संस्थेला १० हजार रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने आयोजकांनी सभागृहात या निर्णयाची घोषणा केली तेव्हा अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला. काहींनी नितीन गडकरी यांच्या कौतुकात घोषणाही दिल्या. बहुतांश संस्थांचे कलावंत सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा होती. थोड्याच वेळात सांस्कृतिक क्षेत्रात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचे कौतुक होऊ लागले.

तत्पूर्वी, अश्विनी अनिल सोले, भारती जयप्रकाश गुप्ता, मधुलिका मधुप पांडेय, सीमा राजेश बागडी, अपूर्वा अविनाश घुशे आणि रेणुका देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवटच्या दिवशीच्या एकांकिकांचे उद् घाटन झाले.

शेवटच्या दिवशी आठ एकांकिका-

खासदार करंडक एकांकिका स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी एकूण आठ एकांकिका सादर झाल्या. खोब्रागडे शिक्षण संस्थेच्या वतीने ‘माझी बाजू माझा पक्ष’, दि. एम.पी. एज्युकेशन सोसायटीतर्फे झेंडा घ्या हो झेंडा, लोहिया अध्ययन केंद्राच्या वतीने आहुती, सी.पी.अँड बेरार तर्फे समरसौदामिनी, हेमेंदु रंगभूमीतर्फे अवतरण, साताजी महाविद्यालयातर्फे अनंत मी, रंगरसियातर्फे अगस्त से अगस्त तक आणि राष्ट्रभाषा परिवारतर्फे टिटवाल का खौफ या एकांकिका सादर झाल्या.

आज पुरस्कार सोहळा-

खासदार करंडक एकांकिका स्पर्धेचा पुरस्कार सोहळा रविवार सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात होणार आहे. केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी-मोने आणि अभिनेते देवेंद्र दोडके यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पुरस्कार सोहळ्यापूर्वी मंजुषा पाटील व आनंद भाटे यांच्या नाट्य संगिताचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला नागपुर कर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितिचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले याच्यासह सर्वश्री जयप्रकाश गुप्ता, प्रा मधुप पांडे, प्रा. राजेश बागडी, बाळ कुलकर्णी, रेणुका देशकर, संदीप गवई, संजय गुळकरी यांनी केले आहे.

असे मानले कलावंतांनी गडकरींचे आभार-

खूप मोठा आधार-स्वप्नील बोहटे

दहा हजार रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार हा खूप मोठा आधार आहे. कोरोनानंतर कलावंत अत्यंत वाईट परिस्थितीत होते. त्यानंतर लगेच स्पर्धा आली, त्यामुळे नाटक बसविण्यासाठी खर्च करताना सर्वांना आर्थिक कसरत करावी लागली. पण या घोषणेने दिलासा दिला आहे. अश्याच पद्धतीने प्रोत्साहन दिले तर नागपुरातील रंगकर्मी कधीच हताश होणार नाही

उत्तम निर्णय-वैदेही चवरे

अतिशय उत्तम निर्णय आहे. कारण नाटक बसवायचे म्हणजे तालमीला मोठा खर्च येतो. वेशभुषा, नेपथ्य आदींसाठी येणारा खर्च संस्थेसाठी एक आव्हान असते. विशेषतः पेट्रोलचे दर वाढल्यामुळे कलावंतांनाही दररोज स्वतःच्या खिशातले पैसे खर्चून तालमीला यावे लागते. अश्या परिस्थितीत दहा हजार रुपयांच्या निर्मिती खर्चाची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.

ह्रदय जिंकले-संजय भाकरे

नागपुरात कोरोनानंतर एकांकिका महोत्सव होत आहे. दीड वर्षांच्या कालावधीत कलावंतांवर आर्थिक संकट आले होते. अनेकांनी घरचे सामान विकून उदरनिर्वाह चालविला. प्रत्येक संघाला पाच हजार रुपये निर्मिती खर्च द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र गडकरी साहेबांनी दहा हजार रुपयांची घोषणा करून सर्वांचे ह्रदय जिंकले आहे. त्यांच्यासारखा दानशूर आणि कलावंतावर प्रेम करणारा नेता आम्हाला लाभला याचा खूप आनंद आहे.

गडकरींच्या विशाल मनाला मानाचा मुजरा-सलीम शेख

नितीन गडकरी साहेबांचे खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनंतर कलावंतांच्या, रंगकर्मींच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. ते या काळात कलावंतांच्या पाठिशी उभे राहिले म्हणून आम्ही तग धरू शकलो. त्यांच्या आभाळाएवढ्या विशाल मनाला व सर्जनशील विचाराला मानाचा मुजरा.

कलावंतांची दुरवस्था जाणली-भूपेंद्र गणवीर

खासदार करंडक एकांकिका स्पर्धा प्रथमच नागपुरात होत आहे. या स्पर्धेला कलावंत व रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच. पण आज नितीन गडकरी यांनी सभागृहात हजेरी लावून ही घोषणा केली. कोरोना काळात झालेल्या कलावंतांच्या दुरवस्थेचा विचार त्यांनी केला, याबद्दल बहुजन रंगभूमीच्या सर्व कलावंतांकडून त्यांचे आभार.

 

 

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या