Homeनागपूर न्यूज पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा: महापौर आणि आयुक्तांचे संयुक्त आवाहन

 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा: महापौर आणि आयुक्तांचे संयुक्त आवाहन

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

नागपूर, ता. ९ : श्री गणरायाचे आगमन उद्या १० सप्टेंबर रोजी होत आहे. नागपूर महानगरपालिका सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. यावर्षी पीओपी गणेश मूर्तीची निर्मिती, विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य देऊन घरी मातीच्याच मूर्तीची स्थापना करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संयुक्तरित्या केले आहे.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, पीओपीच्या मूर्तीचे अनेक नुकसान आहेत. ती पाण्यात विरघळत नाही, यामुळे श्री गणेशाचे विटंबना होते त्याचसोबत जलप्रदूषण होऊन पर्यावरणास मोठी हानी पोहचते. त्यामुळे यावर्षी सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा. आपल्या घरी मातीच्याच मूर्तीची स्थापना करा. सजावट करताना प्लॉस्टिक आणि थर्माकॉलच्या वस्तूंचा वापर करू नका, असेही आवाहन महापौरांनी केले.

ते पुढे म्हणाले, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आताच आपण पुढाकार घेतल्यास त्याचा लाभ आपल्या येणा-या पिढीला होणार आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सर्वांनी काम करावे. तसेच घरी जमा झालेले निर्माल्य इतरत्र कुठेही फेकू नका, निर्माल्य संकलनाकरिता मनपाद्वारे विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्येच निर्माल्य संकलित करा. मनपाद्वारे हे निर्माल्य एकत्र करून त्याचे जैविक खत तयार करण्यात येणार आहे. यामुळे श्रीगणेशाला अर्पण केलेले निर्माल्य कुणाच्याही पायाखाली, कचऱ्यात जाणार नाही अशा प्रकारचे नियोजन मनपाद्वारे करण्यात आले असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

घरगुती मूर्तीचे घरीच विसर्जन करा. शक्य नसल्यास मनपाच्या फिरत्या विसर्जन कुंडात विसर्जन करा, तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता कोरोना नियमावलीचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही महापौरांनी केले आणि समस्त नागपूरकरांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्या दिल्या.

मूर्ती मातीचीच आहे याची खात्री करा : आयुक्त राधाकृष्णन बी.
शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे आगमन होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पीओपी मूर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मूर्ती घेतांना ती मातीचीच आहे याची खात्री करूनच घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा दुसरा गणेशोत्सव आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा, असेही आवाहन आयुक्तांनी केले.

ते पुढे म्हणाले, पीओपी मूर्ती खरेदी आणि विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सर्वांनी याबाबत सजग राहणे आवश्यक. आपण विकत घेत असलेली मूर्ती पीओपीची नसून ती शाडू मातीची आहे, याची खात्री करून घ्यावी. तसेच घरगुती मूर्ती दोन फूट तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती चार फुटाची असावी. घरच्या गणेशाचे घरातच विसर्जन करा. यावर्षी नागपूर शहरातील कुठल्याही तलावावर विसर्जन होणार नाही, हे लक्षात ठेवून कृत्रिम विसर्जन कुंडातच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

श्री गणेशोत्सव म्हणजे श्रद्धेचा उत्सव आहे. सामाजिक जनजागृतीचा उत्सव आहे. या उत्सवातून गणेश मंडळांनी डेंग्यू, कोरोना नियमांचे पालन, लसीकरण याबाबत जनजागृतीवर भर द्यावा. सोबतच ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण होणार नाही याची काळजी घेत कोरोना नियमावलीचे पालन करीत हा गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करा, असेही आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Advertisements

Latest बातम्या