

सामानाची केली नासधूस, मंदिर केले सील
नागपूर, १० ऑगस्ट: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सोमवारपासून ठिय्या आंदोलनाला बसलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप, राम नेवले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सकाळीच जबरदस्तीने ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांच्या सामानाची नासधूस करत आंदोलनस्थळ असलेल्या शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिराला सील करण्यात आले.
विदर्भाचे स्वतंत्र राज्य द्या, कोरोना काळातील वीजबिलांपासून विदर्भातील जनतेला मुक्त करा आणि पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढ कमी करा या तीन मागण्यांसाठी सोमवारी ऑगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे विदर्भ चंडिका मंदिर शहीद चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता.

सकाळी ९ वाजेपासून आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला लागली होती. तितक्यात गंगा नियंत्रण पोलिस पथकाच्या व्हॅन आल्या आणि त्यांनी आंदोलनस्थळाला गराडा घातला. त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप आंदोलनस्थळी होते. त्यांना पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतले व तहसील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.
दरम्यानच्या काळात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते राम नेवले, महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे, युवा आघाडीप्रमुख मुकेश मासुरकर व इतर कार्यकर्तेही आंदोलन सुरू होण्याच्या निर्धारित वेळी विदर्भ चंडिका मंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी तेथे ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी चिडून आंदोलनस्थळावरील बॅनर फाडले आणि आंदोलनकर्त्यांच्या सामानाची नासधूस केली. मुकेश मासुरकर व इतर आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने ओढत नेत पोलिस व्हॅनमध्ये बसवून तहसील पोलिस स्टेशनला नेण्यात आले. नंतरही बरेच कार्यकर्ते आंदोलनस्थळी एकत्र येत गेले.
आंदोलनकर्त्यांची ही गळचेपी खपवून घेतली जाणार नाही. स्वतंत्र विदर्भ राज्य मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये सुनील वडस्कर, रेखा निमजे, सुनीता येरणे, प्रशांत जयकुमार, वृषभ वानखेडे, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, उषा लांबट, शैलेश धर्माधिकारी, सुदाम राठोड, राजेंद्र आगरकर, राज ठाकूर, वीना भोयर, डशा लांबट, राजू बोरकर, विजय मौदेकर, संजय हिंगे, अशोक हांडे, राजेंद्रसिंग ठाकूर, मुन्नाजी दुर्गे, प्यारूभाई, घीसू पाटील, रवींद्रसिंग ठाकूर, सुनील साबळे, विष्णू पाटील, अशोक पाटील, गोविंदराव चिंतावार, मोराती गडपल्लीवार, रामराव ताडपल्लीवार वार यांच्यासह शेकडो विदर्भप्रेमींचा समावेश होता.

महिला आंदोलकांवर अन्याय
आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांनी महिलांवर कार्यकर्त्यांना मनगटाला धरून जबरदस्तीने फरफटत ओढत पोलिस व्हॅनपर्यंत नेते. त्यात उषा लांबट या महिलेच्या हाताला आणि पायाला चांगलेच खरचटले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे यांच्याशी झालेल्या झटापटीत त्यांचेही कपडे फाटले.
……….




आमचे चॅनल subscribe करा
