Homeनागपूर न्यूजकोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनची सज्जता ठेवा:प्राजक्ता लवंगारे-वर्मा

कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनची सज्जता ठेवा:प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Advertisements

* आयनॉक्स व आदित्य ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांना भेट

* भविष्यातील निकड लक्षात घेवून उत्पादन वाढवा

नागपूर, दि.  : कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही यादृष्टीने ऑक्सिजन निर्मितीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करताना साठवण्याची क्षमता सुद्धा वाढवा. प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य देण्यात येईल, असे ग्वाही विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील आयनॉक्स एअर प्रॉडक्ट प्रा. लि. तसेच आदित्य एअर प्रॉडक्ट या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास विभागीय आयुक्तांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. उपस्थित होत्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनच्या मागणीनुसार पुरवठा न झाल्यामुळे इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करुन घ्यावे लागले होते. तिसऱ्या लाटेसंदर्भात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आयनॉक्स या मल्टिनॅशनल लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मितीसोबतच आदित्य या एअर सेपरेशन व रिफिलिंग युनिटतर्फे जास्तीत-जास्त उत्पादनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

आयनॉक्सतर्फे दरदिवशी 95 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत असून हा प्रकल्प चोवीस तास सुरु ठेवण्यात आला आहे. तसेच आदित्यतर्फे 1 हजार 400 ते 1 हजार 600 सिलिंडर दरदिवशी तयार करतात. या दोन्ही कंपन्यांनी जास्तीत-जास्त वेळ उत्पादन निर्मितीला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. आयनॉक्सतर्फे पी. के जैन, व्यवस्थापक किरण शेळके व श्री. मराठे तसेच आदित्यतर्फे इशान्त गोयल व व्यवस्थापक राजेंद्र राणा यांनी माहिती दिली.

यावेळी विभागीय आयुक्त (औषधे) महेश गडेकर, सहाय्यक आयुक्त डॉ. पी. एम. बल्लाळ, तहसीलदार हिंगणा संतोष खंडारे तसेच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***

Latest बातम्या