

नागपूर, दि. १९ : कोविड प्रतिबंधात्मक माेहिमेला आज यशस्वीतेचे नवे परिमाण लाभले. या मोहिमेच्या विस्तारलेल्या परिघाने आज तृतीयपंथी, दिव्यांग तसेच बेघर नागरिकांना सामावून घेतले. निमित्त होते ते बेटीयॉ शक्ती फाऊंडेशनने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आज येथे आयोजित केलेल्या मोफत लसीकरण शिबिराचे. या शिबिराच्या उद्घाटनास विशेष उपस्थिती होती, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची.
समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांच्या लसीकरणासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी केले. बेटीयॉ शक्ती फाऊंडेशनने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्यांने तृतीयपंथी, दिव्यांग आणि बेघरांसाठी निशुल्क कोविड विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती वर्मा बोलत होत्या.
महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आणि सहायक पोलीस आयुक्त रेखा भवरे, किन्नर गुरु कल्याणी नायक उपस्थित होते. आज दिवसभरात बेटीयॉ शक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित विशेष शिबिरात २०९ जणांचे लसीकरण करण्यात आले.
तृतीयपंथी, दिव्यांग तसेच विविध दुर्लक्षित घटक हे समाजाचे अविभाज्य अंग असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच या घटकांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा यासाठी बेटीयॉ शक्ती फाऊंडेशनने चांगला पुढाकार घेतला असल्याचे गौरवोद्गार श्रीमती वर्मा यांनी काढले.
शासन दरबारी या वंचित आणि उपेक्षित घटकाची नोंद व्हावी, यासाठी आधार कार्ड, मतदार कार्ड, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले ओळखपत्र, कागदपत्रांसाठी नागपूर महानगरपालिका सर्वोतोपरी मदत करेल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
बेटीयॉ शक्ती फाऊंडेशन २०१७ पासून कार्यरत असून, आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. महिलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षेसाठी काम करणाऱ्या फाऊंडेशनने मार्च २०२० पासून हजारो बेघर, दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांना भोजनदान केले आहे. हुंडाप्रतिबंधात्मक, महिला सशक्तीकरणाबाबत जनजागृतीचे काम सुरु आहे. आतापर्यंत गरीब ७० मुली आणि ९० वृद्धांना दत्तक घेतले आहे.
दत्तक मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्यात येते. फाऊंडेशन बेघर आणि दिव्यांगाच्या जेवणासाठी मोफत कुपन वाटप करतात.
गरीब मुलींनी शिक्षण घ्यावे, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, यासाठी अभ्यासिका सुरु करण्यात येणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
