फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा सभेत ‘स्थगन‘लाच ‘स्थगिती’

मनपा सभेत ‘स्थगन‘लाच ‘स्थगिती’

Advertisements

कोविड महामारी अंतर्गत केंद्र व राज्याच्या अनुदानावर आभा पांडे यांचा होता प्रस्ताव

रात्रीच्या अंधारात ख-या नस्तींमध्ये केले फेरबदल:आभा पांडे यांचा खळबळजनक आरोप

जुन्या रजिस्टरमध्ये प्रचंड खाडाखोड:नवीन रजिस्टर केले उपलब्ध!

मनपा आयुक्त गंभीर नसल्याचा आभा पांडे यांचा गंभीर आरोप

३० जूनला होणार विशेष सभा:महापौरांचे निर्देश

नागपूर,ता. २२ जून: महानगरपालिकेच्या आज मंगळवार दि. २२ जून रोजी पार पडलेल्या ऑन-लाईन सर्वसाधरण सभेत राष्ट्रवादीच्या सरचिटणीस व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी कोविड महामारी अंतर्गत मनपा प्रशासनाद्वारे केलेल्या कार्यवाही,घेतलेले निर्णय तसेच शासनप्राप्त अनुदानातून खरेदी केलेल्या वस्तू इ.संदर्भात महानगरपालिकेची या संदर्भातील माहिती प्रशासनाने मनपाच्या पटलावर न ठेवल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक भावना लक्षात घेता या विषयावर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला होता मात्र सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी प्रशासनाला याच विषयावर दिलेल्या पत्रामुळे व ही माहिती प्रशासनाने आज सभागृहाच्या पटलावर ठेवल्यामुळे सर्व नगरसेवकांना ही माहिती आधी वाचू द्यावी व विशेष सभेत या विषयावर चर्चा ठेवावी,अशी मागणी केली असता, ही चर्चा महापौरांच्या निर्देशाप्रमाणे ‘स्थगित’करुन येत्या ३० जून रोजी पार पडणा-या विशेष सभेत आता चर्चिली जाईल,अर्थात मनपा सभेत आज स्थगन प्रस्तावालाच ‘स्थगिती’मिळण्याचा आगळावेगळा योग जुळून आला!

सभेत आज एकंदरित विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे ,घोडेस्वार यांच्या प्रस्तावासह एकूण चार स्थगन प्रस्ताव आले होते मात्र सर्वात पहीले प्रस्ताव आभा पांडे यांनी दिला असल्याने महापौरांनी तो स्वीकृत केला.यावर आक्षेप घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी चार स्थगन प्रस्तावापैकी एक स्वीकारण्यात आला मात्र तो सर्वात पहीले आला म्हणून तोच स्वीकृत करण्याचा हा काही नियम नसल्याचे सांगितले.असा पायंडा पाडणे घातक असल्याचे सांगितले तसेच सर्वात महत्वाचा विषय असल्याने महापौर आपल्या विशेषाधिकारात कोणताही प्रस्ताव आधी स्वीकारु शकत असल्याचे ते म्हणाले.

तसेच एकदा स्थगन प्रस्ताव स्वीकृत केल्यानंतर त्याला स्थगिती देत पुढच्या सभेत त्या विषयावर चर्चा करता येत नाही,जर आभा पांडे यांना याच सभेत चर्चा करायची असल्यास पुढच्या सभेत या विषयावर चर्चा घेऊ नये,अशी विनंती त्यांनी महापौरांना केली.

तर सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी नियम १२३ अंतर्गत कोविड-१९ च्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने आतापर्यंत काय कारवाई केली,याचा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे,तो अहवाल अद्याप एकाही नगरसेवकांनी वाचला नसल्याने त्यावर त्यांनाही चर्चा करायची आहे त्यामुळे आभा पांडे व प्रशासनाचा अहवाल हा एकाच विषय कोविड-१९ च्या अनुषंगाने असल्यामुळे आधी प्रशासनाचा अहवाल सर्व नगरसेवकांना उपलब्ध करुन दिला जावा,यानंतर त्यावर पुढील सभेत या गंभीर विषयावर सखोल चर्चा घडावी,अशी विनंती महापौरांना अविनाश ठाकरे यांनी केली.

नियमाप्रमाणे महापाैरांनी आभा पांडे यांच्या स्थगन प्रस्तावाला मंजूरी प्रदान केली असल्याने या विषयालाच पुढील सभेत कायम ठेऊन यावर चर्चा घडवून आणावी,असे मत त्यांनी मांडले.आभा पांडे यांनी या विषयावर ५८ फाईल्सचा अभ्यास केला आहे ते या गंभीर विषयावर १०० टक्के बोलू शकतात मात्र हा विषय इतर नगरसेवकांना माहिती नसल्याने याच विषयावर वेगळी सभा घेण्यात यावी,यावर दुस-या सदस्यांचा अभ्यास या विषयावर नाही,हा वेगळा प्रश्‍न असल्याचा आक्ष्े प आभा पांडे यांनी नोंदवला.
या विषयावर तुम्ही वेगळा स्थगन आणा,लक्ष् वेधी लावा,प्रश्‍न लावा मात्र हा प्रस्ताव महापौरांनी मंजूर केला असल्याने यावर चर्चा झाली

पाहीजे,अशी मागणी त्यांनी केली.घोडेस्वार यांनी आभा पांडे यांच्या मताला आक्षेप घेत मी मांडलेला स्थगन प्रस्ताव २९ वर्षे प्रलंबित ठेवलेल्या प्रश्‍नावर असल्याचे सांगत सभा ही नियमाप्रमाणे चालली पाहीजे,असे मत नोंदवले.यावर आभा पांडे यांनी घोडेस्वार तुम्ही विषयाचे विषयांतर करु नका,असे मत नोंदवले असता माझा विषय देखील प्रलंबित असल्याचे घोडेस्वार म्हणाले.

वनवे यांनी आभा पांडे यांच्या स्थगन प्रस्तावर पुढील सभेत चर्चा होणार असल्याने उर्वरित तीन पैकी एका स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली. यावर महापौरांनी सध्या करोनाची साथ सुरु आहे,या अनुषंगाने आभा पांडे यांचा स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात आला आल्याचे सांगितले.प्रशासनाकडून पटलावर याची विषयाबाबतची माहिती ठेवण्यात आली ही माहिती कोणालाही नव्हती.सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी अश्‍या माहितीचे पत्र आभा पांडे यांच्या प्रस्तावा पूर्वी दिले आहे त्यामुळे त्यांच्या पत्राची प्रासंगिकता देखील लक्षात घ्यावी लागेल. ३० जून रोजी या विषयावर विशेष सभा घेतली जाईल,त्या सभेत प्राथमिक भाषण ज्यांचा प्रस्ताव आज स्वीकारण्यात आला त्या आभा पांडेच करतील.या गंभीर विषयावर सर्वकष चर्चा सभागृहात झाली पाहीजे तत् पूर्वी प्रशासनाने पटलावर ठेवलेला अहवाल सर्व नगरसेवकांनी वाचला पाहीजे त्यामुळे हाच स्थगन प्रस्ताव कायम ठेऊन पुढील सभेत यावर चर्चा घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

आभा पांडे यांनी महापाैरांचे आभार मानत मात्र तातडीने प्रशसानाकडून कोविड अनुदाना संदर्भातील सर्व नस्ती महापौर किवा आयुक्तांनी आपल्या ताब्यात घेण्याची विनंती केली.शासनाच्या अनुदानातून खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगून या संदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी.यांना पूर्वीच पत्र दिले होते मात्र आयुक्तांना या विषयाचे गांर्भीय कळलेच नाही,आयुक्त या विषयाला घेऊन गंभीर नसल्याचा धक्कादायक आरोप सभेत आभा पांडे यांनी केला. काेविड संदर्भातील सर्व वर्क ऑर्डर,प्रोव्हीजन सीलबंद करण्याची मागणी आभा पांडे यांनी यावेळी केली.शासनाच्या अनुदानाविषयीची माहिती मागवल्यानंतर नसत्यांमध्ये प्रचंड खाडाखोड करण्यात आली असून प्रशासनाने नवीन रजिस्टर उपलब्ध करुन दिले असल्याच आरोपही आभा पांडे यांनी केला.

यावर आयुक्तांनी कोविड अनुदाना संदर्भातील सर्व माहिती ही कोणत्याही नगरसेवकाला कधीही बघण्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगून सध्या करोनाच्या काळात नसत्यांना सीलबंद केल्याने व्यवहारात अडथळे येतील असे मत प्रदर्शित केले.यावर मे २०२१ पर्यंतच्या नसत्या या ताब्यात घेण्यात यावा अशी मागणी करीत जून महिन्याच्या नसत्या सीलबंद करीत नसल्यामुळे प्रशासनाला दैनदिन कामकाजात कोणतेही अडथळे येणार नसल्याचे आभा पांडे म्हणाल्या.

शासनाचे कोट्यावधींचे अनुदान प्रशासनाने नेमके कोणत्या वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च केले,त्या वस्तू कोणाला दिल्या इ.बाबत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून माझ्याकडे सर्व पुरावे उपलब्ध असल्याचे सांगून मी माहिती मागवली तेव्हा महाल येथील एका विशिष्ट केंद्रावर रात्री-अपरात्री संपूर्ण आकड्यांची जुळवाजुळव करण्यात वस्तू भंाडाराच्या एका प्रमुखासह अनेक प्रशासकीय अधिकारी जुंपले होते,सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास माझ्या या आरोपाचाही पुरावा मिळेल,असा खळबळजनक आरोप करीत आयुक्त हे एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत गंभीर नाहीत, ते गंभीर असते तर मला या विषयावर स्थगन मांडण्याची वेळच आली नसती,असा संताप आभा पांडे यांनी आज सभेत व्यक्त केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या