फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजय जय रामकृष्ण हरी...हभप बायकोला बादली बादलीने मारी!

जय जय रामकृष्ण हरी…हभप बायकोला बादली बादलीने मारी!

Advertisements

(रविवार विशेष)

नागपूरातील र्कीतनकार जगताचा तीव्र निषेध

नागपूर,ता. १३ जून: कल्याण तालुक्यातील मलंगगड पट्ट्यातील द्वारली या गावातील हभप गजानन चिकनकर यांचा वृद्ध पत्नीला अमानुष मारहाण करणारा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल होताच अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली,विशेष म्हणजे या ‘सद् गुहस्थाने’आपल्या नावासमोर ‘हरीभक्त परायण’म्हणजे ‘हभप’लावले असल्याने कीर्तनकारांचे जग त्यांच्या या दुष्कृत्याने संतापात ढवळून निघाले,याला महाराष्ट्राच्या उपराजधानीतील कीर्तनकार जग हे ही अपवाद नव्हते.

गजानन चिकनकर यांना दोन पत्नी असून मुलगा,सुना,नातवंडे असा भला मोठा त्यांना परिवार आहे. त्यांचा मुलगा पखवाज वाजवतो,तर ते स्वत: कीर्तनकार आहेत.चार्तुमासात पंढरपूरला जात असून कीर्तनाच्या निमित्ताने ते घरी कमी आणि फिरतीवरच जास्त असतात.
पहील्या पत्नीचे वय ८० पेक्ष्ा जास्त असल्याने तिला घरातली कामे जमत नाहीत.त्यामुळे चिकनकर यांच्याकडून तिला नेहमीच अमानुष मारहाण होत असे.घरातील सुना,नातवंडे यांना देखील चिकनकर यांचे हे ‘आख्यान’नेहमीचेच असल्याने कोणीही त्यामध्ये पडत नसे.चिकनकर यांचा घरात ‘पुरुषी दरारा’असल्याने त्यांच्यासमोर बाेलण्याची कोणाची ताब ही नव्हती.पुरुषी अहंकाराला सोकावलेला हा नराधम यामुळे माणूसकीच्या सर्वच पातळ्या चार भिंतीच्या आत ‘अखंड’ ओलांडत राहीला.

तसंही भारतीय कौटूंबिक रचनेतच बायकोला अमानूष मारहाण ही शुल्लक बाब समजली जाते.तिची अस्मिता,तिचं अस्तित्व,तिचा स्वाभिमान या सगळयांचं स्थान पतीच्या ‘खेटराखालीच’पुरातन काळापासून राहत आलं आहे किंबहूना धर्मग्रंथातच असंच विशद आहे. आधुनिक काळात, सार्वभौम भारताच्या संविधानात महापुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कितीही स्त्री-पुरुष समानतेच्या कायदेशीर कलमा टाकल्या असल्या तरी धर्म,जात,पंथ कोणताही असू देत, लिंगांच्या भेदात ‘ती’चा सन्मान २१ व्या शतकातील ३ -या दशकात ही काय ‘लायकी’च्या आहे,अश्‍या घटना हेच सिद्ध करतात.अर्थातच प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.

एवढंच की आजच्या सोशल मिडीयाच्या अश्‍या घटना आता ठलकपणे समोर येतात व कोट्यावधींच्या हातात मोबाईल हे संयत्र असल्याने क्ष् णात ते देश,कालच्या सीमा ओलांडत व्हायरल ही होतात.या बुवांच्या नातवाच्या हाती देखील त्या क्ष् णी मोबाईलच होता ज्याने तो बुवांची ही अमानुष मारहाण रेकॉर्ड करीत होता.

३१ मे ते ५ जून दरम्यान चिकनकर यांनी वृद्ध पत्नीला मारहाण केल्याचा हा व्हिडीयो असून समाजाच्या सर्वच स्तरातून या बुवांविषयी परकोटीचा संताप व्यक्त होत आहे.ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवसेनेच्या महिला यांनी या बुवांचे घर गाठले तेव्हा वृद्ध पत्नीच्या हातावर,चेह-यावर मारहाणीच्या चांगल्याच खूणा होता व बुवा हे परमेश्‍वराची भक्ती करण्यासाठी आळंदीला गेले होत्याचे कळले!

एवढं ‘रामायण’घडल्यानंतर ही व पोलिस घरी पोहोल्यानंतरही ही माऊली बुवांच्या विरोधात तक्रार देण्यास तयार नव्हती!ना घरातील इतर कुटुंबिय विशेष: महिला वर्ग बुवांच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे आली!अखेर हिललाईन पोलिसांनी सुमोटोअंतर्गत चिकनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.मात्र तरही प्रश्‍न उरतो,या सनातनी माणसाच्या जिव्हेवर ‘देव’ आणि कृतीत ‘दानव’ कसा काय असू शकतो?

कीर्तनकार हे तर कीर्तनातील पूर्वपदामध्ये श्रोत्यांना त्या कृपाळू भगवंताच्या भक्तीत लीन करीत असतो,यानंतर तो एखादा अभंग घेऊन पूर्वरंग रंगवतो,आख्यानात तो हरीची कथा सादर करतो,परमेश्‍वराच्या नावाचा गजर करुन कीर्तन संपवतो.ताल,शब्द,सूर आणि भाव यांच्या निनादात भक्त भावविभाेर होऊन घरी परततो, घरी बायकोला आयुष्यभर मारहाणा करणा-या या बुवांनी मात्र कसे कीर्तन रंगवले असावे?असा प्रश्‍न आता श्रोत्यांनाच पडला आहे.

आपल्या घरातील ८० वर्षाच्या असहाय पत्नीला एवढी अमानूष मारहाण करणा-या कीर्तनकाराला देवाचे नाव आपल्या मुखात आणण्याचा अधिकार तरी आहे का?या बुवांच्याच श्रोत्यांनाच हा प्रश्‍न आता पराकोटीचा छळतोय! कोणतेही क्ष्ेत्र असो त्यात चांगली-वाईट प्रवृत्तीची माणसे ही असतातच मात्र कीर्तनाचे क्ष्ेत्र!हे तर सर्वस्वी पारलौकिक गुण वैशिष्ठयांनी युक्त माणसांसाठीच असल्याची भाबडी समजूत आज देखील भाविकांमध्ये आढळते त्याचे काय?

कीर्तनकारांची दोन रुपे नागपूरातही अनेक श्रोत्यांनी चांगल्याने अनुभवली आहेत.यात पुण्याहून नागपूरात येणारी व मोठमोठे कीर्तन महोत्सव गाजवणा-या काही पुणेरी कीर्तनकारांचा हात आजही कोणीही पकडू शकत नाही.काय बडदास्त राखली जाते त्यांची!राहण्याची व्यवस्था अगदी ‘शाही’तर घरापासून कीर्तनस्थळापर्यंत येण्या-जाण्यासाठी लक्झीरियस गाडी?‘बिदागी‘तर काही बोलूच नका,त्यांच्या मुखातून जो आकडा निघेल तो मान्य होतो!त्यांच्या फक्त नावानेच भरगच्च भरणारी मैदाने या शहराने बघितली आहे,वास्तव मात्र त्यांच्या घरी त्यांच्या गल्लील गेल्यावर कळतं!त्यांच्या गल्लीत त्यांना साधं कूत्र ही विचारत नाहीत……आणि…हेच वास्तव आहे!अनेक बुवांच्या चारित्र्याच्या सुरस कथा या त्यांच्याच पुण्यातील गल्लीत ऐकायला ही मिळतात तेव्हा….व्यासपीठावरुन भगवंतांच्या भक्तीभावाचा गजर करणारी ही कीर्तनकार मंडळी इतरांसारखीच किती ’संधीसाधू’ आहे याची प्रचिती येते आणि या अश्‍याच कीर्तनकारांसाठी नागपूरात मात्र ‘यजमान’ आपले अंगावरील कातडे ही अंथरताना दिसतात तेव्हा आपल्याच शहरातील चारित्र्यसंपन्न आणि गुणी कीर्तनकारांचा होणारा कोंडमारा हा द्रवित करणारा भासतो.‘पर स्त्री माते समान’मानण्याचे उपदेश आपल्या कीर्तनातून देणारा एक पुणेरी कीर्तनकार मात्र आपल्याच तरुण पुतणीसोबत दरवेळेस नागपूरातील हॉटेलातच एकाच खोलीत राहतो आणि….याचे कोणतेही वैषम्य नागपूरातीत यजमानाला वाटत नाही पण पुणेकारांना वास्तव माहीती असतं…..!याला काय म्हणावे?

आपल्या शहराच्याच कीर्तनकारांना हक्काची बिदागी देताना यजमानांचा हात आखडता होतो,पुणेरी कीर्तनकार मात्र भरघोस तुंबडी भरुन चालता होतो.त्यांच्या जाण्या-येण्याच्या विमानाच्या तिकीटासह….!शहरातला कीर्तनकार हा स्कूटरवरुन देखील यायला तयार असतो,कीर्तनसेवेत कुठेही पुणेरी कीर्तनकारांपेक्ष्ा तसूभर ही कमी नसलेला व तेवढ्याच तोडीची रसाळ कीर्तने करणारी नागपूरच्या कीर्तनकार मंडळींची ही व्यथा आज चिकनकर बुवांच्या कृतकृत्याच्या निमित्ताने शब्दबद्ध झाली एवढंच…!

सत्ताधीश’ने चिकनकराच्या संतापजनक घटनेविषयी शहरातील काही सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचे घेतलेले मत-

याला उभ्याने फाडा-हभप डॉ.दिलीप डबीर(राष्ट्रीय कीर्तनकार)
हा व्हिडीयो बघताच एवढा संताप आला की…हा कुठे सापडला तर त्याला उभ्याने फाडलाच असता.कीर्तनशास्त्राची प्रतिष्ठा या नराधमाने धुळीला मिळवली.मूळात हा कीर्तन क्ष्ेत्राचा प्रश्‍नच नाही,जो पुरुष स्त्रीवर हात उगारतो मग तो कोणत्याही क्ष्ेत्रातला असो नराधमच आहे.मूळात स्त्री ही हात उगारण्यासाठी आहे का?हा नराधम तर आपल्या ८० वर्षाच्या पत्नीला अमानुष मारहाण करताना दिसतोय.हे नृशंस कृत्य होय.हा व्हिडीयो बघून अंगावर काटा आला.हा समोर असता तर पायाखालीच तुडवलं असतं याला.प्रकाश एदलाबादकर यांची फेसबूक पोस्ट आहे त्यात त्याने म्हाता-या बाईला एवढी मारहाण होत असताना घरातील मंडळी अगदी निर्विकारपणे आपापली कामे करीत होती याचा अर्थ या नराधमाचा किती मोठा दरारा होता घरच्या लोकांवर हे दिसून पडतं,असं लिहलंय.याचा अर्थ अशी मारहाण घरातल्या त्या लक्ष्मीसोबत नेहमीचीच होत होती.संतश्रेष्ठ श्री गजानन माऊलींच्या पोथीत ज्याप्रमाणे देशमुखाला महाराजांनी काठीने बडवून काढले होते त्याच काठीने या बुवाला बडवून काढण्याची आता माझी ईच्छा आहे.आज स्त्री ही जगभरात पंतप्रधान पदी जाऊन बसली आणि हा बुवा घरातल्या स्त्रीला अजूनही पायाखालची धूळ समजतो?या बुवाने माणूसकीला काळीमा फासली आहे,एवढंच मी म्हणेल.

कीर्तनकारांची प्रतिमा मलीन केली-हभप श्‍यामबुवा धुमकेकर(अध्यक्ष्,वैदर्भिय हरिकीर्तन संस्था,नागपूर)
स्त्रीला अशी मारहाण कीर्तनाच्या नियमात बसत नाही ना ती माणूसकीच्या नियमात बसते.या बुवांनी तर कीर्तनकारांची प्रतिमाच अख्ख्या महाराष्ट्रात मलीन केली.आता श्रोते किवा भाविक कीर्तनकारांना कोणत्या नजरेने बघतील?या एका बुवांच्या कृत्याने समस्त कीर्तनकारांना खाली पाहण्याची वेळ आली आहे.लाेकं ओळखून असतात कोणता बुवा कसा आहे!सर्वच तसे नाहीत.खरे तर वैदर्भिय हरीकीर्तन संस्था या बुवांच्या कृत्याचा निषेध करणार होती मात्र या विषयावर बोलायचेच नाही असे संस्थेने ठरवले आहे कारण मूळात हा कीर्तनकारच असल्याचे आम्ही मानित नाही.वाईट तर त्या माऊलींसाठी वाटतं जिने एवढी मारहाण सहन करुनसुद्धा पोलिसात तक्रार देणार नाही,असे सांगितले.आपला खरा पत्नी धर्म त्या माऊलींनी निभवला आहे.बुवा पतीधर्म मात्र पार विसरुन गेलेत.
व्हिडीयो बघून लोकांचा प्रक्ष्ोभ तर होणारच होता.‘कोणी गुणांनी प्रकट होतो कोणी अवगुणांनी’हा बुवा तर आपल्या अवगुणांनी प्रकट झाला आणि प्रसिद्धीझोतात आला.वारकरी हे तर सरळमार्गी असतात.हा कसला वारकरी?याने तर कीर्तनकारांकडे बघण्याची दृष्टिच बदलली.लाेकं चांगलं हे लवकर विसरुन जातात मात्र वाईट हे कायम लक्ष्ात राहत असतं,आता लोकांना कीर्तनकार म्हटले की चिकनकर बुवाच आठवतील!

व्हिडीयोबद्दल शंकाच-हभप माेहनबुवा कुबेर
खरं सांगायचं तर व्हिडीयोबद्दल थोडी शंकाच वाटते तो खरा आहे का?कारण व्हिडीयोमध्ये घरातील मंडळी ज्याप्रमाणे सहज वावरताना दिसतेय त्यावरुन शंका निर्माण होते.दूसरे म्हणजे व्हिडीयोमधील स्त्रीच बुवांना ‘मला मारा मला मारा’म्हणताना दिसतेय त्यामुळे चवताळून बुवांनी अशी मारहाण केली असावी.व्हीडीयोची सत्यता काय?डोळ्यासमाेर जे दृष्य दिसतात आहे ते खरे मानायचे का?
दूसरे महत्वाचे म्हणजे कुठल्याही माणसाने बाईवर हात उगारणे हे कुठल्याही संस्कृतीत बसत नाही.आपणच म्हणजो ’यत्र नार्यस्तू पूज्यते रमन्ते तत्र देवता’अर्थात ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवतांचा निवास असतो.घरोघरी मातीच्या चूली असतात.मानवामध्येच पशू ही वसतो. मात्र चिकनकर हे नाव वारक-यामध्ये कधी ऐकलेच नाही त्यामुळे मूळात तो वारकरी नाहीच असे माझे मत आहे.असे असले तरी त्याने जे कृत्य केले त्यामुळे त्याला बेताच्या छडीनेच फोडून काढायला हवं.त्याच्या मागे ‘हभप’लागल्यानेच त्या व्हिडीयोचा एवढा बोभाटा झाला.आमच्या राणा प्रताप नगर पोलिस ठाण्यामागील झोपडपट्टीमध्येच दररोज महिलांना मारहाण होते,त्याचा कुठे होतो बोभाटा,त्याची कधी बातमी होते का?या मागे इतर काही देखील असू शकतं असे माझे वैयक्तिक मत आहे.

लांछनास्पद कृत्य-हभप दिगंबरबुवा नाईक
वारकरी याचा खरा अर्थच या बुवांना कळाला नाही.खरा हरीभक्त असता तर असे लांछनास्पद कृत्य हातून घडलेच नसते.स्त्रीबद्दल कीर्तनातून आपण महिमेचे गुणगान करतो अश्‍याच स्त्रीचा आपल्याच घरातील चार भिंतीत एवढा असा अवमान?विश्‍वास बसत नाही.अतिशय खालच्या दर्जाचे कृत्य असून निंदनीय हा शब्द देखील कदाचित संताप भरुन काढण्यास कमी पडेल.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या