

(संग्रहीत छायाचित्र)
जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणानंतर स्थानिकांना रोजगार
‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण’
नागपूर, दि.४ जून: सध्या राज्यामध्ये कोविड-१९ साथीच्या आजारवरील रुगणावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत असून यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थकेअर सेक्टर स्कीलकौन्सील मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक युवतींना रुग्णालयात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या रुग्णालयात नोकरी देण्यात येईल. त्यामुळे रुग्णालयांना कुशल मनुष्यबळही उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करुन प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) देण्यात येणार आहे. प्रशिक्षण संस्थांना राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल. या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी व खाजगी रुग्णालयामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यात युवक युवतींना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. ग. हरडे यांनी दिली.
या कोर्सचे प्रशिक्षण
वैद्यकीय तंत्रज्ञ, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, आयुर्वेद डायटिशियन, योगा थेरपी सहायक, मेडिकल रेकॉर्ड सहायक, ड्यूटी मॅनेजर, डायबिटीज असिस्टंट, ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, रूग्णवाहिका चालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी केअर टेकर, वैद्यकीय साहित्य तंत्रज्ञ, योगा वेलनेस ट्रेनर, आयुर्वेद आहार आणि पोषण सहायक, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन यासह ३६ कोर्सेस.
शैक्षणिक पात्रता : किमान दहावी उत्तीर्ण ते पदवीधारक.
रुग्णालयांनी या योजनेत सहभाग नोंदविल्यानंतर रुग्णालयांची यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून गुगल फॉर्मद्वारे अर्ज भरून घेण्यात येतील. आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता असून या योजनेमार्फत ती भरून काढण्यात येईल. – प्र. ग. हरडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग.
रुग्णालयांना आवाहन
सरकारी रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये वीसपेक्षा अधिक बेडची सुविधा असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.2, दुसरा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर येथे किंवा 0712-2531213 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कार्यालयीन ईमेल आयडी-nagpurrojgar@gmail.com वर संपर्क साधता येईल.

आमचे चॅनल subscribe करा