फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहापाैरांची धान्य वाटपाची मदत कि कलाकारांची क्रूर थट्टा!

महापाैरांची धान्य वाटपाची मदत कि कलाकारांची क्रूर थट्टा!

Advertisements

भिक्षेकऱ्यांच्या रांगेत कलावंतांचे आसन स्थान!

निकृष्ट धान्य देऊन कलावंतांची बोळवण

बेइज्जती करने बुलाया क्या?कलाक्षेत्रात रोष

नागपूर,ता. २५ मे: शहराचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी यांना शहरातील प्रत्येक नागरिक करोनाच्या काळात उपाशी मरु नये याची काळजी आहे,त्यामुळेच गरजूंना धान्याच्या किट वाटपचा कार्यक्रम ही ते अगदी कार्यक्रम-सोहळे रंगवून घेताना आढळतात,नुकतेच त्यांचेच मतदारसंघ असणा-या व त्यांचे सर्वाधिक आवडते ठिकाण म्हणजे गांधीबाग बगिच्यात असेच शहरातील १०० गरजू कलावंतांना धान्याच्या किट वाटपाचा सोहळा ‘साग्रसंगीतपणे नुकताच पार पडला मात्र कलावंतांसोबतच शहरातील अनेक गरीब,गरजू भिक्षेकरी हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते,याच भिक्षेकरींच्या रांगेत शहरातील अनेक ज्येष्ठ कलावंतांनाही बसवण्यात आल्याने महापौरांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे,महत्वाचे म्हणजे या सोहळ्यात महापौर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलांवर पावलेे टाकीत आपल्या ‘स्वआत्ममग्न’भाषणात कलावंताना एक महिना पुरेल एवढे धान्य दिल्या जात असल्याची नेहमीच्या हसतमुखातून ‘घोषणा’ ही केली मात्र प्रत्यक्षात एक दिवस ही पुरणार नाही एवढी लहानशी धान्य किट वाटप करण्यात आली!

या किटमध्ये एक पाव साखर,एक किलो कनिक त्यात ही सोंडे आढळले,बुरशी लागलेले अर्धा किलो शेंगदाणे,तिखट तर गायबच होतं मात्र हळदीचे एक सोडून दोन पाकिटे दिली,विशेष म्हणजे सांभार मसाल्याचे पाकीट या किटमध्ये कलावंतांना सापडल्याने घरी जिथे दोन वेळा जेवणाची भ्रांत आहे तिथे महापौरांना गेल्या १४ महिन्यांपासून लॉकडाऊनची वेदना भोगणा-या कलावंतांकडे इडली सांभार दोसाची पर्वणी असते असा समज झाला का?असा प्रश्‍न कलावंतांच्या मनात उपस्थित झाला. एक तेलाचे पाकीट,एक लोणच्याचे पाकीट १० रुपयेवाले व एक सांभार मसल्याचे पाकीट ते ही १० रुपयेवाले! महापौरांच्या नजरेत हे होते एका महिन्याचे धान्याचे किट!

एक पाव साखरेमध्ये पाच जणांच्या कुटुंबियांमध्ये एक महिन्याचा चहा होतो?यावर आता संशोधनाचीच गरज असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

(छायाचित्र-हे आहे महापौर घोषित एका महिन्यांचे धान्य!)

कलाकारांच्या ‘लॉबींगवर ’रोष-
या ठिकाणी अनेक ज्येष्ठ कलावंतांना आग्रहाने उपस्थित राहण्याचे आवाहन महापौरांच्या मतदार संघातील एका कलाकारावरच सोपवण्यात आल्याची माहिती आहे.या कलाकाराने अनेक ज्येष्ठ कलावंताना ’तुम्हाला उपस्थित राहायचेच आहे’असा पराकोटीचा आग्रह धरल्याने व धान्य किटची गरजही असल्याने अनेक ज्येष्ठ कलावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहीले मात्र या ठिकाणी ४० ते ५० भिक्षेकरीही रांगेत बसले होते त्याच रांगेत या कलावंतांना बसवण्यात आल्याने अनेकांच्या मनात तीव्र संताप उमटला मात्र आपल्या कला क्षेत्रातील त्या कलाकाराकडे बघून ‘अपमानाचा तो घोट’त्या ज्येष्ठ कलावंतांनी मुकाट्याने प्यायला.

अनेक कलावंतांनी महापौरांनी ‘सढळ’ हस्ताने दिलेली व एक महिना पुरेल अशी ‘जादूची’ लहानशी धान्याची किट’तेथे उपस्थित भिक्षेकरींनाच वाटून घराचा रस्ता धरला!कलावंतांच्या व्हॉट्स अॅप ग्रूपवर मात्र कला क्षेत्रातील या ‘ग्रूपीझम‘वर चांगलीच चर्चा झडली,महापौरांपेक्षाही कलावंतांचा अपमान होण्यास तो पुढाकार घेणारा कलावंत जास्त जवाबदार असल्याचे बोल याप्रसंगी सुनावण्यात आले.

गेले १४ महिने वादक,गायक,ध्वनि व्यवस्थापक,प्रकाश योजनाकर,मिमिक्रि आर्टिस्ट,बॅक स्टेज कलावंत असे शहारातील हजारो कलावंत व त्यांचे कुटुंबिय एकटेच करोनापेक्षाही भयंकर अश्‍या लॉकडाऊनच्या तडाख्यात भरडल्या जात आहे,ना केंद्र ना राज्य सरकार ना स्थानिक प्रशासनाने त्यांची वा त्यांच्या बालबच्च्यांची सूध घेतली.गेल्या वर्षी तरी शहरातील काही आमदारांनी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या कम्यूनिटी किचनमुळे अनेकांना दिलासा मिळाला मात्र कराेनाच्या दुस-या महाभयंकर लाटेत झाडून-पुसून सर्वच राजकीय नेत्यांनी व नोकरशाहीने कलावंताना अक्ष् र: उपाशी मरणाच्या दारावर नेऊन सोडले आहे.

सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणि लग्न सराईमध्ये फक्त २५ लोकांचीच अट आहे,यामुळे १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वाधिक व्यस्त असणारे कलावंत हे रिकामे घरी बसले,गुढीपाडवा पासून तर रामनवमी,हनमान जयंतीनिमित्त नेहमी बूक राहणारे कलावंत यांच्यासमोर मुलांची डायनोसोरसारखी अवाढव्य थकलेली फि,गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ,मोदींनी ‘आयडियाच्या कल्पनेने’ बंद केलेले गॅसवरचे अनुदान,पालकमंत्री व उर्जामंत्री नितीन राऊत यांचा धक्कादायक विज बिलाच्या भरणाचा रेटा,घराचे भाडे,बँकेचे कर्ज अश्‍या एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या असताना,महापौरांनी ‘इंडिया टि.व्ही’च्या सहकार्याने कलावंतांना एक महिन्याच्या धान्य किटच्या वितरणाची केलेली घोषणा व त्यातून मिळणारा मानसिक व भावनिक आधार या भरवश्‍यावर शहरातील अनेक ज्येष्ठ तसेच इतरही असे ७० च्या जवळपास कलावंत गांधी बाग येथील या सोहळ्यात मोठ्या आशेने पाहोचला पण?

‘महापौरांच्या राशनाने नव्हे पण भाषणानेच एक महिन्याचे पोट भरले’अशी प्रतिक्रिया देत बाहेर पडले!

गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच कलावंतांना ’भूक ’असते का?
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार,दि. २७ मे रोजी सायंटिफिक सभागृहात माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकारातून शहरातील १०० कलावंत तसेच १०० क्रिडा प्रशिक्ष् कांना धान्य किटचे वितरण केले जाणार असल्याची माहिती काल सोमवार दि. २४ मे रोजी त्यांनी पत्र परिषदेत दिली.

ही माहिती प्रसिद्ध होताच अनेक कलावंतांनी प्रश्‍न उपस्थित करीत,खूप चांगला उपक्रम आहे मात्र गेल्या १४ महिन्यांपासून हाताला काम नसणा-या कला क्षेत्रातील कलावंताना फक्त गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच भूक लागते का?असा मार्मिक प्रश्‍न उपस्थित केला.
जी माणसे आजच्या संकटाच्या काळात सढळ हस्ताने गरजू समाजाची मदत करु शकतात त्यांनी गडकरी यांच्या वाढदिवसाचाच मुहूर्त का साधावा?तोपर्यंत गरजूंनी कळ सोसावी का?असेच असेल तर गडकरी यांचा वाढदिवस ३६५ ही दिवस साजरा करा,यामुळे तरी आमच्या लेकराबाळांची भूक शमण्यास मदत होईल,अशी मागणी समाज माध्यमांवर व्यक्त करण्यात आली.

आज खरी गरज माणूसकीचीच असून सोहळे,भपकेबाजी,प्रसिद्धी लाटण्याचे उपक्रम याची नितांत चिड आता नागपूरकर जनतेला आली आहे,महापौरांच्या ‘धान्य किट वाटप सोहळ्यानंतर’ तर सांस्कृतिक जगातील कलावंतांनी अश्‍याप्रकारच्या मदतीची चांगलीच ‘धास्ती’घेतली आहे.

खरा कलावंत हा स्वाभिमानी असतो.तो उपाशी मरणे पसंद करतो मात्र उपेक्षा आणि अपमान त्याला सहन होत नाही,महापौरांच्या अश्‍या स्वपाच्या‘मदती’मुळे कलांवतांनी आता ’इंडिया टी.व्ही असो किवा अमेरिकन टी.व्ही’अश्‍या कार्यक्रमात ‘याचक’ बनून जायचेच नाही व शहरातील भिक्षेकरींच्या रांगेत बसायचे नाही,असा निर्धार केला आहे.झाला तेवढा अपमान पुरे,पुढे निवडणूकीत याच राजकीय नेत्यांना कलावंतांच्या कलेची खरी गरज पडणारच आहे,त्यावेळी १४ महिन्यांच्या या लॉकडाऊनचा व कलावंतांसोबत झालेल्या वर्तवणूकीचा हिशेब मागू असा सूर कला जगातत उमटला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या