

नागपूर दि.२१ मे:- कोविड पश्चात रूग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद रूग्णालयात नोव्हेंबर २०२० पासून निरंतर पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
रविवार व्यतिरीक्त दररोज सकाळी ८.३० ते १२.३० या वेळात तळमजल्यावरील बाह्यरुग्ण विभागात ही सेवा सुरू आहे. या ओपीडीव्दारे कोविडमधून बऱ्या झाल्यानंतर रूग्णांमध्ये थकवा, दम लागणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, तोंडाला चव न येणे, भूक न लागणे, अंगदुखी, सांधेदुखी, चिडचिड अशा समस्यासांठी रुग्णांना मार्गदर्शन करून त्यावर उपचार केले जातात. तसेच औषधी चिकित्सा, पंचकर्म उपक्रम, योगोपचार, आहार विहारविषयक सल्ला तसेच समुपदेशन ४,५,६ क्रमांकांच्या ओपीडीमध्ये केल्या जातात.
वैद्य घनशाम कोडवाणी आणि वैद्या सुमीता जैन यांच्या मार्गदर्शनात कोविडवर प्रभावी अशा अश्वगंधा, जेष्ठमध, सितोपलादी चूर्ण, आयुष-६४, च्यवनप्राश आदीचा वापर करण्यात येतो.
फुप्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी प्राणायाम, नेति व कपालभाती या शुध्दक्रीयांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण रूग्णांना दिले जाते. पंचकर्म चिकीत्सेचा गरजेनुसार प्रयोग केल्या जातो.रूग्णांमध्ये सकारात्मकता कायम ठेवण्यासाठी समुपदेशनही केले जाते.
कोविड रूग्णांमध्ये व्यक्तीश: आहारविषयक मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी आयुर्वेंदीय संकल्पनेप्रमाणे ऋतुनूसार जीवनशैली व आहार योजना अवलंब केला, तर कोविड पश्चात विकार टाळता येतात. कोविड नोडल अधिकारी म्हणून वैद्य प्रकाश काबरा येथे कार्यरत आहेत तर सर्व वैद्यकीय सुविधांची देखरेख निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्य लुईस जॉन करीत आहे. तरी या पोस्ट कोविड सेवेचा लाभ रूग्णांनी घ्यावा असे आवाहन अधिष्ठाता वैद्य सुभाष राऊत यांनी केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा