

माजी विद्यार्थ्यांनी दिले तीन कॉन्सेन्ट्रेटर
नागपूर,ता. २१ मे: गुड मॉनिंग, गुड नाईट, आरआयपी, अभिनंदन याच्या पलिकडे जाऊन वॉट्सअॅपसारख्या सोशल माध्यमाचा वापर करून काहीतरी समाजोपयोगी कार्य करावे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या बुलडाणा येथील एडेड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या वॉट्सग्रुपने निधी संकलित करून तीन कॉन्सेन्ट्रेटर दान करीत नवा पायंडा पाडला आहे.
कोविडचा काळराक्षस सर्वत्र थैमान घालत असतानाच समाजात घडणा-या काही सकारात्मक घटना एखाद्या जखमेवर हळूवार फुंकर घातल्यासारख्या वाटतात. त्यातीलच हा एक स्तुत्य सेवाभावी उपक्रम आहे.
बुलडाणा शहरातील ९४ वर्षे जुन्या प्रथीतयश एडेड हायस्कूल या शिक्षण संस्थेचेशालेय जीवनात संस्कार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा देणा-या एडेड हायस्कूलचे माजी विद्यार्थी नागपूर, मुंबई, पुणे, दिल्ली इतकेच नाही तर जगभर विखुरले आहेत. त्यांचे सध्या तीन वॉट्सअॅप ग्रुप कार्यरत आहेत. या ग्रुपवर नेहमीच फॉरवर्डेड मॅसेजेस टाकण्यापेक्षा नवीन, कल्पक, समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. सध्या सर्वत्र निराशेचे वातावरण असून बुलडाण्यातील कोविड रुग्णांच्या मदत करावी, सध्याचा प्राणवायूचा तुटवडा बघता ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर त्यांना द्यावे, असा विचार या ग्रुपवर चर्चेत आला. त्याकरिता अवघ्या चार दिवसात या तिनही वॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात निधी संकलीत केला. या निधीतून तीन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेण्यात आले.
एडेड हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे व सदस्यांनी हे कॉन्सेन्ट्रेटर गुरूवारी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना सुपूर्द केले. एस. रामामूर्ती यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतूक करतानाच यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवून शाळेचे नाव मोठे करावे, असे उद्गार काढले.
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह एडेड हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे, उन्मेष जोशी, मनोज बुरड, आनंद संचेती, अशोक शर्मा, आशिष शर्मा, विनोद राठी,राजेंद्र महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.




आमचे चॅनल subscribe करा
