

लस खरेदी करण्यासंदर्भात राज्य सरकारचा हा दुजाभाव कशासाठी?
प्रवीण दटके यांचा सवाल
नागपू,ता.१३ मे: : लस खरेदीसाठी नागपूर महापालिकेने अनेक दिवसांपासून मागितलेली परवानगी राज्य सरकार देत नाही आहे आणि दुस-या बाजूला मुंबईतील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेला १ कोटी लस खरेदीची परवानगी दिली जाते. हा राज्य सरकारचा विदर्भाबाबत केलेला दुजाभाव नाही काय? असा प्रश्न उपस्थित करत करोनाच्या बाबतीत राज्य सरकार सातत्याने विदर्भावर अन्याय करत राजकारण करत असल्याचा आरोप शहर अध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी केला.
शहरातील लोकप्रतीनिधींना जनतेची काळजी असल्यामुळे आम्हालाही आहे. त्यामुळे नागपुरात वेगाने लसीकरण व्हावे , सगळ्यांनाच लस मिळावी म्हणून महापालिकेने लस विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विरोधी पक्ष नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. महापालिका लस विकत घेण्यासाठी निधी देण्यास तयार आहे. नगरसेवक निधी देण्यास तयार असताना या योजनेला शहरातील काही राजकीय नेत्यांनी विरोध केला. त्यावर प्रशासकीय अधिका-यांनी तर राजकारण्याच्या थाटात या योजनेला विरोध करत वेगाने होणा-या लसीकरणास विरोध करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई महापालिकेतील सगळ्याच गटनेत्यांनी मुंबईसाठी लस घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ग्लोबल टेंडर काढले जाते तर हाच न्याय नागपूर महापालिकेसाठी का नाही? असा सवाल दटके यांनी उपस्थित केला.
६ मे ला महापौर दयाशंकर तिवारी यांनी लस खरेदीची परवानगी नागपूर महापालिकेला मिळावी या साठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मात्र आजपर्यत त्यावर नागपूरला परवानगी देण्याबद्दल काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि मुंबईला मात्र लस खरेदीची परवानगी मिळाली आहे. नागपूरात लसीकरणाची प्रक्रिया सुरू असताना राज्य सरकार मात्र दुजाभाव करत असल्याचा आरोप दटके यांनी केला.
सत्ता कुणाचीही असो अडचणीच्या काळात जे शक्य आहे. त्या त्या मार्गाने ते काम केले पाहिजे. लोकप्रतिनिधी असो की प्रशासकीय अधिकारी, जनतेचे हित समोर ठेवले पाहिजे मात्र मुख्यमंत्र्यांना केवळ मुंबईपुरतेच प्रेम असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेला लस विकत घेता येत असेल तर नागपूरल महापालिकेला ही ती घेता यावी. यात राजकारण केले जाऊ नये , मुख्यमंत्र्यांनी नागपूरलासुद्धा लस खरेदीची परवानगी द्यावी आणि नागपुरातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्यांचे वजन वापरून लस खरेदीची परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी दटके यांनी केली.
यावेळी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
