

आमदार-खासदार निधीचा असाही चूराडा
नागपूर,ता. ३ मे: गेल्या वर्षी २०२० मध्ये करोनाच्या प्रकोपाच्या काळात मनपा प्रशासनातर्फे दहा झोनमध्ये दहा शववाहिका नागरिकांना नि:शुल्क उपलब्ध होणार असल्याचा दावा केला गेला होता.आमदार व खासदार निधीतून या शववाहिकाचे ऑर्डर ही देण्यात आले मात्र एका स्वयंसेवी संस्थेने मनपाला जी शववाहिका नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिली ती फक्त आठ लाखांची होती,आमदार व खासदार निधीतून मनपा प्रशासनाने मात्र ज्या दहा शववाहिकांची निर्मिती केली त्यांची लागत प्रत्येकी १६ ते १८ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.मनपाने दुप्पट रक्कम मोजून मृतदेहांसाठी वातानूकूलीत शववाहिका निर्माण केल्या होत्या का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे त्यातील निम्म्या शववाहिका या आता फक्त दीडच वर्षात भंगारात जमा आहे!
आरोग्य विभागाचे डॉ.दासरवार यांना नागपूर शहरात करोनामुळे मृतांचा खच पडत असल्यामुळे व आता तातडीने शववाहिकांची गरज पडल्याने त्यांनी त्याच स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष्ाला फोन करुन त्यांची शववाहिका मनपा मुख्यालयात मागावून घेतल्याची माहिती या अध्यक्ष्ांनी खास ‘सत्ताधीश’ला दिली.याचा अर्थ गेल्या वर्षी करोनासारख्या संसर्गजन्य महामारीला मनपा प्रशासन व पदाधिका-यांनी किती ‘हलक्यात’घेतले हे सिद्ध होतं.
आमदार व खासदार निधीतून उपलब्ध झालेल्या या दहाही शववाहिकेची खरी गरज ही करोनाचा प्रकोप तांडव करीत असताना आज या नागपूर शहराला होती मात्र प्रत्येक प्रकल्पात व उपक्रमात पैसे खाण्याची व भ्रष्टाचार करण्याची सवय जडलेल्या मनपा प्रशासन व पदाधिका-यांना याचे गांर्भीय आज नागपूरातील प्रत्येक दहनघाटांवर मृतांचा खच पडल्यानंतरच झाली,असेच आता म्हणावे लागेल.
देर आये दुरुस्त आये….
आज महापौर दयाशंकर तिवारी व परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी पुढाकार घेऊन २५ शहर बसेस या रुग्णवाहिकेत परिवर्तित केले.खासगी रुग्णवाहीकेचे मालक हे रुग्णांकडून दोन किलोमीटरसाठी देखील १० ते १५ हजार रुपये लाटत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे मनपाने आता नागरिकांसाठी या २५ बसेस नि:शुल्क उपलब्ध करुन दिल्या असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.
हे पाऊल एप्रिलच्या पहील्याच आठवड्यात उचलले गेले असते तर शेकडो नागरिकांची लृट थांबली असती मात्र आज ही शहरात करोना संसर्गाची स्थिती ही भयावह आहे,त्यामुळे या २५ नि:शुल्क व ऑक्सीजनयुक्त बसेस नागरिकांना उपलब्ध झाल्यास थोडा तरी दिलासा नागरिकांना मिळणार आहे,यात दूमत नाही.
आणि…फोन नंबर चक्क लागला!
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातील फोन क्रमांक लावला असता चक्क फोन उचलल्या गेला.परिवहन विभागाचे संचालन अधिकारी गिरीश महाजन यांनी फोन उचलला व दूपारी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून अनेक झोनमधून रुग्णवाहिकेसाठी अनेकांचे फोन अाल्याचे सांगितले.उद्या पासून झाेन निहाय दहा ही झोनमध्ये प्रत्येकी २ बस-रुग्णवाहीका उपलब्ध राहणार असून मनपा मुख्यालयात ५ बस-रुग्णवाहीका उपलब्ध राहणार आहे.यामुळे नागरिकांना आता झाेनमध्येच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बसमधील वाहकांना मनपाच्या डॉक्टरांमार्फत ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी परिवहन विभागामध्ये कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
या व्यवस्थेचे प्रमुख गिरिश महाजन आहे. श्री. जितेन्द्र (बंटी) कुकडे यांनी सांगितले की परिवहन विभागामार्फत बस ऑपरेटरांना निर्देश देण्यात आले आहे की बस चालक आणि वाहकांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा आरोग्य बीमा काढण्यात यावा. जर वाहन चालक किंवा वाहकाला कोरोना झाला तर त्याला बीमेचा लाभ मिळेल. रुग्णवाहिकेसाठी सेवा देणारे सर्व चालक व वाहक कोव्हिड योद्धा म्हणून सेवारत राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, नागरिकांना २४ तास रुग्णवाहिकेची सेवा मिळावी यासाठी २५ रुग्णवाहिकांच्या संचालनासाठी ७५ चालक व ७५ वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वाहक व चालकाची ६ तासाची कामाची पाळी असणार आहे.
या क्रमांकावर करा संपर्क-
०७१२-२५५१४१७, ९०९६१५९४७२




आमचे चॅनल subscribe करा
