फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजऐ नितीन गडकरी को फोन लगा.....

ऐ नितीन गडकरी को फोन लगा…..

Advertisements


मृत पित्याच्या मुलीचा मेयोसमोर टाहो

महाराष्ट्र सुरक्ष्ा बलाच्या जवानाचेही असंवेदनशील कृत्य

नागपूर,ता. २४ एप्रिल: जगातील कोणतंच मूल बापाला दूधावरची साय म्हणत नाही,लंगड्याचा पाय म्हणत नाही,वासराची गाय म्हणत नाही,बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात,बाबा असतो मुलांच्या आडनावा पूरता!असं असताना ही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते?का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस?का वाटतं मुलांना पायखालची जमीन सरकल्यासारखी?का वाटतं मुलांना की आपण…आपण बेसहारा झालोय म्हणून?का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर?का मूलं घाबरतात बाबा गेल्यावर?कथा,कादंब-या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थरदिल बाबा प्रत्यक्ष्ात जेव्हा ’नसलेला’ होतो तेव्हा का वाटतं मुलांना की….डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात…डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात…डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण…पण डोळ्यात प्रेम न दाखवताच जो प्रेम करतो त्याला… बाबा म्हणतात…!

फार पूर्वी एका अज्ञात कविची ही कविता खूप व्हायरल झाली होती.आज या कवितेची आवठवण झाली कारण नागपूरातील गोर गरीबांचे आशास्थान असणारे इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय म्हणजे मेयो मध्ये असाच एक बाबा….दोन तास श्‍वासासाठी झगडून अखेर मेला आणि…त्याच्या मुलीने तिथेच हंबरडा फोडला…व्यवस्थेला दूषणे दिली…सध्या नागपूरकरांचे आधारस्तंभ समजल्या जाणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना फोन लाव गं…म्हणून आपल्या आईला ती सांगतेय…..!

दोन तास तिचा बाबा…मेयोसमोर उपचारासाठी तडफडला….शेवटी पैसे दिले तेथील अटेंडेट नावाच्या करोना योद्धांना किंबहूना ‘गिद्धांना’..दोन तासांनंतर तिच्या बाबांना ऑक्सीजनची नळी लावली पण…..या निष्ठूर जगात त्यालाच आता रहायचे नव्हते…..!दोन तास तिचा बाबा मांडीवर डोकं ठेऊन संपणा-या श्‍वासांची झगडत होता….!

सध्या न्यायालयाच्या आदेशावरुन रुग्णालयांसमोर महाराष्ट्र सुरक्ष्ा बलाच्या जवानांची ड्यूटी लावण्यात आली आहे.त्यातील एका जवानाने अतिशय असंवेदनशील कृत्य करीत या बाबांच्या लाडक्या पोरीला मृतदेहासोबत ‘चल निकल यहा से…..’म्हणत दूत्कारले…..!
यानंतर तिच्या उद्रेकाचा स्फोट झाला आणि…तेथे उपस्थित इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील या मुर्दाड झालेल्या वैद्यकीय व्यवस्थेवर अश्‍लील शिव्या देत तोंड सुख घेतले…!

बंटी शेलके यांची बघ्याची भूमिका!

काँग्रेसचे युवा ब्रिगेडचे नेते व मध्य नागपूरातील विधानसभेचे पराभूत उमेदवार बंटी शेलके यांनी या प्रसंगी फक्त बघ्याची भूमिका घेतली,असा आरोप केला जात आहे.मेयोचे अधिष्ठाता डॉ.केवलिया व डॉ.सागर पांडे यांच्यासोबत अतिशय ‘मधूर‘संबंध असलेले बंटी शेलके मात्र या दोघांच्या मदतीने त्यांच्या प्रभागातले…त्यांच्या ओळखीतल्या रुग्णांसाठी मेयोमध्ये चोखपणे ‘व्यवस्था‘सांभाळताना दिसतात….!
या युवा नेत्याने व त्याच्या युवा कार्यकर्त्यांनी दू:खाने कोलमडून पडलेल्या या तरुणीला कोणताही मदतीचा हात तर दिला नाहीच मात्र तिथे उपस्थित एका पोर्टलच्या पत्रकारालाच दमदाटी केल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे!

असे व्हिडीयो काढून मेयोची बदनामी का करता?असा त्यांचा ‘वांझोटा’सवाल होता!मात्र ज्या मेयोमध्ये डॉ.केवलिया यांच्या आदेशानंतर काही रुग्णांना बेड उपलब्ध होतात…१५०० रुपये गोर गरीब रुग्णांच्या नातेवाईकांकडून ‘उकळले‘जातात..त्या व्यवस्थेविरोधात माणूसकीच्या नात्याने काँग्रेसच्या या युवा नेत्याने कोणताही आवाज उचलला नाही….!

चौथ्या स्तंभाचे स्वातंत्र्य संकटात!
जगातील सर्वात मोठी लोकशाही असे बिरुद मिरविणा-या भारताचे माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत १४२ वे स्थान आहे!‘रिपोटर्स विदाऊट बॉडर्स’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे जगरभरातील वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या स्थितीची पाहणी करुन,दर वर्षी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो.आज मेयोसमोर भयाण वास्तव आपल्या कॅम-यात टिपणा-या या पत्रकाराला बंटी शेलके यांच्याकडून झालेली शिवीगाळ काय अधोरेखित करते?या देशातला पत्रकार निर्भिडपणे काम करु शकत नाही का?त्यांची मुस्कटदाबी करुन वेळप्रसंगी त्यांचा आवाज दाबण्यासाठी या देशात पत्रकारांची हत्या देखील करण्यापर्यंत अनेकांची मजल जाते!या अहवालात १८० देशांची क्रमवारी जाहीर केली असून त्यात भारताचे स्थान १४२ वे!भारतातील वातावरण पत्रकारांसाठी असुरक्ष्ति आणि धोकादायकच असल्याचे या अहवालाने स्पष्ट केले…..!

फडणवीसांचा दौरा मेयो मेडीकलमध्ये नाही तर मनपाच्या आयुष रुग्णालयालात!
विधानसभेचे विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवार दि. २३ एप्रिल रोजी महापालिकेच्या सदर येथील आयुष रुग्णालय आणि पाचपावलीच्या डेडीकेटेड कोविड हेल्थ केयर केंद्राला आपला संपूर्ण लवाजामा घेऊन भेट दिली.त्यांच्यासोबत महापौर दयाशंकर तिवारी,सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे,स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर होते.आयुष रुग्णालयात मनपातर्फे ४० खाटांची ऑक्सीजन बेडची सुविधा मनपाने करुन दिल्याचे कौतूक केले.गंभीर रुग्णांना मात्र शासकीय रुग्णालयात पाठवले जाते!पाचपावलीच्या डीसीएचसीलाही त्यांनी भेट दिल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली मात्र नागपूरातील गाेर गरीब रुग्ण हे ज्या मेडीकल,मेयोमध्ये धाव घेतात…त्या रुग्णालयांपर्यंत या राजकारणी लोकांची मात्र धाव होत नाही….!

ऑक्सीजन बेडचे वास्तव!
मेयो रुग्णालयातून बाहेर पडलेल्या या रुग्णाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले,ऑक्सीजन नळीमध्ये थोड्या थोड्या वेळाने पाणी टाकावे लागते मात्र रुग्णांच्या नळीमधील पाणी संपले तरी अनेक परिचारिका याकडे लक्ष् न देता ‘व्हाट्स ॲप’चॅटिंगमध्ये व्यस्त असतात…..!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या