फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरंगभूमी वर जे काही कार्य केलं त्याला अर्थ प्राप्त झाला-एल.वाय.देशपांडे

रंगभूमी वर जे काही कार्य केलं त्याला अर्थ प्राप्त झाला-एल.वाय.देशपांडे

Advertisements

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा

नागपूर,ता. १४ एप्रिल: आजपर्यंत मी रंगभूमी वर जे काही कार्य केलं त्याला अर्थ प्राप्त झाला असं मला वाटतं. या पुरस्काराने मला विशेष आनंद तर झालाच शिवाय ७३ व्या वर्षी रंगभूमीसाठी पुन्हा नवीन करण्याची उमेद दिली. माझ्या आजवरच्या कार्याचा गौरव जीवन गौरव पुरस्कार देऊन केला त्यासाठी मी आभारी आहे,असे मनोगत सन्मानाच्या वेळी एल. वाय देशपांडे यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण सोहळा शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, उपाध्यक्ष . शेखर सावरबांधे, कोषाध्यक्ष संजय रहाटे व प्रमुख कार्यवाह नरेश गडेकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता वर्धापन दिनाचा कार्यक्रम व पुरस्कार सोहळा कुठल्या एका विशिष्ट स्थळी न घेता मोजक्या पदाधिकारी यांचे उपस्थितीत नागपुरात उपलब्ध असलेल्या सन्माननीय सत्कारमूर्ती यांचे निवासस्थानी जाऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचे वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मीकांत देशपांडे यांना त्यांचे निवासस्थानी प्रदान करण्यात आला.

लक्ष्मीकांत देशपांडे हे नाट्य सृष्टीत एल. वाय. म्हणून ओळखले जातात. अनेक नाटकात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे. गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव मधून रंगकर्मी या नात्याने कार्य करीत कामगार नाट्य स्पर्धा, राज्य नाट्य महोत्सव , व्यावसायिक नाटक असा त्यांचा प्रवास सुरू झाला. अर्ध्याच्या शोधत दोन…एक पप्पा एक मम्मी…. संगीत देवमाणूस…. ही नाटके त्याकाळी विशेष गाजली. का? असं का? या नाटकापासून खऱ्या अर्थाने दिग्दर्शना ला सुरुवात झाली. अनेक पारितोषके प्राप्त नाटक विदूषक हे नाटक रसिकांच्या कायम स्मरणात राहील. या नाट्य प्रवासात पहिला राजा…… मिकी मेमसाब…सरी ग सरी…. कन्यादान… कमला… आणि यकृत या नाटकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. वाळूचं घर या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. ती फुलराणी… छुमंतर… खरं सांगायचं तर…. नटसम्राट या नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. लक्ष्मीकांत देशपांडे दिग्दर्शित नातीगोती आणि सविता दामोदर परांजपे या नाटकांनी वेगळी उंची गाठली.

अतिशय सन्मानाचा असलेला ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार मृणाल पुराणिक यांना प्रदान करण्यात आला.मृणाल पुराणिक यांचा ४५ वर्षांचा नाट्य क्षेत्रातील अभिनेत्री म्हणून यशस्वी प्रवास आहे. हिंदी आणि मराठी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ठ अभिनया साठी अनेक सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झाली आहेत. स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मराठी रंगभूमी वरील ज्येष्ठ अभिनेते स्व. प्रभाकर पणशीकर यांच्या सोबत तो मी नव्हेच या नाटकात भूमिका केलेली आहे. फय्याज.. रमेश भाटकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं आहे. एकापेक्षा एक सरस अश्या नामांकित दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनात अभिनय केलेला आहे. नागपूर दूरदर्शन … दूरदर्शवरील मालिका.. तसेच मराठी चित्रपटातून सुध्दा मृणाल पुराणिक यांनी काम केलेले आहे. पुरस्काराचे वेळी आपल्या भावना मांडताना मृणाल पुराणिक म्हणाल्या रंगभूमी वर काम करत असताना अनेक चांगल्या भूमिका मिळाल्या. उत्तम दिग्दर्शक लाभले. काम करत राहिले.. अनेक पुरस्कार प्राप्त झाले. लोक ओळखायला लागले. नाट्य परिषदेच्या ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित झाल्याने मला विशेष आनंद तर झालाच शिवाय लोकांमध्ये वेगळी जाणीव निर्माण केली. ज्यांना माझ्या कार्याबद्दल पुरेशी माहिती नव्हती त्यांना माहीत झालं. त्यांनी व्यक्त केलेल्या शुभेच्छांनी माझा आनंद द्विगुणित झाला. या पुरस्काराने काम करण्याचं आणखी बळ आलं अश्या शब्दांत मृणाल यांनी समाधान व्यक्त केलं.

श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्काराचे मानकरी देवेंद्र दोडके यांनी नाटक….. चित्रपट आणि मालिका या क्षेत्रात लेखक…. दिग्दर्शक.. अभिनेता म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. जवळपास २५ वर्षांहून अधिक झाडीपट्टीच्या रंगभूमीची सेवा करत हजारोंच्या वर प्रयोगात अभिनेता… लेखक…. दिग्दर्शक…. म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे. ते दोन दिवस या मराठी चित्रपटाचं त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केलेलं आहे. नुकतंच व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं.. सामाजिक भान जपणारं.. कोरोना सारख्या ज्वलंत विषयावर गोविंदा इन लॉकडाऊन हे नाटक लिहिलं. आघाडीची झी टीव्हीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत श्री. देवेंद्र दोडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नाट्य परिषद नागपूर शाखेच्या वर्धापदिनानिमित्त शुभेच्छा देताना दोडके म्हणाले.. गेल्या २५ वर्षांपासून मी नागपूर… मुंबई… व महाराष्ट्रात एक रंगकर्मी म्हणून प्रामाणिक योगदान दिलेलं आहे. त्या माझ्या आजवरच्या योगदानाचा उचित सन्मान म्हणजे मला आज प्राप्त झालेला श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार… आपल्या लोकांमध्ये… आपल्या मातीत झालेला… आपल्या लोकांनी केलेल्या सत्काराचा आनंद मी शब्दांत व्यक्त नाही करू शकत. हा पुरस्कार आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. ऊर्जा निर्माण करणारा आहे. सगळ्यांचे मनापासुन आभार व्यक्त केले.

 

रंगसेवा पुरस्काराने सन्मानित चारुदत्त जिचकार हे तसं पाहिलं तर संगीत क्षेत्रातील आघाडीचं नाव. अनेक वर्षांपासून त्यांचं संगीत… नाटक… नृत्य क्षेत्रातील कार्य खूप मोठं आहे. बोटांवर मोजता येणार नाही अश्या असंख्य नाटकांचे तसेच महानाट्यांचे संगीत व पार्श्वसंगीत केलेले आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होत असलेल्या अनेक नाटकांना त्यांच्या ढोलकीची साथ मिळाली आहे. एक उत्तम ध्वनिमुद्रक आहेत. निव्वळ संगीतच नाही तर अनेक महानाट्यांना त्यांच्या आवाजातील संवादाची साथ मिळाली आहे. कवी… संगीतकार अश्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आहेत. रंगसेवा पुरस्कार घेतांना जिचकार म्हणाले की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. पण शासनाचे सर्व नियम पाळून नाट्य परिषदेची मंडळी माझ्या घरी आली.. मला रंगसेवा पुरस्काराने सन्मानित केलं त्याचा आनंद काही औरच आहे. मी आजपर्यंत जी काही रंगभूमीची सेवा केली त्याचा यथोचित सन्मान म्हणजे मला प्राप्त झालेला रंगसेवा पुरस्कार आहे असं मला वाटतं. सतत काम करत असताना असा हुरूप देणारा जेंव्हा पुरस्कार मिळतो तेंव्हा चेतना निर्माण होते. नवी उमेद जागी होते. आपल्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे याचं समाधान होतं. पुन्हा नवीन करण्याची जिद्द निर्माण होते. मला प्रेरणा देणाऱ्या या पुरस्कारासाठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे आभार मानतो असे जिचकार म्हणाले.

 

 

सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले व पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले राम भाकरे गेल्या २० वर्षांपासून सातत्याने नाटकांचे समीक्षण करत आहेत. नाटकाचे सखोल अभ्यासक म्हणून अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक असो वा व्यावसायिक रंगभूमी वरील नाटकांचे समीक्षण यांनी केलेले आहे. स्वतः एक उत्तम शास्त्रीय गायक असलेले राम भाकरे यांचे नाट्य समीक्षण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील रसिक मंडळी.. कलावंत मंडळी व वाचक वर्ग मोठ्या आवडीने वाचतात. पुरस्काराचा आनंद व्यक्त करतांना राम भाकरे म्हणाले… मी अनेक वर्षांपासून दैनिकमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतोय. मला सांस्कृतिक क्षेत्राची विशेष आवड असल्याने नाटक … संगीत या विषयावर सातत्याने लिहीत आलोय. सांस्कृतिक विभागात लिखाण करतांना एकांकिका असो.. स्पर्धेतील नाटक असो.. किंवा व्यावसायिक नाटकाचे समीक्षण असो मी ते अभ्यासपूर्ण आणि प्रामाणिकपणे केले आहे. माझे नाट्य समीक्षण आणि त्याचे यथायोग्य परीक्षण म्हणजे मला प्रदान करण्यात आलेला आजचा नाट्यसमिक्षा गौरव पुरस्कार.. आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो.. आपल्या कार्याची जेंव्हा दखल घेतली जाते त्याचा आनंद अवर्णनीय असतो. मला दिलेल्या आनंदासाठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे आभार मानतो.. अश्या शब्दांत आपल्या भावना भाकरे यांनी व्यक्त केल्या.

सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्काराचे मानकरी श्याम पेठकर आणि झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराचे दिलीप वढे तसेच झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्काराचे मानकरी अनिरुद्ध वनकर हे नागपूर बाहेर असल्याने त्यांचे पुरस्कार त्यांना लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. सन्माननीय सत्कारमूर्ती यांचे घरोघरी जाऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या