
युथ समिटची डिजीटल व्याख्यानमाला शनिवारपासून: फॉर्च्युन फाऊंडेशनचा उपक्रम
मुंबई – फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिटचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा येत्या शनिवारपासून (३ एप्रिल) सुरू होत आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गुंफणार आहेत.
माजी आमदार व फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी या समिटचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे फेसबुक लाईव्हच्या आधाराने दिग्गज वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. ३ ते ११ एप्रिल या नऊ दिवसांमध्ये नऊ दिग्गज वक्त्यांची व्याख्याने एकण्याची संधी मिळणार आहे. www.anilsole.in व www.yesnagpur.in यावरून ही व्याख्याने लाईव्ह होणार आहेत.
३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता ‘आत्मनिर्भर भारत – स्वयंरोजगाराच्या संधी’ या विषयावर देवेंद्र फडणवीस व्याख्यान करतील. त्यांच्याच व्याख्यानाने या आयोजनाचे उद्घाटनही होईल. दररोज सायंकाळी ६ वाजताच व्याख्यान होणार आहे.
४ एप्रिलला श्रीकांत भारतीय ‘उद्योजकाचे महत्त्व’ या विषयावर विचार मांडतील.
तर ५ एप्रिलला ‘एमएसएमईच्या योजना, मुद्रा बँक’ या विषयावर पी.एम. पार्लेवार आणि पंकज देशमुख हे दोघेही विचार मांडणार आहेत.
६ एप्रिलला ‘सफलतेची सूत्रे’ या विषयावर प्रसिद्ध वक्ते विवेक घळसासी व्याख्यान करतील.
७ एप्रिलला जयप्रकाश गुप्ता आणि राजेंद्र खोडके ‘खादी ग्रामोद्योगद्वारा स्वयंरोजगार’ या विषयावर विचार मांडतील.
८ एप्रिलला ‘जीवन विकासाची नवरत्ने’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी व्याख्यान करतील.
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ९ एप्रिलला ‘राष्ट्रहिताचा पाया स्वयंरोजगार’ यावर विचार मांडतील.
बडोद्याच्या स्वामी नारायण मंदिराचे स्वामी ज्ञानवत्सल यांचे ‘अटीट्यूड – दि मास्टर की’ या विषयावर १० एप्रिलला व्याख्यान होईल.
केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाने ११ एप्रिलला व्याख्यानमालेचा समारोप होईल.
एकूण नऊ दिवस अत्यंत दर्जेदार तसेच स्वयंरोजगाराच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या व्याख्यानांचा लाभ घेता येणार आहे. उद्योगांच्या संधी, भांडवल प्राप्त करण्याचे मार्ग, मुद्रा लोन, स्वयंरोजगारासाठी पोषक उद्योग आदींबाबत माहिती देणारी ही व्याख्यानमाला असेल, असे आयोजकांनी सांगितले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
