
उपदेश नको मदतीचं बोला!
नागपूर,ता. १९ मार्च: सुप्रसिद्ध हास्य कलावंत सुनील पाल यांनी नुकतेच नागपूरच्या ऑकेस्ट्रा कलावंतांना उद्देशून एक व्हीडियो व्हायरल केला,यात कोणत्याही कलावंतांने आत्महत्येसारखा पाऊल उचलू नये,मी तुमच्यासोबत आहे असे उपदेशाचे डोज पाजले,यावर कलावंतांच्या एका व्हाट्स ॲप ग्रूपवर या सेलिब्रिटी हास्य कलाकारावर चांगलाच रोष व्यक्त करण्यात आला.
एकेकाळी सुनील पाल हा मूळ हिंगणघाटसारख्या छोट्याश्या शहरातून महाराष्ट्राच्या उपजराजधानीत स्वत:चे अस्तित्व शोधत आला होता.त्यावेळी याच शहराच्या ऑकेस्ट्रा क्ष्ेत्रातील अनेक कलावंतांनी त्याला संधी ही दिली व मदतीचा हात ही दिला.आज ही या शहराविषयी व शहरातील कलावंतांविषयी सुनील पाल याने जिव्हाळ्याची साद घातली आहे मात्र लॉक डाऊनचा ‘कहर’पुन्हा एकदा शहरातील कलावंतांच्या आयुष्यावर कोसळला,अश्यावेळी पाल याच्याकडे काही कलावंतांनी मदतीसाठी शब्द टाकला असता ‘मी खूप वेळा नागपूरच्या कलाकारांना मदत केली’असे सांगून फोन ठेऊन देण्यात आला.
यावर कलावंतांमध्ये पाल यांच्याविषयी तीव्र नाराजी पसरली.नागपूरात नुकतेच ड्रमर असणा-या यश मदनकर नावाच्या अवघ्या २६ वर्षाच्या मुलाने विषारी औषध पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला,पुन्हा एकदा कार्यक्रम बंद झाल्याने तो आपल्या ड्रमसेटसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडू शकत नव्हता.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान पुन्हा एकदा शहरात कडक लॉक डाऊनची घोषणा केली आणि निराश झालेल्या प्रवीण मून या गायक कलावंताने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पारडी येथील र्कीती गायकवाड नावाच्या अवघ्या २५ वर्षाच्या नृत्यांगनाने लॉक डाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून गळफास लाऊन आत्महत्या केली.
शहरातील अनेक गायक,वादक तसेच बॅक स्टेज कलावंत यांची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर असून स्वाभिमानी कलांवंत हे कोणासमोर हात पसरण्यासाठी धजत नाही,अश्यावेळी मुंबईतील सेलिब्रिटी झालेले आपल्याच शहरातील कलावंतांना साद घालण्यात आली,मात्र एकदा मुंबईचे वारे डोक्यात शिरले तर उरते ती फक्त ‘व्यवसायिकता आणि व्यवसायिक हित’,असा संताप आता व्यक्त केला जात आहे.
सुनील पाल यांनी गेल्या वर्षी देखील संपूर्ण लॉक डाऊनच्या काळात नागपूरकर कलावंतांची सुध घेतली नाही मात्र त्यावेळी शहरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन कलावंतांच्या घरी रेशन कीट पोहोचवले होते.यावेळी मात्र शहरातील स्वयंसेवी संस्थांची देखील ’दानत’संपली असून अनेक कलावंतांच्या घरातील अवस्था ही दयनीय झाली आहे.
अश्यावेळी आपले जुने व संघर्षाचे दिवस आठवून सुनील पालसारख्या सेलिब्रिटीने समोर येऊन कलावंतांच्या मदतीसाठी पुढे येण्याची अपेक्ष्ा व्यक्त केली असता,पाल यांनी नुसते ज्ञानाचे डोज पाजणारा व्हिडीयो ग्रूपवर पाठवला आणि…..नागपूरकर कलावंतांचा चांगलाच रोष ओढवून घेतला.




आमचे चॅनल subscribe करा
