

सोशल डिस्टिंसिंगचा फज्जा, मनपाचे नियोजन सपशेल फेल
नागपूर,ता. ३ मार्च: लसीकरणाच्या तिस-या टप्प्यात सोमवारी पहील्याच दिवशी शहरातील अनेक केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना लस न घेता परतावे लागण्याची घटना ताजी असतानाच आज तिस-या दिवशी देखील नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमधील ज्येष्ठांसाठी लसीकरणाच्या या व्यवस्थेत कोणतीही सुधारणा आढळली नाही,उलट गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात आज पुन्हा एकदा ज्येष्ठांची परवड झाली,अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

भर उन्हात ज्येष्ठांनी लसीकरणासाठी केलेली गर्दी ही लक्ष् णीय होती.शहराच्या वेगवेगळ्या भागातून आलेले ज्येष्ठ नागरिक हे लस न मिळाल्याने आल्या पावली भर उन्हात परत गेले.या नागरिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात लस देण्याचे ठरले होते.नोंदणीकरुन देखील संगणकांवर नाव दिसत नव्हते.या प्रकारामुळे ज्येष्ठांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.भर उन्हात लसीकरण केंद्र गाठणा-या ज्येष्ठांना आल्या पावली परतावे लागत आहे.नेहमी नेहमी केंद्रावर येणे आमच्या प्रकृतीला झेपणार नसल्याचा त्रागा ही अनेकांनी व्यक्त केला.मनपाच्या आरोग्याविभागाच्या पुनश्च या भोंगळ कारभारामुळे ज्येष्ठांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग बंद डॉक्टरांचा ‘पगारी विश्राम’-
कोविडमुळे सध्या गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील स्त्री रोग विभाग बंद असल्यामुळे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.किंमतकर तसेच बहूचर्चित वैद्यकीय अधिकारी डॉ.शीलू गंटावार यांचा ‘भरपगारी विश्राम‘सुरु असल्याची चर्चा आहे.डॉ.किंमतकर या सकाळी ११ वा.शिवाय रुग्णालयात येत नसल्याची माहिती आहे तर ज्या डॉ.शीलू गंटावार यांच्या कामकाजावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी २० जून २०२० च्या भट सभागृहातील मनपाच्या सभेत तब्बल ५ दिवसत ताशेरे ओढले होते,त्यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले होते,मध्यप्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या प्रचार रॅलीत व्यस्त असणा-या डॉ.शीलू गंटावार या कश्यापद्धतीने मध्यप्रदेशात काँग्रसे पक्ष्ातर्फे कार्यालय थाटून कारभार करीत असून लाखो रुपये पगार मात्र त्यांच्यावर, नागपूरकर जनतेच्या घामाच्या पैश्यांमधून खर्च होत असल्याची आेरड केली,त्याच डॉ.शीलू गंटावार यांच्याबाबत तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी डॉ.शीलू गंटावार यांची संपूर्ण हजेरी तपासण्यासाठी सभा संपताच तात्काळ रुग्णालयात जाऊन हजेरी पुस्तिका ताब्यात घेण्याचे निर्देश दिले एवढेच नव्हे तर तात्काळ प्रभावाने त्यांच्या निलंबनाच्या कारवाईचे देखील आदेश दिले होते मात्र इंदिरा गांधी रुग्णालयात अद्यापही डॉ.शीलू त्याच पदावर ‘आरुढ’ असून त्याच पद्धतीने कार्य करीत असल्याची चर्चा आहे .
आश्चर्याची बाब म्हणजे आता महापौर पदी असणारे दयाशंकर तिवारी यांना मात्र डॉ.शीलू गंटावार यांच्या कार्यपद्धतीविषयी कोणतीही तक्रार नाही उलट आरोग्य विभागाच्या बैठकीत ते डॉ.शीलू गंटावार यांचे हसून स्वागत करतात एवढंच नव्हे तर त्यांना तात्काळ बैठकीतून जाण्याची परवानगी देखील देतात,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आरोग्य विभागाच्या बैठकीत महापौरांसमोर ज्यांचे सादरीकरण संपले तरी त्यांना बैठक संपेपर्यंत हलण्याची मुभा नाही,मात्र डॉ.शीलू गंटावार या भर बैठकीतून हसतमुखाने निघून जात असल्याचे ‘अर्थपूर्ण’कोडे अनेकांना पडले आहे!मनपाचे असेच ‘गुणवंत अधिकारी’कारभार बघणार असतील तर नागपूरकर नागरिकांचे व ज्येष्ठांचे असेच हाल होणार असल्याचा संताप देखील व्यक्त झाला.
राम जोशी हे स्वत:चीच पाठ थोपटणारे!
एकीकडे मनपाच्या संपूर्ण आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी ज्येष्ठांची अशी पराकोटीची परवड होत असताना दूसरीकडे अति.आयुक्त राम जोशी यांनी नुकतेच इंदिरा गांधी,पाचपावली तसेच आयसोलेशन आरोग्य केंद्रे हे लसीकरणाबाबत उत्तम काम करीत असल्याची पावती देऊन मोकळे झाले.मनपाच्या प्रशासनाचे अपयश हे गेल्या वर्षी देखील करोनाच्या प्रादुर्भावाने उच्चांक गाठला असताना नागपूरकर जनतेने चांगलाच अनुभवला आहे.यावेळी तोच अनुभव शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाटेला आले,एवढंच,अशी चर्चा आता रंगली आहे.
महापौरांचे ऑन लाईन काऊंटर सुरु करण्याचे निर्देश-
कोव्हिड लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही धोक्याची आहे. ही गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उद्या गुरूवार (४ मार्च)पासून प्रत्येक झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांना स्वत: घरून लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य आहे त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही, अशांकरिता मनपातर्फे विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही पूर्ण करून गुरूवारी दुपारी १२ वाजता व त्यानंतर दररोज १०.३० ते १२.३० या वेळेत ऑनलाईन नोंदणी काउंटर सुरू ठेवण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
महापौरांना दररोज ज्येष्ठांच्या तक्रारीचा पाऊस पडत होता, लसीकरण केन्द्रांमध्ये मोठी रांग असल्यामुळे त्यांना गैरसोय होत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. या समस्याचे निराकरण करण्यासाठी महापौरांनी अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
कोव्हिड लसीकरणासंदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता.३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या कक्षात बैठक घेतली.
कोव्हिड लसीकरण केंद्रांवर नोंदणी झालेल्यांना वेळेवर लस मिळू शकत नाही, याबाबत योग्य नियोजन करण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. लसीकरणासाठी ‘ऑनलाईन’ सोबतच ‘ऑफलाईन ’ नोंदणीही सुरू आहे. मात्र ऑनलाईन नोंदणीला प्राधान्य देउन ऑफलाईन पद्धतीने रोज प्रत्येक केंद्रासाठी केवळ २५ लोंकांनाच परवानगी देण्यात यावी. यानंतर येणा-या व्यक्तींना पुढील तारखेचे टोकन देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
लसीकरण केंद्रावर नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. लसीकरण स्थळी प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी, नसल्यास फिरते प्रसाधनगृह उभारावे व त्याची योग्य स्वच्छता राहिल यासाठी स्वच्छता झोनल अधिका-यांची जबाबदारी निश्चित करावी. यासोबतच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी. विशेष म्हणजे, या सर्व बाबींची माहिती देणारे फलक लावण्यात यावे. याशिवाय नोंदणी कक्ष, प्रतिक्षालय, लसीकरण कक्ष यासह लसीकरणासाठी शासनाद्वारे आरक्षित व्यक्ती कोण, कोणाला प्राधान्य आहे, यासर्वांच्या माहितीच्या फलकांसह कोव्हिड संदर्भात नियमांचे फलक व आवश्यक संपर्क क्रमांकही लसीकरण केंद्रावर प्रदर्शित करणे. तसेच लसीकरण केंद्र दररोज निर्जंतुकीकरण करणे आठवड्यातून एकदा त्या ठिकाणी फवारणी करणे आदीबाबत स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच लसीकरण केन्द्रात दररोज सॅनीटाईजरची व्यवस्था करण्याचेसुध्दा निर्देश दिले.
खाजगी रुग्णालयामधील लसीकरण केंद्र सुरू-
११ शासकीय कोव्हिड लसीकरण केंद्रासह बुधवारी (ता.३) मनपाच्या केटी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. यासोबतच शहरातील नोंदणी झालेल्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उद्या गुरूवार (४ मार्च)पासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे. यासाठी लस घेउ इच्छिणा-यांना २५० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, शासकीय व खाजगी केंद्र यापैकी कुठे लसीकरण करून घ्यावयाचे आहे, याची पसंती लाभार्थ्यांना करता येईल. यासाठी ऑनलाईनपद्धतीने नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. ऑफलाईन पद्धतीने २५ जणांनाच प्राधान्य असेल.
नागपूर शहरातील रेडियन्स हॉस्पीटल, वर्धमाननगर, न्यू ईरा हॉस्पीटल, वर्धमाननगर, व्हिम्स हॉस्पीटल, कामठी रोड, अर्नेजा हॉस्पीटल, बारस्कर हॉस्पीटल, सुश्रुत हॉस्पीटल, रामदासपेठ, सेंटर पॉईंट हॉस्पीटल मेडीकल चौक, क्यूअरईट हॉस्पीटल दिघोरी चौक, होप हॉस्पीटल, केशव हॉस्पीटल, मानेवाडा, मेडिकेअर हॉस्पीटल मानकापूर चौक, कुणाल हॉस्पीटल, छिंदवाडा रोड, आयकॉन हॉस्पीटल, अमरावती रोड या रुग्णालयांमध्ये गुरूवारपासून लसीकरण घेता येणार आहे.




आमचे चॅनल subscribe करा
