

शहर बससेवा महामेट्रोकडे होणार वर्ग
शहर परिवहन मेट्रोकडे वर्ग झाल्यास वाचतील शंभर कोटी रुपये
नागपूर,ता. २५ फेब्रुवरी: महानगरपालिकेद्वारे चालविण्यात येणारी शहरातील परिवहन व्यवस्था ही महामेट्रोकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना प्रशासनाला दिली असल्याची माहिती मनपाच्या परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी आज गुरुवार,दि.२५ फेब्रुवरी रोजी मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत दिली.
बससेवेसाठी २०१९-२०मध्ये एकूण उत्पन्न ६४.४६ कोटी प्राप्त झाले मात्र एकूण खर्च १६४.८३ कोटी झाला असून शहराची परिवहन व्यवस्था ही महामेट्रोकडे वर्ग केल्यास १०० कोटींची बचत होईल अशी माहिती त्यांनी दिली.मात्र महामेट्रोने ही परिवहन व्यवस्था ताब्यात घेल्यानंतर मनपातील सर्वच राजकीय पक्ष्ाच्या दोन-दोन नगरसेवकांना विश्वस्त पदी घ्यावे अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांकडून आल्याने असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना प्रशासनास केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हा धोरणात्मक निर्णय असल्याने सभागृहाच्या मंजुरी नंतरच यावर अंमलबजावणी होईल असे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाद्वारे फेम-२ अंतर्गत प्राप्त होणा-या ४० इलेक्ट्रीक मिडी बसचा प्रस्तावित खर्च अंदाजे २० कोटी अाहे.याप्रमाणे आय व व्ययाचे अवलोकन केल्यास १२१ कोटीची तूट मनपास देय ठरते.मनपाची आर्थिक स्थिती लक्ष्ात घेता ही तूट अतिशय जास्त प्रमाणात असून याचा परिणाम मनपाच्या इतर विकास कामांवर होत आहे,असे त्यांनी सांगितले.
आता शहरात मुख्य मार्गांवर मेट्रो रेलद्वारे परिवहन सुरु आहे.मुख्यत्वे याच मार्गावर बस परिवहन व्यवस्था देखील सुरु आहे.त्यामुळे एकाच मार्गावर दोन्ही व्यवस्था सुरु असल्याने शहर बस सेवेत प्रवाश्यांचा तुटवडा झाला आहे.यामुळे शहर बस सेवा व मेट्रोरेल दोन्ही व्यवस्था तोट्यात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
या वस्तुस्थितीची समिक्ष्ा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी केली व नागपूर शहराकरिता शहर परिवहन व्यवस्था एकाच प्राधिकरणाकडे असावी अशी ईच्छा त्यांनी प्रकट केली होती.त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मनपाद्वारे चालविण्यात येणारी शहर बस सेवा मालमत्ता व देयकासह परिवहन समिती ठरवेल त्या अटी व शर्तीसह महाराष्ट्र रेल कार्पोरेशन लिमिटेड यांना हस्तांतरण करण्याबाबत धोरण निश्चित करुन त्यास सभागृहाच्या मंजूरीसाठी पटलावर ठेवण्यात येईल.यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.राज्य सरकारच्या मंजुरीनंतर तो केंद्राकडे वर्ग होईल असे त्यांनी सांगितले.
आज पार पडलेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मार्ग तपासणीक गिरीश महाजन तसेच पर्यवेक्ष् क(अतांत्रिक)मातकर यांचा कार्यकाळ ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.मेट्रोला परिवहन व्यवस्था सुपुर्द होणार असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.याशिवाय परिवहन विभागात कामाकरीता असणारे लेखापाल विशाल भारद्वाज यांना ८ मार्च २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यत मुदतवाढ देण्याचा प्रस्तावावर चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय मनपाच्या ऑरेंज सिटी बसडेपोमध्ये मे.वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि.च्या ११० भंगार बसेसच्या ऑन-लाईन लिलावासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करुन प्रक्रिया करण्यास आयुक्त राधाकृष्णन बी.यांची मंजुरी मिळाली होती. या ई-लीलाव प्रक्रियेकरीता ११९ बसेसची एकूण ०७ लॉटमध्ये विभागणी करुन ऑफसेट किंमत निश्चित करण्यात आली.एकूण ०७ लॉटची ऑफसेट किंमत ही १,१३,८८,००० निश्चित करण्यात आली.मात्र पुणे येथील सिद्धार्थ इंटरप्रायसेस तसेच दिपक इंटप्रायसेसने अधिकतम दराची बोली लावून १,८६,३९,९८२ रक्कम दिली. ही प्राप्त किंमत लिलाव करीता निर्धारित राशीच्या ६१ टक्के अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली.




आमचे चॅनल subscribe करा
