Homeनागपूर न्यूजआमदार कीर्तीकूमार भांगडिया यांच्यावर दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश

आमदार कीर्तीकूमार भांगडिया यांच्यावर दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश

Advertisements

नासुप्रच्या तीन सदनिका लाटल्याचे प्रकरण:पोलीसांना मिळाली आदेशाची प्रत

नागपूर,ता. २८ डिसेंबर:चिमूरचे आमदार कीर्तीकूमार भांगडिया यांच्याविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी कोर्ट क.३ न्या.व्ही.एम.देशमुख यांनी २४ डिसेंबर रोजी इमामवाडा तसेच सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्याचे आदेश दिले होते.आज सोमवारी या आदेशाची विस्तृत प्रत अर्जदारांना तसेच पोलीसांना प्राप्त झाली असून या आदेशात न्या.देशमुख यांनी कलम ४२०,१९९ तसेच २०० भारतीय दंड संहिता अन्वये दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्याचे आदेश पारित केले आहेत.

यासोबतच या प्रकरणाचा तपास करुन अंतिम अहवाल दाखल करण्याचेही पोलिसांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण-
नागपूरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲड.तरुण चुतरभाई परमार(राहणार पोलीस लाईन टाकली मागे) यांनी दोन महिन्यांपूर्वीपासून पोलीस ठाणे सक्करदरा तसेच पोलीस ठाणे इमामवाडा येथे चिमूरचे भारतीय जनता पक्ष्ाचे आमदार कीर्तीकुमार मितेश भांगडीया यांच्या विरुद्ध नागपूर सुधार प्रन्यासचे शहरातील प्रशस्त भागात घरकूल योजनेअंतर्गत खोटे अर्ज करुन लबाडीने तीन सदनिका लाटल्याची तक्रार, संपूर्ण पुराव्यानिशी केली होती मात्र, या तक्रारी संदर्भात इमामवाडा,सक्करदरा तसेच पोलीस उपायुक्त परीमंडळ क्र.४ यांनी कोणतीही कारवाई न केल्याने तक्रारदात्यांनी या विरोधात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्याकडे धाव घेतली.नुकतेच न्यायालयाने भारतीय दंड संहितेचे कलम ४२०,१९९ व २०० अन्वये आ.बंटी उर्फ कीर्ती भांगडिया यांच्या विरोधात या दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

याचिकाप्रमाणे श्रीमान पॅलेस,गाळा क्र.७०५,लोकमत चौक,धंतोली येथे आ.कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पत्नी सोनल भांगडिया राहतात. सोनल यांनी १४ मार्च २००७ मध्ये नासुप्रच्या लोकगृह योजनेअंतर्गत उंटखाना ले आऊट येेथे दोन बीएचकेची सदनिका मिळावी यासाठी ५० हजार रुपये जमा केले.नासुप्रच्या १२ सप्टेंबर २००७ च्या सोडतीमध्ये त्यांना ही दोन बीएचकेची सदनिका अलॉट करण्यात आली. १७ सप्टेंबर २००७ रोजी प्रतिज्ञापत्र जमा करुन इमारत क्र.एबी मधील गाळा क्र.३०१ त्यांच्या नावे करण्यात आले.२४ सप्टेंबर २००७ रोजी सोनल यांनी या सदनिकेचा मालकी हक्क मिळवला तसेच तेव्हापासून नागपूर महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर ही सदनिका त्यांच्या नावे दर्ज आहे.
मूळात शासनाच्या सदनिकेची योजना ही बेघर लोकांना निवारा प्राप्त करुन देण्यासाठी असताना नासुप्रने ही सदनिका आमदार पत्नींच्या नावे केली.

याशिवाय सदर येथे नासुप्रच्या सक्करदरा येथील लोकगृह निर्माण संकूल योजनेअंतर्गत ५ एप्रिल २००८ रोजी कीर्तीकूमार भांगडिया यांनी सदनिका मिळावी यासाठी पुन्हा नासुप्रकडे अर्ज केला.यासाठी देखील त्यांनी ५० हजार रुपये आवेदनाचे भरले.नासुप्रच्या २९ एप्रिल २००८ च्या सोडतीप्रमाणे या संकूलातील तीन बीएचकेची सदनिका ही देखील आ.कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नावे करण्यात आली.
विशेष म्हणजे आ.कीर्तीकूमार यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिले ‘माझे,माझ्या पत्नीच्या तसेच माझ्या अज्ञान मुलाच्या नावाने नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत तसेच नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत कोणतेही घर,गाळे किंवा भूखंड नाही’असे खोटे शपथपत्र .देऊन इमारत क्र.ड मधील गाळा क्र.२०२ , ही तीन बीएचकेची सदनिका त्यांनी मिळवली.९ एप्रिल २००९ पासून मनपाच्या रेकॉर्डवर ही सदनिका आ.कीर्तीकूमार भांगडिया यांच्या नावावर आहे.विशेष म्हणजे या सदनिकेची भांगडिया यांनी दोन भागात विभागणी करुन त्यात दोन भाडेकरु ठेवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे आ.कीर्ती भांगडिया यांनी या दोन्ही सदनिका घेण्यासाठी सिंडिकेट बँकेतून कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे  हे विशेष!

शहरातील अतिशय मोक्याच्या जागेवरील नासुप्रच्या या तीन सदनिका लबाडीने तसेच खोटे कागदपत्रे देऊन मिळवल्या असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.नागपूरवासी बेघरांच्या हक्काची मालमत्ता आ.भांगडिया यांनी गैरमार्गाने बळकावल्याचा ठपका ठेवीत त्यांच्या विरुद्ध भा.दं.वी.चे कलम १९९,२००,४२०,४६५,४६७ तसेच ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची विनंती अर्जदारांनी २९ ऑक्टोबर २०२० रोजीच सक्करदरा तसेच इमामवाडा पोलीस ठाण्यात दिली होती मात्र या दोन्ही पोलीस ठाण्याद्वारे अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने न्यायालयाचे याकडे लक्ष् वेधण्यात आले होते.

आयुर्वेदिक ले आऊट येथील नासुप्रच्या योजनेतील एक सदनिका तसेच उंटखाना दहीपूरा येथील दोन सदनिका यातील एक पत्नीच्या तर एक सदनिका आ.कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नावे आहेत,एकाच घरकूल योजनेत एकाच इमारतीत पती व पत्नी दोघांनाही सदनिका देण्याचा विक्रम देखील नासुप्रच्या अधिका-यांनी कसा केला हा आता पोलीसांसाठी संशोधनाचा विषय आहे.

न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत इमामवाडा तसेच सक्करदरा पोलीस ठाण्याला या प्रकणाचा तपास करुन अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश आपल्या आदेशात दिले.

याचिकाकर्ते परमार यांच्यावतीने ॲड.वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले. याशिवाय न्यायालयात ॲड.सतीश उके यांनी याचिकाकर्ते यांच्या करीता दोन्ही प्रकरणात युक्तीवाद केला.

Latest बातम्या