

९१ रूपये लिटर दूध ; २६०० रुपये किलो तूप, कोट्यवधीच्या टर्न ओव्हरच्या यशकथा
दुग्धजन्य पदार्थ, पशुपालन, पशुखाद्य, कृत्रिम रेतन या क्षेत्रातील मातब्बरांना भेटायची संधी
डेअरी, गोट्री, पोल्ट्री उद्योगाला चालना देणारे तंत्र-मंत्र समजून घेण्याचे आवाहन
देश-विदेशातील वेगवेगळ्या जातीच्या पशुंना प्रत्यक्ष बघण्याची संधी
नागपूर, दि २६ : ‘समृद्ध शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान’ या ब्रीद वाक्याने सुरू होणाऱ्या नागपुरातील ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीमधील नागपूर जिल्हा परिषदेचे पशु-पक्षी दालन लक्षवेधी ठरले आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनात देश-विदेशातील गाई-म्हशी, बकऱ्या, कोंबड्या या सोबतच या क्षेत्रातील प्रजनन, खाद्य, संगोपन आणि मार्केटींग संदर्भातील अद्यावत ज्ञान व प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत.

नागपूर शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीम बाग नागपूर येथे या ‘ॲग्रोव्हिजन’चे आयोजन करण्यात आले आहे. 27 डिसेंबरपर्यंत ही कृषी प्रदर्शनी सुरू असणार आहे. उद्या प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असणार आहे. या कृषी प्रदर्शनीतील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या दालनाला विदर्भातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
केवळ चाऱ्याचा उद्योग करून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करणारे शेतकरी, देशी शुद्ध तुपासाठी २६०० रुपये प्रति किलो, दुधासाठी ९१ रुपये प्रति लिटर किंमत वसूल करणारे शेतकरी, आपल्या गीर, साहिवाल, देवनी, लाल कंधार, गोवळन, डांगी, खिल्लार अशा कितीतरी देशी जातीच्या गाईंना योग्य आहार, औषध, खुराक देऊन पौष्टीक दुग्धव्यवसायाने नावलौकिक मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना भेटण्याची या ठिकाणी संधी आहे.
या स्टॉलमध्ये गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व पाळीव प्राण्यांना घटसर्प, फऱ्या, फाशी व आंत्रविषार या साथीच्या रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लसीकरण का आवश्यक आहे याबाबतही माहिती दिली जाते.

व्यवसायिक दूध उत्पादनासाठी आदर्श पशु व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, वैरण कोणते द्यावे, पशु आहारात हिरव्या वैरणीचे काय महत्त्व आहे, आपल्या जनावराला कोणता चारा दिल्याने दुधाला अधिक फॅट येतील, माणसाप्रमाणेच त्यांच्या आहारात हिरवा चारा, सुका चारा, खुराक मिश्रण देणे कसे आवश्यक आहे. याबाबतचे मार्गदर्शन या दालनात दिले जाते. या दालनामध्ये पशुपालन करणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात चारा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचे देखील स्टॉल आहे.

दालनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी देश-विदेशातील जर्सी गाई पासून देशी जातीच्या सर्व गाई प्रत्यक्ष बघायला मिळतात. सोबतच पशुपालन करणाऱ्या संस्था व त्याला आलेले व्यवसायाचे स्वरूपही पाहायला मिळते. बेरोजगारीच्या नावाने एकीकडे ओरड सुरू असताना दूध काढणाऱ्यांना वीस हजार रुपये महिना देणारे, चारा घालणाऱ्याला दहा हजार रुपये महिना देणारे, दूध वाटप करणाऱ्याना २५ हजार महिना मोजणारे, तीस-चाळीस लोकांना या व्यवसायातून रोजगार देणारे पशुपालक या ठिकाणी आपली यशकथा सांगायला उत्सुक आहेत.
अधिक दूध देणाऱ्या विदेशी व वेगवेगळ्या जातीच्या गाई निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे कृत्रिम रेतन समजून सांगणारे स्टॉलही आहेत. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्याच्या प्रत्येक पशु दवाखान्यामध्ये कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध केली आहे. गाई, म्हशीपासून शेळीपर्यंत याबाबतच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांनी प्रत्येक दवाखान्यात भेट देऊन कृत्रिम रेतनासोबतच चारा कोणता वापरावा याबाबतचेही मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
अरविंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी डॉ. मनोहर लाडकर, डॉ. कमलेश श्रीरामे, डॉ. सुजित तापस, डॉ. अभय भालेराव, डॉ. शशिकांत मांडेकर नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत.

फायद्यातील व्यवसाय प्रशिक्षणासाठी दालनाला भेट द्या : सुनील केदार
दुग्धव्यवसाय, शेळीव्यवस्थापन, कुक्कुटपालन या व्यवसायात पैसा मोठ्या प्रमाणात कसा मिळवायचा. पशु संगोपन, चारा लागवड, त्यांची देखभाल, लसीकरण आणि मार्केटिंग या सगळ्यांचे गुरुमंत्र भेटण्याचे हे दालन आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अतिशय मेहनतीने, परिश्रमाने आणि आधुनिक पद्धतीने सर्व ज्ञान या ठिकाणी उपलब्ध केले आहे. सर्व जातीची जनावरे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी उद्या शेवटच्या दिवशी ही संधी घ्यावी, या क्षेत्रात आवड असणाऱ्या व्यक्तींनी एकदा अवश्य भेट देण्यासारखी ही दालनं झाली आहेत. तेव्हा या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन मंत्री ना.सुनील केदार यांनी केले आहे.

आमचे चॅनल subscribe करा