Homeनागपूर न्यूजस्मार्ट सिटीच्या वादळी बैठकीत अखेर मुंढे यांचा सीईओ पदावरुन पायउतार

स्मार्ट सिटीच्या वादळी बैठकीत अखेर मुंढे यांचा सीईओ पदावरुन पायउतार


मुंढे यांना नियमांप्रमाणे सीईओ पदावरुन हटवले-महापौर

नागपूर,ता. १० जुलै: आज शुक्रवारी दि. १० जुलै रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सातव्या मजल्यावरील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयातील संचालक मंडळाची बैठक ही अपेक्ष्ेप्रमाणे वादळी ठरली.बैठकीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर केलेला दावा हा पूर्णपणे फेटाळण्यात आला,एवढेच नव्हे तर नवीन जाहीराती काढून या पदावर पूर्णकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी त्यासोबतच मुख्य वित्त अधिकारी यांच्याही नियुक्तीचे आदेश कंपनीचे अध्यक्ष् प्रवीण परदेशी यांनी बैठकीत दिले. बैठकीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत महापौर संदीप जोशी यांनी मुंढे यांची कंपनीच्या नियमांप्रमाणे सीईओ पदावरुन उचलबांगडी झाल्याचे सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ पदावरुन महापौर व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील पराकोटीला पोहोचलेला वाद,समस्त नागपूरकर बघत आहे. मुंढे यांचे ‘समर्थक’संपूर्ण महाराष्ट्रात असल्याकारणाने या बैठकीवर तर जणू अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष् होते. बैठकीत अनेक मुद्दांवर चर्चा पार पडली. महापौर संदीप जोशी यांनी माहिती देताना सांगितले की,गेल्या महीनाभरापासून वारंवार सोशल मिडीया व विविध माध्यमांमध्ये आम्हाला लक्ष्य केल्या जात होते. मात्र आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले की मुंढे यांनी सीईओ पद हे बळजबरीने बळकावले होते.

परिणामी अवैधरित्या पदावर बसणा-या अधिका-याने केलेले स्मार्ट सिटी संदर्भातील प्रत्येक व्यवहार,निर्णय, आर्थिक व्यवहार,टेंडर विषयीचे निर्णय,कर्मचा-यांच्या निलंबनाची कारवाई या सर्व बाबींची चौकशी केंद्र सरकार तसेच एडव्होकेट जनरल यांच्या माध्यमातून करण्याच निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने ठरले,या संपूर्ण चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील बैठकीत मुंढे यांच्या या सर्व कारभारावर पुन्हा चर्चा केली जाईल व योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील कर्मचा-यांची केलेली बडतर्फी हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर चर्चा होऊ शकली नसल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांची संचालक पदी नियुक्ती झाली का?अशी माहिती विचारली असता,परदेशी यांनी ‘नाही’असे उत्तर दिले.यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओ पदी नियुक्ती झाली आहे का?या प्रश्‍नावर देखील परदेशी यांनी ’नाही’असे उत्तर दिले.यावर मुंढे यांनी परदेशी यांच्याकडे खुलासा करण्याचा प्रयत्न केला ’तुम्ही मला तसेच मौखिक आदेश दिले’यावर परदेशी यांनी मुंढे यांना चांगलेच फैलावर घेत ’मी तुम्हाला फक्त स्मार्ट सिटी प्रकल्प हा नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्यामुळे आयुक्त म्हणून ’लूक ऑफ्टर दॅट’असा शब्द वापरला होता. सीईओ पदाचा पदभार नव्हता दिला. त्यामुळे तुम्ही सीईओ म्हणून जी काही कारवाई केली किवा कार्यभार सांभाळला ते नियमात बसत नाही!’असे सुनावले.

महापौरांनी दूर्देवाने आयुक्त सातत्याने खोटे बोलत होते व खोटी कागदपत्रे दाखवित असल्याची टिका याप्रसंगी केली. परदेशी यांनी आयुक्तांना मौखिक आदेश लागू होत नसतात, हे देखील आयएएस अधिका-याला माहिती नसावे,याप्रकारचे वक्तव्य केल्याची माहिती महापौरांनी दिली. या संपूर्ण प्रकारची चौकशी करुन पुढील बैठकीत संचालक मंडळाच्या सदस्यांसमोर हा विषय ठेवण्याचे निर्देश परदेशी यांनी दिले. या चौकशीनंतरच मुंढे यांच्यावर कारवाई होणार किवा नाही,हे ठरवले जाईल,असे महापौर म्हणाले.

सर्व पक्ष्ाच्या संचालकांना मनापासून धन्यवाद-

याप्रसंगी बोलताना महापौरांनी सर्व पक्ष्ाच्या संचालकांचे आभार मानले. एकमेव अपवाद शिवसेनेच्या मंगला गवरे सोडल्या तर संचालक मंडळाच्या सर्वच सदस्यांनी जाहीरात काढून नवीन आयुक्त नियुक्त करावा,या मागणीला पाठींबा दिला.यात प्रामुख्याने केंद्र सरकारचे प्रतिनिधी जयदीप शहा, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्येय, सत्तापक्ष् नेते संदीप जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके, बहूजन पक्ष्ाच्या वैशाली नारनवरे आदींचा समावेश होता. मात्र नवीन पूर्णकालीन सीईओ नियुक्त होईपर्यंत सध्याचा,तात्पुरता कारभार हा महेश मोरोणे यांच्याकडे सोपविण्यास एकमत झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्वत:च्या सीईओ पदासाठी मुंढे यांनीच ठेवला प्रस्ताव!

या बैठकीत स्वत:च्याच सीईओ पदासाठी प्रस्ताव ठेवणारे मुंढे हे स्वत: होते. मी आयुक्त म्हणून ठरवतोय,असा प्रस्ताव द्यायला हवा असे मल्लिनार्थी मुंढे यांनी केली. मात्र ‘तो मी नव्हेच’या थाटात त्यांनी हा प्रस्ताव बैठकीत मांडला. याचा अर्थ मी महापौर आहे मात्र माझी ईच्छा नाही सीईओ पदी बसण्याची मात्र मी महापौर आहे त्यामुळे मला त्या पदावर बसवावे,असा त्याचा अर्थ मुंढे यांच्या बोलण्यातून ध्वनित होत होता. मुंढे यांच्या या प्रस्तावावर आक्ष्ेप नोंदवत मी हा प्रस्ताव मतदानासाठी ठेवण्यात यावा,अशी विंनती केली. यावर परदेशी यांनी आधी मुंढे यांचे मत विचारले,यानंतर पोलीस आयुक्त,जिल्हाधिकारी यांना मत विचारले असता त्यांनीही सध्या डेप्यूटी सीईओचा चार्ज देण्यात यावा यानंतर पूर्णकालीन सीईओ नेमण्यात यावा,असे मत मांडले.

एचआर पॉलिसीमध्ये देखील प्रकल्पाचे सीईओ पद हे पूर्णकालीन असल्याचे नमूद आहे. आर्टिकल अॉफ असोसिएशनमध्ये देखील स्पष्टपणे ही अट नमूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जाहीरात काढून पुढील पूर्णकालीन सीईओ नेमण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.यासोबतच मुख्य वित्त अधिकारीची देखील नियुक्ती तात्काळ जाहीरात देऊन करण्यात यावी,असे निर्देश प्राप्त झाले व संचालक मंडळाच्या आजच्या या बैठकीत या दोन्ही मुद्दांवर शिक्कामोर्तब झाले.

अशी घटना प्रथमच….
मी संचालक मंडळात गेल्या तीन वर्षांपासून आहे मात्र एकाही बैठकीत असे घडले नाही.हे कंपनीच्याही इतिहासात पहील्यांदाज असे घडले तात्पुरता सीईओ नेमणे,मग जाहीरात काढून पूर्णकालीन सीईओ,कॅफो नेमणे,एका आयएएस अधिका-याच्या आढमुठे आणि खोटारड्या धोरणांमुळे अशी वेळ आली. जयदीप शहा हे देखील आश्‍चर्यचकीत होऊन हे सर्व ऐकत होते. एखाद्या आयएएस अधिका-याच्या संपूर्ण कारभाराची कायदेशीर चौकशी बसवावी,तो अहवाल संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवावा,हे सर्व पहील्यांदात घडत आहे.मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पाचे १८ कोटी जे देण्यात आले तो जनतेचा पैसा होता,ते केलेले भूगतान बैठकीत ‘बरोबर’ ठरवण्यात आले मात्र ‘कारणे‘ चुकीची सांगण्यात आली, अशी माहिती महापौरांनी दिली. यावर देखील मी, संदीप जाधव,पिंटू झलके व वैशाली नारनवरे या चार सदस्यांनी आक्ष्ेप नोंदवला,असे महापौर म्हणाले.

बैठकीतील निर्णय आयुक्तांनी कसे स्वीकारले?या प्रश्‍नावर बोलताना ‘ते भयंकर डिस्टर्ब होते,ते गेल्या चार दिवसांपासूनच डिस्टर्ब आहेत’असे उत्तर महापौरांनी दिले.मात्र जे कंपनीच्या नियमात आहे, कायद्यात आहे,त्या नियमांप्रमाणेच आम्ही आज आयुक्तांना सीईओ पदावरुन हटवलं,असे महापौर यांनी सांगितले.

गडकरी इम्पॅक्ट-
अखेर ज्याची चर्चा होती तेच सत्य ठरले. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह तसेच गृहबांधणी व शहर विकास राज्यमंत्री हरिदीपसिंग यांना पत्र देऊन स्मार्ट सिटीतील अनियमितता तसेच आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एकंदरित कारभाराविषयी नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहले होते,तेव्हापासूनच मुंढे यांचे सीईओ पद हे या बैठकीनंतर जाईल असे भाकीत ’सत्ताधीश’ने देखील वर्तवले होते. गडकरी यांची नाराजी अखेर मुंढेंना भोवली.

बैठकीनंतर महापौरांना जसा मिशीवर ताव देण्याचा प्रश्‍न विचारण्यात आला तसेच ‘पहले उनका आवाज बुलंद था…अब उनका आवाज बंद है’अशी मिश्‍कीली ही मनपा परिसरात ऐकू आली.

Latest बातम्या