
आतापर्यंत सीईओ नसताना मुंढेंनी नियमबाह्य कार्य केल्याचे सिद्ध:महापौरांचा आरोप
नागपूर,ता. ३ जुलै: येत्या १० जुलै रोजी नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या (एनएसएससीडीसीएल) संचालक मंडळाची बैठक पार पडणार असून विषय पत्रिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सीईओपद नियमबाह्यरित्या बळकावल्याचे सिद्ध झाले, असे महापौर संदीप जोशी यांनी आज नमुद केले. नियमाने चालणारे आयुक्त मुंढे यांनी नियमांची पायमल्ली केल्याच्या महापौरांच्या आरोपामुळे स्मार्ट सिटीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
कंपनी सचिवांनी या बैठकीसाठी विषय पत्रिका तयार केली. या विषय पत्रिकेतील सहाव्या क्रमांकावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सीईओपदी नियुक्तीचा प्रस्ताव आहे. यावर महापौर संदीप जोशी यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन नियमबाह्य कामे केल्याप्रकरणी आयुक्तांवर तोफ डागली. स्मार्ट सिटीच्या एजेंड्यावरून आयुक्ताचे सीईओपद नियमबाह्य असून त्यांनी १८ कोटींची देयके एका कंपनीला कुठल्या अधिकारात दिले, असा सवाल महापौरांनी उपस्थित केला.

कामाची बिले देण्याबाबत यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता, असे आयुक्त म्हणतात. मागील संचालक मंडळाच्या बैठकीत ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. त्यांना कसे काय काढले? असेही महापौर म्हणाले. संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यासाठी तसेच विषय पत्रिकेवर स्वतःच्या नियुक्तीच्या विषयाला प्राधान्यक्रम दिला. परंतु एनएसएससीडीसीएलचे चेअरमन प्रवीण परदेसी यांनी नियमाप्रमाणे विषय पत्रिकेतील विषयाचा क्रम लावल्याचे जोशी म्हणाले.
आयुक्तांच्या सीईओपदी नियुक्ती नियमाने व्हावी, यात गैर नाही. परंतु आयुक्तांनी अधिकार नसतानाही कंपन्यांची बिले काढणे, अधिकाऱ्यांना काढले, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत जाब विचारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीईओ पद:शह आणि मात सारीपाटाचा खेळ!
यापूर्वी संचालक मंडळाची बैठक डिसेंबर महिन्यात झाली होती. याानंतर येत्या १० जुलै रोजी पार पडणा-या बैठकी दरम्यान राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीत बराच फरक पडला आहे. डिसेंबर महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचे अस्तित्व देखील नागपूरच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात नव्हते मात्र गेल्या सहा महिन्यात राजकीय पडद्यावरचे संपूर्ण चित्र पालटले आहे.राज्यात सत्ता गेली तर उपराजधानीत मुंढेंसारखा हटवादी आयुक्त नियुक्त करुन राष्ट्रवादी काँगेसने भाजपच्या सत्ताधा-यांना चांगलाच घाम फोडला आहे.याशिवाय कोविड-१९ सारख्या भयंकर महामारीच्या साथीच्या रोगाने प्रशासकीय सत्ता मुंढे यांच्या हातात एकवटली.
महापौर आणि आयुक्तांचा वैचारिक वाद महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचला असून,उपराजधानीतील विकास प्रकल्पच रोखले जात असल्याचा आरोप-प्रत्यारोप होत आहे. शहरातील जनता ही ‘मूकनायक’बनून हे ‘महानाट्य’बघत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीईओ पद हे देखील त्या महानाट्याचाच एक ‘अंक’आहे.
असे असले तरी स्मार्ट सिटी प्रकल्प हा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंढे यांनी अप्रत्यक्ष् रित्या गडकरी यांच्याच वर्चस्वाला आव्हान निर्माण केल्याने,दिल्लीसोबतच मुंबईच्या राजकीय सारीपाटावरील खेळ आता चांगलाच रंगला आहे. येत्या १० जुलैची संचालक मंडळाची बैठक व बैठकीत गाजणारे मुद्दे, ‘शह आणि मात’ खेळाकडे आता नागपूरवासियांचे लक्ष् लागले आहे.

आमचे चॅनल subscribe करा