Homeनागपूर न्यूजसीएनजीची दरवाढ वाहनचालकांवर अन्यायकारक:सचिन घोडे

सीएनजीची दरवाढ वाहनचालकांवर अन्यायकारक:सचिन घोडे

Advertisements

गडकरींच्या सूचनांना सीएनजी पंपचालकांचा हरताळ:चार चाकी वाहनात सीएनजी भरण्यास पंपचालकांचा नकार
नागपूर,ता. १४ एप्रिल २०२२ : वाढत्या पेट्रोल,डिजेलच्या किंमतीसोबतच पर्यावरणपूरक समजल्या जाणा-या सीएनजी गॅसचे दर ही गगनाला भिडले आहेत.राज्यातील इतर शहराच्या तुलनेत नागपूरात तर सीएनजीच्या दराने देखील शंभरी ओलांडली आहे.१११ रुपयांच्या वर प्रति किलो असा दर सीएनजी वाहन धारक पंपचालकांना देत असतानाही आता नागपूरात तिन्ही सीएनजी पंपावर फक्त ऑटोचालकांनाच सीएनजी भरुन दिल्या जात आहे.परिणामी चार चाकी वाहनधारकांना आपली वाहने अक्षर:रस्तयावर उभी करुन ठेवण्याची वेळ आली आहे.एकीकडे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे शहरातील प्रदुषणाचा स्तर नियंत्रित करण्यासाठी सर्व पेट्रोल,डिजेलच्या गाड्यांना सीएनजीमध्ये परिवर्तित करण्याची वारंवार सूचना देत आहेत व ज्या वाहनधारकांनी पदरातला पैसा खर्च करुन आपली वाहने सीएनजीमध्ये परिवर्तित केली त्यांच्यावरच आता पश्‍चाताप करण्याची वेळ आली असल्याचा संताप नि:स्वार्थ फाऊंडेशनचे संस्थापक सचिन घोडे यांनी व्यक्त केला.

सचिन घोडे यांच्या नेतृत्वात वाहनधारकांसह शनिवार दि.९ एप्रिल राेजी विटाभट्टी चौक,ऑटोमोटिव्ह सीएनजी पंपच्या व्यवस्थापकांना,शहरातील ऑटोचालकांप्रमाणेच इतर सीएनजी वाहनधारकांना मुबलक गॅस उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच राज्यातील इतर शहरांप्रमाणेच सीएनजीचे दर आकारण्यासाठीचे निवेदन देण्यात आले.अन्यथा,रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

२५ ते ३० लाख लोकसंख्या असणा-या व राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात फक्त तीनच सीएनजीचे पंप कार्यान्वित आहेत.कार चालकांना ईंधन न भरता फक्त तारखांवर तारखा सांगितल्या जात आहेत.यावर कहर म्हणजे सीएनजी वाहनधारकांकडून दुप्पट ते तिप्पट दर वसूल केले जात आहे.पैशांची बचत होईल या उद्देशानेच वाहनधारकांनी पैसे खर्च करुन आपली वाहने सीएनजीमध्ये परिवर्तित केली मात्र सीएनजी पंपावर त्यांना गॅसच उपलब्ध करुन देण्यास नकार दिला जात आहे,अनेक वाहनधारकांनी सचिन घोडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली.

घोडे यांनी सीएनजी पंपच्या व्यवस्थापकांना या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले.सीएनजी वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष खदखदत आहे.याचा मोठा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे घोडे यांनी सांगितले.सीएनजी गॅसच्या वापराबाबत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे सातत्याने आवाहन करीत असतात मात्र शहरातील सीएनजी पंप चालक हे सर्रास गडकरींच्या आवाहाना हरताळ फासत असल्याचा संताप घोडे यांनी व्यक्त केला.

परिणामी,वाहनधारकांच्या रोषाला पंप व्यवस्थापकांना सामोरे जावे लागू नये,कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याआधी तिन्ही पंप व्यवस्थापकांनी सीएनजी वाहनधारकांना योग्य दरात मुबलक गॅस उपलब्ध करुन द्यावा,असा इशारा सचिन घोडे यांनी दिला.

यावेळी पंप व्यवस्थापकांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन घोडे यांना दिले.निवेदनाची प्रत नितीन गडकरी,जिल्हाधिकारी विमला आर.महाव्यवस्थापक सीएनजी नागपूर तसेच माजी उर्जामंत्री व आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांना देण्यात आल्या.

निवेदन देताना शिष्टमंडळात नि:स्वार्थ फाऊंडेशनचे दिलीप काष्टे,प्रशांत राऊत,शुभम हटवार,गोपाल हटवार आदींची उपस्थिती होती.

 

Latest बातम्या