

राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आनंद सिंग यांनी मानकापूर पेलिस ठाण्यात नाेंदवली तक्रार
शरद पवारांना जीवे मारण्याचा प्रयत्न कलम ३०७ दाखल करा:राष्ट्रवादीची मागणी
मुंबईत डॉ.प्रियंका शेट्ये यांनी माध्यमांकडे बयाण केली जयश्री सदावर्तेंची दहशत
नागपूर,ता. २० एप्रिल २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानावर ८ एप्रिल रोजी एस.टी.कर्मचा-यांनी हल्ला केला.हा हल्ला सुनियोजित कट होता व ॲड.सदावर्ते यांनी एस.टी.कर्मचा-यांना चिथावणी देऊन घडवून आणण्यात आला होता,असा आरोप केला जात आहे.सदावर्तेंच्या विरोधात मुंबई,पुणे,सातारा व अकोट पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली असता नागपूरात देखील सदावर्तेंवर ३०७ कलम लावण्या संबंधीची तक्रार राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आनंद सिंग यांनी आज मानकापूर पोलिस ठाण्यात दाखल केली.
ॲड.सदावर्ते हे महाराष्ट्राच्या घरोघरी बहूचर्चित नाव असून सोशल मिडीयावर मराठा समाजाची तरुणाई आता बेधडकपणे समोर येऊन सदावर्तेंच्या विरोधात बोलू लागली आहे.विशेष म्हणजे मराठा क्रांति समन्वय समितीने कोल्हापुरात कलम १५३(अ)अन्वये दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या अारोपाखाली सदावर्तेंच्या विरोधात आधीच तक्रार नोंदवली आहे.२७ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील एस.टी.कर्मचारी हे संपावर आहेत.राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी वाटाघाटी अपयशी ठरल्यावर हा मुद्दा न्यायालयात गेला.७ एप्रिल रोजी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सन्मानजनक तोडगा काढल्यानंतर देखील ८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला व अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोणत्याही राजकीय नेत्याच्या घरावरील असा हल्ला हा निषेधार्ह्य असल्याचे सांगितले.या हल्ल्यात सदावर्ते यांच्या सुविद्य पत्नी जयश्री पाटील यांना देखील आरोपी करण्यात आले असून नुकतेच त्यांना न्यायालयाकडून २९ एप्रिल पर्यंत अटकेपासून हंगामी संरक्षण मिळाले आहे.गुणरत्न सदावर्ते राहत असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या गच्चीवर ७ एप्रिलच्या रात्री एक बैठक पार पडली.यावेळी गुणरत्न सदावर्ते,जयश्री पाटील,अभिषेक पाटील यांच्यासह कोअर कमिटीतील इतर सदस्य उपस्थित होते.पहाटेपर्यंत चाललेल्या या बैठकीत जयश्री पाटील यांनी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यास सांगितले,असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.यानंतर त्यांना देखील या गुन्ह्यात आराेपी करण्यात आले.याप्रकरणी आतापर्यंत ११६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.सध्या गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला आहे.सदावर्तेंना यानंतर पुणे पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.सातारा व कोल्हापूर येथील राजे व खासदारांविषयी आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या आरोपावरुन २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याशिवाय अकोट शहर पोलिसात दाखल असलेल्या एसटी.कर्मचारी फसवणूक प्रकरणात सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात देण्याचा विनंती अर्ज विद्यमान न्यायालयाने मंजूर केला आहे,यामुळे सदावर्ते यांच्या मागील पोलिसांचा ससेमिरा अनेक शहरांची व्याप्ती ओलांडणारा ठरला आहे.यात नागपूरात देखील आनंद सिंग यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात सदावर्तेंविरोधात शरद पवार यांना जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न या गुन्ह्यात कलम ३०७ ची कलम दाखल व्हावी याविषयी तक्रार नोंदवली आहे.

मराठा समाज गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील कारवाईमुळे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला आहे.सदावर्ते दाम्प्त्याविरोधात एस.टी.कर्मचा-यांची मानसिक,भावनिक,आर्थिक फसवणूक,तीन कोटींची अवैध रक्कम गोळा करने,आलिशान फ्लॅट,गाडी खरेदी करने अश्याप्रकारच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.विशेष म्हणजे त्यांनी सोशल मिडीयावर टाकलेल्या व्हिडीयोत आपल्या १२ वी वर्गात शिकणा-या मुलीची ‘फर्स्ट ड्राईव्ह’ चक्क फॉरच्यूनसारख्या अतिशय महागड्या गाडीतील असल्यामुळे अचानक एवढा पैसा सदावर्ते दाम्पत्याकडे कसा आला?एकीकडे गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेला एस.टी.कर्मचारी,त्यांचे कुटुंबिय हे रस्त्यावर आले असता या कर्मचा-यांची बाजू न्यायालयात मांडणा-या एका वकीलाकडे मुंबईसारख्या शहरात महागडा फ्लॅट,महागडी गाडी घेण्याएवढा पैसा आला तरी कूठून?एस.टी.कर्मचा-यांकडून न्यायालयीन लढाईच्या नावाने गोळा केलेला कष्टक-यांचा पैसा सदावर्ते व त्यांच्या पत्नीने तेवढ्याच बेपरवाईने स्वत:च्या हितासाठी गुंतवला व एस.टी.कर्मचा-यांची फसवणूक केल्याचा संताप आता समाज माध्यमावर उमटत आहे.
एकीकडे १५० च्या वर एस.टी.कर्मचा-यांच्या आत्महत्या,त्यांच्या विधवा पत्नी,मुलांवर आयुष्यातून उधवस्त होण्याची आलेली वेळ,त्यांचा आक्रोश,संताप,दू:ख,न्यायालयातून वेळोवेळी कर्मचा-यांना मिळणारा दिलासा ही सत्य बाजू अवघा महाराष्ट्र पाहत असताना ७ एप्रिल रोजी वेतन,पगारवाढ,भत्ते या संदर्भात न्यायालयाच्या निर्णय एस.टी.कर्मचा-यांना दिलासा देणारा असतानाही ८ एप्रिल रोजी सदावर्ते व त्यांच्या पत्नीने दिलेल्या चिथावणीतून शरद पवार यांच्या घरावर हल्ला करीत पायातील वाहणे फेकने,नारेबाजी करने,नासधूस करण्यासारखा अशलाघ्य प्रकार अवघ्या महाराष्ट्राने बघितला.

या हल्ल्याला एस.टी.कर्मचा-यांचे आंदोलन अशी मुळीच संज्ञा देता येत नसल्यामुळेच सदावर्ते यांना अटक झाली.यानंतर देखील विविध वाहीनींवर जयश्री पाटील यांनी जो ‘थयथयाट’ केला तो ही अवघ्या महाराष्ट्राने बघितला व आपसूकच उधवस्त,आत्महत्याग्रस्त एस.टी.कर्मचा-यांच्या विधवांचा आक्रोश राज्यातील जनतेला आठवला.त्यांच्या हातात फूटकी बांगडी देखील नव्हती,ज्या पदराने त्या वारंवार डोळ्यातील अश्रू पुसत होते त्या साडीचा पदर हा देखील सूती साडीचा होता मात्र दुसरीकडे जयश्री पाटील या आलिशान मोटारीतून उतरत होत्या.अंगावरील जिन्स व वरील सदरा हा दरवेळी वेगवेगळ्या रंगाचा व लक्ष वेधक होता,त्यांचा आक्रोश बघून काळीज पिळवटून न निघता उबग आणनाराच होता.माननीय न्यायालयाचा निर्णय हा एस.टी.कर्मचा-यांच्या बाजूने लागला असता व फक्त एस.टी महामंडळाचे शासकीय सेवेत समायोजनाची मागणी पूर्ण झाली नाही,या एका हेकेखोर,अकल्पीत मागणीवर सदावर्तें दाम्पत्यांनी आपली ‘राजकीय व आर्थिक’पोळी कश्याप्रकारे भाजून घेतली याच्या सुरस कथा आता समाज माध्यमांवर उमटल्या आहेत.
सदावर्ते यांनी ज्या पॉश स्कीममध्ये फ्लॅट घेतला त्याच सदनिकेत राहत असणा-या उच्च विद्याभूषित डॉ.प्रियंका शेट्ये ज्यांचे वरळी व बांद्रामध्ये स्वत:चे क्लिनिक आहे ज्या नायर हॉस्पीटल सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयातून बीडीएस झाल्या,त्यांना मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांचा वचक बघून माफी मागायला लावली.सदावर्ते यांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणाहून एस.टी.कर्मचारी येत होते,एकदा डॉ. शेट्ये यांना एका आंगतूकाने त्या खाली उतरल्या असता नको त्या ठिकाणी स्पर्श केला यामुळे चिडून त्यांनी सदनिकेचे पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.त्यांच्या सांगण्यावरुन त्या १६ व्या मजल्यावर राहणा-या जयश्री सदावर्तेंकडे ही गेल्या मात्र ज्या पद्धतीने जयश्री यांनी त्यांचा अपमान केला,त्यांना व त्यांच्या वयोवृद्ध आईला मारहाण केली ही व्यथाच डॉ.शेट्ये यांनी सदावर्तेंना अटक झाल्यानंतर माध्यमांकडे मांडली.

कायद्याच्या या राज्यात व स्कॉटलॅण्ड यार्डची बरोबरी करणा-या मुंबई पोलिसांनी, तक्रार नोंदवण्यास गेलेल्या डॉ.शेट्ये यांनाच जयश्री सदावर्ते यांची माफी मागायला लावली!पोलिसांच्या दडपणासमोर डॉ.शेट्ये यांनी जयश्री यांची माफी मागितली तरी, ’तूला मी सोडणार नाही’ असा जयश्री यांनी डॉ.शेट्ये यांना दम दिला होता.एक स्त्री जी स्वत:वर अन्याय झाल्याची बोंब मारत सुटली आहे तीच एका दुस-या स्त्रीचा आत्मसन्मान व कायदेशीर हक्क कश्याप्रकारे आपल्या पायदळी तुडवते याचे हे एकमेव उदाहरण नाही.अनेकांना सदावर्ते दाम्पत्यांनी कश्याप्रकारे अट्रासिटीत अडकवले याचे देखील किस्से आता पुढे येत आहेत.
एक डोळा अधू असल्याने अपंगत्वाच्या नावावर प्रमाणपत्र घेऊन परिक्षांना बसणारे सदावर्ते यांची दृष्टि एस.टी.कर्मचा-यांकडू कोट्यावधी गोळा करुन आलिशान चारचाकी खरेदी करताना मात्र अधू राहत नाही,ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानची फसवणूक नाही का?सदावर्ते म्हणजे ‘दूसरे आंबेडकर’ किवा ’ढाण्या वाघ’म्हणून ज्यांचे स्तुती गान अवघ्या महाराष्ट्राने वारंवार ऐकले त्यांच्या विश्वासघाताची पोल खोल होताच,‘कर्माची फळे येथेच भोगून द्यावी लागत असतात’इथपर्यंत प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला दिसून पडतो.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या पुढे आता आपली ‘आर्थिक’पोळी शेकल्या जाऊ शकरणार नाही या नैराश्यातूनच एस.टी.कर्मचा-यांची माथी भडकावून शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यास लावणा-या या वकील दाम्पत्यांबाबत निदान महाराष्ट्रातील तरी कोणत्या जाती-धर्माच्या नागरिकांना सहानुभूती नसल्याची देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
पवार यांच्या घरावर हल्ला करुन आपले नैराश्य लपवू बघणा-या सदावर्तेंच्या विरोधात भादंवि संहितेच्या कलम १३२,१४२,१४३,१४५,१४७,१४८,३३२,३५३,३३३,४४८,४५३,१०७,१२०(ब)१५३(अ)लावण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक दंग्यासाठी चिथावणी देणे,बेकायदेशीर जमाव,उपद्रव घडवून आणने,दंगलीसाठी दोषी,जिविताला धोका निर्माण करने,शासकीय सेवकांना कर्तव्यापासून परावृत्त करने,घाबरवणे,इतरांच्या घरावर आक्रमण करने,हल्ला करण्यासाठी चिथावणी देने इ.अश्याप्रकारचे दखलपात्र व जामिनपात्र गुन्हे आता सदावर्तेंवर दाखल आहेत.८ एप्रिल रोजी एस.टी.कर्मचा-यांनी ज्या प्रकारे शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला.पादत्राणे भिरकावल्या,नारेबाजी केली,धमक्या दिल्या.टाळ्या पिटळ्या,बांगड्यांचा अहेर केला ते बघता या कष्टक-यांची माथी किती क्लृप्तीने भडकविण्यात आली होती हे सिद्ध झाले. या हल्लेखोरांच्या ओठी फक्त शरद पवार व अजित पवार यांचेच नाव होते.परिवहन मंत्री अनिल परब हे तर त्यांच्या खिजगणतीतही नव्हते.’मी खूप अडचणीत असून माझ्या घरालाच नव्हे तर माझ्या ह्दयाला आग लागली आहे’असे वैफल्य हे आंदोलनकारी नव्हे तर हल्लेखारे माध्यमांजवळ मांडत होते,यावरुन त्यांची हताशा,निराशा,अगतिकता कश्याप्रकारे सदावर्ते दाम्प्तयांनी ’कॅश’केली हे अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या उघड्या डोळ्यांनी अनुभवली.
दुसरीकडे शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी कश्याप्रकारे बेकायदेशीर .जमिनी हडपल्या हे जयश्री पाटील यांनी समोर अाणल्यामुळेच तिच्या व माझ्या जिविताला धोका असल्याचे ॲड.सदावर्ते हे सांगत होते.शरद पवार यांची यूनियन या संपकाळात पुरती रिकामी झाली,युनियनची मान्यताच रद्द झाली,शरद पवार यांचीच युनियन एस.टी.कर्मचा-यांकडून पैसा गोळा करीत होती,न्यायालयात सरकाने एस.टी.कर्मचा-यांवर सहा महिन्यांची शिक्षा,कारवाई,दंड करण्याची परवानगी मागितली मात्र न्यायालयाने सरकारला एस.टी.कर्मचा-यांवर केसेससुद्धा दाखल करण्यापासून मनाई केल्याचे सदावर्ते यांनी माध्यमांकडे सांगितले.५ लाेकं उत्तरप्रदेशात जीपखाली चिरडून मरतात तर महाराष्ट्रात सरकारप्रणित संप पुकारला जातो,राज्याचा जीडीपी मातीत घातल्या जातो पण ५०० कर्मचा-यांच्या विधवांचे अश्रू आघाडी सरकारला दिसत नाही.शरद पवारांना एस.टी.कर्मचा-यांविषयी कोणतीही सहानुभूती नाही.माध्यमांनीच विपश्यना करणारे,जय भीम करणारे,जय श्री रामचा जयघोष करणारे संपकरी दाखवलेत मग ते हल्ला नाही आक्रोश व्यक्त करीत होते यावर तुमचा विश्वास का बसत नाही?शरद पवार,सुप्रिया सुळेंची लाय-डिटेक्टर चाचणी करा,तुम्हाला संजय राऊतांची शिवराळ भाषा चालते,एक महिला या आंदोलनात भोवळ येऊन पडली,त्याचा खेद वाटत नाही का?मी ४८ हजार एस.टी.कर्मचा-यांचे वकीलपत्र घेतले आहे,शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणारे नेमके कोण यांना व्यक्तिश:मी कसे ओळखणार?असे उपप्रश्न ही सदावर्तेंनी उपस्थित केले.
थोडक्यात सदावर्तेंचं कवित्व आता नागपूरपर्यंत येऊन पोहोचलं असून नुकतेच नागपूरातून या हल्ल्याच्या कटात सहभागी असण्यावरुन एका.एस.टी.कर्मचा-याला अटक झाली,त्या ही पुढे जाऊन आता राष्ट्रवादीचे नेते हे सदावर्तेवर शरद पवारांना जीवे मारण्यात प्रयत्न करण्याचा गुन्ह्या दाखल करण्यास सरसावले आहेत.शहर उपाध्यक्ष आनंद सिंह यांनी यासाठी पुढाकार घेतला असून सध्या सदावर्तेंच्या विरोधात राज्यातील विविध पोलिस ठाणे व सोशल मिडिया या दोन्ही स्तरावर चांगलेच युद्ध छेडले असल्याचे प्रत्ययास येत आहे.

आमचे चॅनल subscribe करा