Homeनागपूर न्यूजशासकीय मेट्रोला बदनाम करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करा

शासकीय मेट्रोला बदनाम करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करा

प्रशांत पवार, दुनेश्‍वर पेठे व अन्य यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांना भाजपचे निवेदन

नागपूर,ता. २५ जानेवारी: नागपूर शहराच्या ऐतिहासिक गौरवाशाली इतिहासाला षडयंत्र रचून वाढदिवसाच्या निमित्ताने हेतुपुरस्सर मेट्रो रेल्वेमध्ये अश्‍लील नृत्य करणे,तृतीयपंथीयांवर पैसे उधळणे,शासकीय,सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे हा संपूर्ण प्रकार म्हणजे नागपूर मेट्रो रेल्वेच नव्हे तर संपूर्ण शहरालाच बदनाम करणारा प्रकार आहे,या प्रकरणात दोषी असणारे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांच्यासोबतच या कृत्यामध्ये सहभागीतांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे व भाजपच्या शिष्टमंडळनाने निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना केली.

या शिष्टमंडळात भाजचे शहराध्यक्ष् व आमदार प्रवीण दटके,आ.विकास कुंभारे,आ.मोहन मते,आ.गिरीश व्यास,नागो गाणार,महापौर दयाशंकर तिवारी,उपमहापौर मनीषा धावडे,माजी आ. सुधाकर देशमुख,मा.आ. डॉ.मिलिंद माने,शहर महामंत्री नरेंद्र बोरकर,शहर महामंत्री संजय बंगाले,राम आंबुलकर,सुनील मित्रा,स्थायी समिती अध्यक्ष् पिंटू झलके,सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव आदी उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना आ.कृष्णा खोपडे यांनी सांगितले की प्रशांत पवार,दुनेश्‍वर पेठे तसेच अन्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो रेल्वेमध्ये केलेले हे कृत्य व्हिडीयो,मोबाईल,वृत्तपत्रे व इतर समाज माध्यमांद्वारे संपूण राज्यात व देशात व्हायरल झाले असून यामुळे शहराची प्रतिष्ठा धुळीस मिळाली,नागपूर शहराची बदनामी झाली,या सगळ्या घटनेचा तपशील पोलीसांकडे असून देखील सीताबर्डी पोलीसांनी अद्याप या महामेट्रो रेल्वेने केलेल्या तक्रारीची दखलच घेतली नाही.

हे कृत्य करणा-यांना कोणाचे अभय आहे?पोलीस विभागाद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खोपडे यांनी केला.पोलीसांनी कारवाई तर केली नाहीच मात्र शहराला बदनाम करणा-या या षडयंत्रकारी लोकांनी दुस-या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ‘आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही’असा उद्दामपणा केला असल्याचे सांगितले.
शहरात एखादी घटना घडली तर संपूर्ण पोलीस विभाग झडझडून त्या घटनेच्या आरोपींच्या मागे लागतो मात्र इतकी मोठी घटना होऊन देखील पोलीस गप्प का?राज्याचे गृहमंत्री हे देखील या शहराचेच आहे,ते राष्ट्रवादीचेच असल्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होत असल्याचे खोपडे हे म्हणाले.

यामुळेच आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिले असून आमच्या तक्रारीवर तातडीने गुन्हा दाखल करावा व दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अायुक्तांनी उद्या २६ जानेवारी गणतंत्र दिवस असल्याने परवा या तक्रारीची दखल घेणार असल्याचे आश्‍वासन दिले असल्याचे आ.खोपडे यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना भाजप शहराअध्यक्ष् प्रवीण दटके म्हणाले की सर्वच राजकीय पक्ष् आंदोलन करतात मात्र मेट्रोमध्ये बसून असे कृत्य करणे म्हणजे शहराचीच बदनामी आहे.मेट्रोने ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’उपक्रम हा शहराच्या ३० लाख शहरवासीयांच्या आनंदासाठी सुरु केला,कोणाच्याही आप्तस्वकीयांचा वाढदिवस धावत्या मेट्रोमध्ये साजरा करण्याचा आनंद शहरवासीयांना मिळावा हाच यामागील हेतू होता.मात्र मलाच लाज वाटत आहे असे कृत्य एका राजकीय पक्ष्ाच्या नेत्याने मेट्रोत केले,कोणत्याही पक्ष्ाचा कार्यकर्ता असो असे कृत्य करणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.

गडकरी यांनी देखील जाहीर केली उघडपणे नाराजी-
नागपूर मेट्रोला फायद्यात आणण्यासाठी आपणच महामेट्रोला ‘मनाेरंजन ऑन व्हील्स’ची संकल्पना सूचवली होती मात्र,याचा गैरअर्थ काढून मेट्रोला बदनाम करण्याचा फास रचला गेला.या तमाशाने नागपूर शहराची बदनामी झाली.अशा खोडसाळ काम करणा-यांची दखल जनताच घेईल,अशी जाहीर खंत केंद्रिय भूतल व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल रविवार दि.२४ जानेवारी रोजी त्रिमूर्तीनगर येथील भांगे लॉन येथे सुभाषनगर टी.पॉईंट ते छत्रपती चौक या सहा पदरी रस्त्याच्या केंद्रिय मार्ग निधीअंतर्गत नागपूर शहरातील अंतर्गत वळण रस्त्याच्या कामाच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली होती.मेट्रोला बदनाम करणा-यांची समाजानेच दखल घ्यावी,अश्‍या शब्दात शहराची बदनामी करणा-यांचे कान उपटले होते.

Latest बातम्या