Homeनागपूर न्यूजरोजगारासोबत स्वयंरोजगाराची संधी:अनिल सोले

रोजगारासोबत स्वयंरोजगाराची संधी:अनिल सोले


युथ एम्पावरमेंट समिटचे ९ वे पर्व:१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद् घाटन:समारोप गडकरींच्या हस्ते

पाच हजारांच्या वर रोजगार देण्याचं ध्येय:प्रत्येकाला पाच कंपन्यांमध्ये मुलाखत देण्याची संधी

पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’संकल्पनेला हातभार

नागपूर,ता.१५ फेब्रुवारी २०२३: फॉर्च्यून फाऊंडेशन,पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार आणि स्वयंरोजगार मेळावा यासोबतच जिल्हाधिकारी व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पावरमेंट समिटचे ९ वे पर्व येत्या १७ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास येथे आयोजित करण्यात आले असून या समिटद्वारे रोजगारासाेबतच स्वयंरोजगार निर्मितीचे देखील संधी तरुणांना प्राप्त होणार असल्याचे फॉर्च्युन फांऊंडेशनचे अध्यक्ष व माजी आमदार अनिल सोले यांनी आज आमदार निवासच्या परिसरात आयोजित पत्र परिषदेत सांगितले.

मेळाव्याचे उद् घाटन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,सहकार मंत्री अतुल सावे तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील १०० कंपन्या सहभागी होणार असून कौशल्य विकास योजनेअंतर्गत ४५ कंपन्या येणार आहेत.या रोजगार मेळाव्यात ५ हजार पेक्षा जास्त रिक्त जागांवर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे.एका तरुणाला जास्तीत जास्त ५ कंपन्यांमध्ये मुलाखती देण्याची संधी या मेळाव्यातून मिळणार असल्याचे अनिल सोले यांनी सांगितले.

याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहे.तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे स्टॉल्स देखील असणार आहे.स्टार्टअप व मुद्रा लोन या संदर्भात माहिती देणारे व मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय स्वयंरोजगारसाठी आवश्‍यक असलेल्या मशीनरी दाखविण्यात येणार आहे.यासोबतच VTP चे स्टॉल्स असणार आहेत.तीन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत,अशी माहिती अनिल सोले यांनी दिली.

तरुणाईमधील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे त्यांना स्वयंरोजगारात प्रवीण करणे हे काम राष्ट्रनिर्मितीशीच निगडीत आहे,त्यामुळेच तरुणां मधील कौशल्य विकसित करुन त्यांना व्यवसायात निपुण करणे हे या रोजगाराचे मूळ उद्दिष्ट असल्याचे सोले यांनी सांगितले.

याशिवाय विशेषत:पाच वर्षात ज्यांनी उद्योग सुरु केला मग ते चहापासून तर स्नॅक्सपर्यंतचा असाे,पर्यावरणापासून तर स्टार्टअप असो,या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र माेदींनी आत्मनिर्भर भारताची जी संकल्पना देशाला दिली,त्याच संकल्पनेची प्रतिपूर्ती करण्याचा प्रयत्न मागील ९ वर्षांपासून करीत असल्याचे ते म्हणाले.
१७ तारखेपासून सुरु होणा-या या मेळाव्यासाठी आतापर्यंत १० हजारच्या वर तरुणांनी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय महास्वयंम वरील नोंदणी देखील यात समाविष्ट करण्यात येणार आल्याचे ते म्हणाले.यूथ एम्पावरमेंट समिटमध्ये मागील ९ वर्षात ३० ते ४० हजार इच्छूकांपर्यंत विविध योजना पोहोचल्या,मेळाव्याचा लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.या मेळाव्याचा लाभ फक्त विदर्भातील ११ जिल्हातील इच्छूकच घेऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त तरुणांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.ज्या युवकांना या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी WWW.Yesnagpur.in तसेच WWW.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी देखील युवकांना रोजगार देणारा तीन दिवसीय उपक्रम राबविला असल्याकडे लक्ष वेधले असता,ही अतिशय स्तुत्य बाब असल्याचे सोले म्हणाले.समाजातील असे अनेकांनी पुढे येऊन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

समारोपाला गडकरी येणार-
या समिटचा समारोप रविवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती अनिल सोले यांनी दिली.

पत्र परिषदेला माजी आमदार सुधाकर देशमुख, नवनीतसिंह तुली,कुणाल पडोळे,संदिप जाधव,आशिष वांदिले,अशोक सायरे,विजय फडणवीस,भाेलानाथ सहारे आदी उपस्थित होते.

अशी असणार आहेत चर्चा सत्रे-
शनिवार दि.१८ फेब्रुवारी रोजी एकाच छताखाली अतिशय मोलाचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळणार आहे.
सकाळी ११ वाजता बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी)चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे मार्गदर्शन
दुपारी ११.३० वाजता समाजकल्याण विभागाच्या विविध योजना याविषयी डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांचे मार्गदर्शन
दुपारी १२ वाजता सारथी महामंडळाच्या योजना याविषयी पुणे येथील प्रकल्प संचालक डॉ.श्रीकांत देशमुख मार्गदर्शन करतील.
दुपारी १२.३० वाजता ईतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ(ओबीसी) सुशांत बेझलवर यांचे मार्गदर्शन
दुपारी १ वाजता शासनाद्वारे परदेशी शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती वक्ता हेमंत सुटे यांचे मार्गदर्शन
दुपारी १.३० वाजता वसंतराव नाईक महामंडळ योजनांची माहिती
दुपारी २ वाजता संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ वक्ता सुरेश ढगे यांचे मार्गदर्शन
दुपारी २.३०वाजता वैद्यकीय क्षेत्रातील रोजगार योजना वक्ता डॉ.मनिष श्रीगिरीवार यांचे मार्गदर्शन
दुपारी ३ वाजता स्टार्टअप-वक्ता देवेंद्र पारेख यांचे मार्गदर्शन
दुपारी ३.३० वाजता आत्मनिर्भर भारत,वक्ता डॉ.दिलीप पेशवे यांचे मार्गदर्शन
दुपारी ४ वाजता एव्हिएशेन इंडस्ट्री वक्ता विशाल बांगरे यांचे मार्गदर्शन
………………….

 

Latest बातम्या