Homeनागपूर न्यूजराष्ट्रवादीचे दोन दिवसीय ओबीसी अधिवेशन नागपूरात

राष्ट्रवादीचे दोन दिवसीय ओबीसी अधिवेशन नागपूरात

शरद पवार व अजित पवार येणार:अनिल देशमुखांनी पत्र परिषदेत दिली माहिती

नागपूर,ता.३० मे २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या व पदाधिका-यांच्या, नागपूरात येत्या ३ व ४ जून रोजी पार पडणा-या दोन दिवसीय ओबीसी शिबिराच्या उद् घाटन व समारोपीय अधिवेशनाला, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे,अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.

रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात ३ व ४ जून रोजी हे शिबिर पार पडणार आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी(ता.३ जून) शिबिराचे उद् घाटन होणार असून समारोप ४ जून रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल.शिबिरात राज्यभरातून सुमारे ७०० पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती याप्रसंगी अनिल देशमुख यांनी दिली.

याशिवाय शिबिराला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी केंद्रिय मंत्री प्रफूल्ल पटेल,ओबीसीचे राष्ट्रीय नेते व माजी मंत्री छगन भुजबळ,माजी मंत्री एकनाथ खडसे,राजेंद्र शिंगणे आदी शिबिरात उपस्थित राहणार आहेत.

उठ ओबीसी जागा हो..नव्या क्रांतीचा धागा हो’हा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे.

शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके,आमदार अमोल मिटकरी,ॲड.अंजली साळवे,धनगर युवा नेत्या सक्षणा सलगर,विकास लंबाडे,अविनाश काकडे हे ओबीसींच्या विविध विषयांवर व सध्याच्या घडामोडींवर मार्गदर्शन करणार आहेत.मान्यवरांचे मार्गदर्शन दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

पत्र परिषदेत माजी मंत्री रमेश बंग,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्‍वर पेठे,ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर,प्रदेश सरचिटणी शेखर सावरबांधे आदी उपस्थित होते.

Latest बातम्या