
(रणधुमाळी विधान परिषद निवडणूकीची भाग-५)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१० डिसेंबर: राजकारणात एक म्हण प्रसिद्ध आहे ‘प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा’असाच एक प्रत्यय आज माध्यकर्मींनी विधान परिषदेच्या स्थानिक मतदार संघाच्या निवडणूकीतील मतदान केंद्रावर अनुभवला.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल गुडधे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांची चांगलीच फिरकी घेत होते.त्यांना साथ लाभली विराेधी पक्ष नेते तानाजी वनवे यांची तर माजी महापौर संदीप जोशी व आमदार कृष्णा खोपडे हे देखील त्या हास्यकल्लोळात हिरीरिने सहभागी झालेत.
काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात विळ्या-भापेळ्याचे वैर जगप्रसिद्ध आहे.अगदी ट्टिटर पासून तर जाहीर सभा,सर्वदूर एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी करण्यास या दोन्ही पक्षातील नेते अजिबात चुकत नाही,आज तर निवडणूक होती,मतदान होत होते,मतदानाच्या निकालावर आपापल्या पक्षाच्या उमेदवारचं ‘चांगभलं’होणार होतं.
दोन्हीकडील मंडळी निवडणूक रणनीतीमुळे मानसिक,शारिरीकदृष्टया क्षीणून गेली होती मात्र एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्रित येण्याचा अवकाश अन्…एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी आणि हास्यकल्लोळ सुरु झाला.
सुरवात गुडधे यांनी, भाजपने आपले मतदार सहलीला पाठवल्याबाबत केली.तुम्हाला आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही त्यामुळे सहल घडवली,असा टोमणा मारला यावर दटके यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.आ.कृष्णा खोपडे आणि माजी महापौर संदीप जोशी यांची यानंतर चांगलीच जुगलबंदी तानाजी वनवे व प्रफूल्ल गुडधेंसोबत रंगली.
मनपाच्या सभागृहात सर्वाधिक ‘चकमक’ ही प्रफूल्ल गुडधे पाटील व प्रवीण दटके यांच्यातच उडते.गुडधे हे तर सतत ‘नियमांवर’बोट ठेऊनच असतात, दटके यांचा संताप ही सभागृहाने अनेकदा अनुभवला आहे मात्र आज तहसील कार्यालयामधील मतदान केंद्रासमोर, आपापल्या मतदार सदस्यांची बाहेर येण्याची वाट बघत,हे दोन शत्रू पक्षातील पाच ही नेते तूफान फटकेबाजी करीत वेळ घालवताना दिसल्याने माध्यमकर्मींची नजर ही आपसूकच त्यांच्याकडेच वळली.
नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कन्येच्या विवाहात सर्व पक्षीय नेते यांचा हास्यविनोदमध्ये मशगूल असणारा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला.शिवसेना नेते संजय राऊत हे ज्यांच्या नावाने सातत्याने कडाकडा बोटे मोडत असतात, त्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीवर थाप मारताना दिसत होते व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या चेह-यावर देखील चांगलेच हास्य उमटले होते.
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो हेच खरे.ही लढाई माणसांची नसून विचारधारेची असते आणि विचारधारेची लढाई ही वैयक्तीक हल्ले न करता विचारधारेनीच लढायची असते,हीच लोकशाहीची प्रगल्भता आहे.
त्यामुळेच आज काँग्रेस व भाजपमधील या वरिष्ठ नेत्यांचा एकमेकांवर कुरघोडी करणारा हास्यकल्लोळ अनेकांना सुखावून देखील गेला.
(व्हिडीयो-नियमाप्रमाणे गरोदर महिला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत गाडी नेण्याची मुभा आहे.आज अशीच एक गरोदर महिला मतदार काराने मतदान केंद्रावर आली असता पोलिसांनी बॅरिकेट्स हटवून त्यांच्या वाहनाला अगदी आतपर्यंत जाण्याची अशी परवानगी दिली)

आमचे चॅनल subscribe करा