

मुद्रा लोनबाबत करणार मार्गदर्शन
नागपूर,२१ फेब्रुवारी: फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने येत्या १३ व १४ मार्चला यूथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही माजी आमदार तसेच फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून या समिटचे आयोजन होत आहे. यंदाच्या समिटमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन हे तर वैशिष्ट्य असणारच आहे, शिवाय नोकरीच्या आनलाईन मुलाखतींसाठी कंपन्या आणि तरुणांमध्ये एक विश्वासाचा पूल बांधण्याचे काम फाऊंडेशनतर्फे होणार आहे.
यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या संदर्भात सर्व अपडेट्स YES Nagpur (Fortune Foundation) या एपवरून देण्यात येणार आहेत. त्यासाठी गुगल प्लेवरून हे एप डाऊनलोड करता येईल, असे आयोजकांनी सांगितले आहे. अलीकडेच १५ फेब्रुवारीला केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतूक तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या एपचे लोकार्पण झाले. याशिवाय www.anilsole.in / www.yesnagpur.in या दोन संकेतस्थळांवरूनदेखील समिटच्या संदर्भात वेळोवेळी माहिती मिळू शकणार आहे.
तरुणांना रोजगार देणारे आणि उद्योगाचे शेकडो मार्ग खुले करणारे समिट म्हणून या आयोजनाची ओळख आहे. यंदाही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांचा यंदाही सहभाग असणार आहे. जवळपास ५ हजार जागांसाठी आनलाईन मुलाखती होणार आहेत. मात्र त्यासाठी नोंदणी आवश्यक असणार आहे. एप किंवा संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येणार आहे.
इच्छूक तरुणांना २८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ पर्यंत ही नोंदणी सुरू असेल. यंदा सर्व मुलाखती आनलाईन पद्धतीनेच होणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. नोंदणी झाल्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, बारामती येथील कंपन्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. या सर्व मुलाखती यंदा आनलाईन होणार असून त्याचे वेळापत्रक फॉर्च्यून फाऊंडेशनतर्फे तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवाराला व कंपनीला मुलाखतींसाठी व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मवरील लिंक पाठविण्यात येतील.
यासोबतच सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात १३ व १४ मार्चला दिवसभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र होतील.
तरुणांचा सर्वांगिण विकास आणि रोजगाराच्या नवीन संधी यावर आधारित मार्गदर्शन करणारे सत्रही होईल. त्यासाठी विविध वक्ते यात सहभागी होणार आहे. मुद्रा लोनशी संबंधित मार्गदर्शन करणारे स्टॉलही याठिकाणी असणार आहे. समिटच्या संदर्भात सर्व सूचना व माहिती एपमार्फत देण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ८६००७७८५७३ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी फॉर्च्युन फाऊंडेशनच्या यूथ एम्पॉवरमेंट समिटसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमचे चॅनल subscribe करा